Indian Culture: मर्यादेचे ‘लॉक’ आणि अपेक्षा ‘डाऊन’; सुखी, समृद्ध जीवनाचे सोपान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:15 PM2021-04-27T13:15:29+5:302021-04-27T13:21:01+5:30

कोरोनामुळे संपूर्ण जगाला एक मोठा धडा मिळाला असून, भारतीय प्राचीन संस्कृतीतील काही गोष्टींचा तात्पुरत्या स्वरुपात नाही, तर दीर्घकाळासाठी जीवनात अवलंब, अनुसरण केल्यास सुखी, आनंद, समृद्ध जीवन आपण जगू शकतो. जाणून घ्या... (steps to a happy prosperous life)

कोरोनाने संपूर्ण जगाला एक मोठा धडा दिला आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी, चौथी लाट आहे. भारतातही कोरोनाचा कहर झाल्याचे दिसत आहे. (steps to a happy prosperous life)

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयावह आणि भीतीदायक होत चालली आहे. मात्र, प्रत्येक देशवासीयांनी ठरवले, तर या संकटावर आपण मात करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांमध्येही अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, जेणेकरून आपण ती तत्त्वे पुन्हा अनुसरून कोरोना संकटाच्या काळात सुखी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करू शकतो.

लॉकडाऊन म्हणजेच टाळेबंदी. सर्वांनी सुरक्षितपणे, आहे त्या ठिकाणी थांबायचे, असा सामान्य अर्थ होतो. लॉकडाऊन ही सुवर्णसंधी मानून, आपण अध्यात्माकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. लॉकडाऊन एक प्रकारचा अध्यात्मिक संदेशही देते.

संसर्गापासून वाचण्यासाठी कुलुपाप्रमाणे स्थितप्रज्ञ राहण्याची शिकवण यातून आपल्याला मिळते. आपल्यातील राग, लोभ, माया, मत्सर यांना कुलूप घालून विनम्रता, साधेपणा अशी कुलुपे उघडली पाहिजेत.

माणूस म्हणून आपल्यातील त्रुटी, कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दुसऱ्यातील चुका उघड करण्यापेक्षा आपल्यातील चुका कशा दुरुस्त करता येतील, याकडे लक्ष दिले पाहिजे.

आपण आपला व्यवहार योग्य ठेवला पाहिजे. जेणेकरून कुटुंबाला, समाजाला, देशाला आणि विश्वाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. सकारात्मकता येण्यासाठी आणि आणण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करावेत.

गरजू माणसांना मदत केली पाहिजे. त्यातून मिळणारे समाधान हे कोणत्याही तराजूत न तोलता येण्यासारखे आहे. समाधान मिळण्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टी केल्यास आनंद द्विगुणित होण्यास मदत मिळू शकते.

आपली भारतीय संस्कृती, प्राचीन परंपरा यांची दखल आता जगानेही घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत, असे न मानता त्यातून आपल्याला काय चांगले मिळू शकते, याकडे लक्ष दिल्यास आपले जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकणार आहे, याचा विचार केला पाहिजे.

पाश्चात्य गोष्टींच्या केवळ अंधानुकरणामुळे आपलीच संस्कृती, परंपरा आपल्याला मागास, बोथट वाटू लागली होती. मात्र, कोरोनामुक्त भारताचा संकल्प प्रत्येकाने करून घरीच राहून खारीचा वाटा आपण उचलू शकतो. अध्यात्मिक मूल्यांचा स्वीकार करून आपल्या अपेक्षा, इच्छा याला लगाम घातला पाहिजे.

विश्वशांती, सद्भावना, विश्व बंधुत्व, वसुधैव कुटुंबकम आदी भारतीय संस्कृतीच्या उच्च मूल्यांसह प्राचीन अध्यात्मिक ज्ञान, राजयोग ध्यान, स्वस्थ, साधी आणि सकारात्मक जीवनप्रणाली या गोष्टी कुटुंब, समाज, देश आणि विश्वात या गोष्टी विकसित करता आल्या, तर सर्वांचेच जीवन काही प्रमाणात का होईना, समृद्ध होऊ शकेल.

कोरोनामुळे मर्यादेत राहून कसे जगावे, मर्यादा घालून घेतल्याचा किती उपयोग होऊ शकतो, याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. भारतीय संस्कृतीची उच्च मूल्ये पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याची कोरोना संकट ही संधी मानायला हवे.

बाहेरून आल्यावर हातपाय धुणे, स्वच्छता राखणे या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, हे कोरोनामुळे अधिक जास्त प्रमाणात जाणवले. साने गुरूजींनी आपल्या श्यामची आई या पुस्तकात भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचे अनेक दाखले दिले आहेत.

घरात सकारात्मकता येण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावणे, सायंकाळी दिवेलागणीच्या वेळेला धूप घालणे, प्रार्थना करणे, जप, नामस्मरण करणे, ध्यानधारणा, यांसारख्या अनेकविध गोष्टींतून घरात सकारात्मकता आणण्याचे काम आपण करू शकतो.

मेडिटेशन, प्राणायामक या गोष्टींमुळे ऑक्सिजनची पातळी वाढवू शकतो, हे आता अनेक स्तरांवरून सांगितले जात आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषी-मूनी, संत, महंत हेच तर करत आले आहेत. मेडिटेशनचे अनेक फायदे सांगितले जातात. आपल्या जीवनात याचा उपयोग केल्यास जीवन समृद्ध होण्याकडे वाटचाल सुरू होऊ शकते.