पी व्ही सिंधूची हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:22 PM2017-11-24T12:22:39+5:302017-11-24T12:26:11+5:30

भारताची स्टार शटलर आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने आपली विजयी घोडदौड कायम राखताना हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

सिंधूने आक्रमक खेळ करताना जपानच्या अया ओहोरी हिचे कडवे आव्हान सरळ दोन गेममध्ये परतावले. त्याचवेळी, भारताच्या अनुभवी सायना नेहवालला मात्र स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला.

गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या जागतिक क्रमवारीमध्ये सिंधूची एका स्थानाने घसरण झाली आणि ती तिस-या स्थानी आली. मात्र, याचा तिच्या कामगिरीवर काहीच परिणाम झाला नाही.

सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना सिंधूने बाजी मारली.

सिंधूने ३९ मिनिटांमध्ये विजय निश्चित करताना ओहोरीला २१-१४, २१-१७ असे सहजपणे नमवले.

पुढच्या फेरीत सिंधूपुढे जपानच्याच पाचव्या मानांकित अकाने यामागुची हिचे तगडे आव्हान असेल.