एकदा चार्ज करा, मुंबई-पुणे-मुंबई चार फेऱ्या मारा; Triton Electric Car भारतात सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:11 PM2021-10-13T17:11:11+5:302021-10-13T17:21:57+5:30

Triton Model H SUV Electric car in India: पुढील काही महिन्यांत 30 कोटी डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. या कारसाठी भारतातून 2.4 अब्ज डॉलरच्या ऑर्डरही मिळल्या आहेत.

देशात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नवनव्या कंपन्यांसोबत जुन्या कंपन्यादेखील आपली वाहने बाजारात आणू लागली आहेत. कारबाबत बोलायचे झाले तर सध्या ह्युंदाई आणि एमजीच्या कारची रेंज सर्वाधिक आहे. टाटाच्या कारची रेंज तीनशेच्या आसपास आहे.

या कारना चार्ज करणे ही मोठी समस्या आहे. यामुळे लांबच्या पल्ल्यासाठी या इलेक्ट्रीक कार घेऊन जाणे डोकेदुखी ठरत आहे. परंतू आता अशा एका कारने भारतीय बाजारात एन्ट्री केली आहे की ती कार एकदा का चार्ज केली की मुंबई-पुणे-मुंबई अशा चार फेऱ्या आरामात मारू शकणार आहे.

Triton या अमेरिकी कंपनीने भारतात इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. या कारची रेंज 1200 किमी आहे. ट्रायटन कंपनीने हैदराबादमध्ये Model H इलेक्ट्रीक एसयुव्ही सादर केली. या एसयुव्हीची लांबी 5,690 मिमी, उंची 2,057 मिमी आणि रुंदी 3,302 मिमी आहे.

ट्रायटनच्या या मॉडेल एचमध्ये एकावेळी आठजण बसू शकतात. कंपनीचा असा दावा आहे की, 5,663 लीटरचे सामान बसण्यासाठी जागा आहे. Triton Model H एसयुव्ही सात रंगांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. भारतात मेटॅलिक ब्ल्यू एसयुव्ही दाखविण्यात आली.

ट्रायटन ईव्ही मॉडेल एच एसयुव्ही मध्ये 200kWh बॅटरी पॅक देण्य़ात आले आहे. यामध्ये हायपरचार्जचा पर्याय आहे. ही एसयुव्ही दोन तासांत फुल चार्ज होते. एकदा चार्ज केले की ही कार 1200 किमी पर्यंत चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने सांगितले की, पुढील काही महिन्यांत 30 कोटी डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. या कारसाठी भारतातून 2.4 अब्ज डॉलरच्या ऑर्डरही मिळल्या आहेत. जर कंपनीने केलेला दावा खरा असला तर भारतातील ही पहिलीच अशी कार असेल जी 1000 किमीपेक्षा जास्तीची रेंज देते. तसेच जगातील सर्वाधिक रेंज देणारी ही कार बनेल.