Guru Purnima 2021: गुरु परमात्मा परेशू! ​गुरुचा नेमका अर्थ काय? पाहा, इतिहास, गुरुमहती आणि गुरुमहत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 04:41 PM2021-07-22T16:41:21+5:302021-07-22T16:48:09+5:30

Guru Purnima 2021: अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे.

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. नी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन.

धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनी लिहिला. तर, जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती.

गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.

यंदाच्या वर्षी २३ जुलै २०२१ रोजी गुरुपौर्णिमा आहे. आषाढ पौर्णिमेचा प्रारंभ २३ जुलै रोजी सकाळी १० वाजून ४३ मिनिटांनी होणार असून, २४ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ०६ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होईल. विशेष म्हणजे याच दिवशी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती आहे.

अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. पूर्वी गुरुकूल पद्धत रुढ होती. गुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे, असे सांगितले जाते. भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत.

ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. तिथीनुसार आषाढ पौर्णिमेला महर्षी व्यासांचा जन्म झाल्याची मान्यता असल्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपूजन केले जाते. जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरुंची भेट घेतात.

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला गुरु त्याची आई असते. अगदी चालण्या-बोलण्यापासून ते संस्कार करेपर्यंत अनेक गोष्टी आई शिकवत असते. म्हणूनच 'आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझी', असे म्हटले जाते. आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे 'मातृदेवो भव:, पितृदेवो भव:', असेही म्हटले जाते. आयुष्यात चांगला गुरु मिळणे भाग्याचे लक्षण समजले जाते.

कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की, 'ग' कार म्हणजे सिद्ध होय. 'र' कार म्हणजे पापाचे दहन करणारा. 'उ' कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्त्व आहे, ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो.

ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वत: प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.

गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे गुरुंची पाद्यपूजा करणे. मात्र, गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पाद्यपूजा करणे अथवा गुरुला वाकून नमस्कार करणे, असे मूळीच नाही. खऱ्या गुरुला अशा दिखाव्यांची गरज नसते. गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेले ज्ञान आत्मसात करणे. गुरुंकडून मिळवलेले ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे.

गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणे. या कृतज्ञतेपोटी गुरुंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरे गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरूदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो.

गुरुचे कार्य महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या चांगल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरूची भावना ही अहंकाराची नसावी. गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद आणि समाधान झाले, तरच तो खरा गुरु जाणावा.

त्याचसोबत गुरुकडून मिळालेले ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुरुकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्विकारतो, त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.

गुरु त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातीस समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते.

जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरु असोत, शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरुपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.