Tata Punch ला देणार टक्कर! किंमत, फिचर्स सेम टू सेम; ‘या’ कारची होणार लवकरच एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 02:44 PM2021-09-25T14:44:34+5:302021-09-25T14:55:39+5:30

Tata Punch ला टक्कर देण्यासाठी फ्रान्सची ऑटोमोबाइल कंपनी आपली दुसरी कार लाँच करणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून Tata Punch या कारबाबतची उत्सुकता अगदी शिगेला गेली आहे. नेक्सॉन, हॅरियर आणि अल्ट्रोज यांचे मिश्रण म्हणजे ही कार असल्याचे सांगितले जात आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला Tata Punch लॉंच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय देशभरातील टाटा डिलर्सकडे ही कार पोहोचली असून, नवनवे व्हिडिओ समोर येत आहेत. मात्र, ही कार कधी लॉंच होणार, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दुसरीकडे Tata Punch ला टक्कर देण्यासाठी फ्रान्सची ऑटोमोबाइल कंपनी Citroen देखील भारताच्या मार्केटमध्ये आपली दुसरी कार Citroen C3 लाँच करणार आहे.

काही दिवसांपूर्वीच Citroen C3 ची पहिली झलक कंपनीने सादर करण्यात आली होती. दोन्ही कार या प्राइज, स्पेसिफिकेशन आणि सेगमेंटमध्ये सेम टू सेम असून, या दोन्ही कारमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळेल, असे सांगितले जात आहे.

Citroen C3 ही फ्रान्सच्या कंपनीची भारतातील एंट्री लेवल कार असेल त्यामुळे किंमतीच्या बाबतीतही ही कार किफायतशीर असेल असं समजतंय. कंपनी ही कार ६ लाख रुपये ते १०-१२ लाख रुपयांच्या प्राइस रेंजमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.

तर, Tata Punch लाही जवळपास याच रेंजमध्ये टाटा मोटर्सकडून उतरवले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही छोट्या एसयूव्हींची किंमत नेमकी किती असेल याबाबत येत्या काही दिवसांमध्ये माहिती समोर येईल. पण या दोन्ही छोट्या एसयूव्ही कमी किंमतीत लेटेस्ट फीचर्ससह येणार आहेत.

Tata Punch मध्ये तर सेगमेंटमध्ये पहिल्यांदा दिले जाणारे अनेक फीचर्स असतील असा दावा केला जातोय. Citroen C3 ला कंपनी लोकल कॉमन मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर (CMP) डेव्हलप करत आहे.

यामध्ये रुंद ग्रिल, डिझाइनर हेडलँप, अँग्युलर विंडशील्ड प्लेसमेंट, फ्लॅट बोनट आणि फ्लॅट रूफसोबत फ्रंट बंपरवर ऑरेंज एलिमेंट आणि ड्युअल टोन डायमंड कटअलॉय व्हील्स असतील. तसेच या कारमध्ये ८० निरनिराळ्या अॅक्सेसरीज असतील असे कंपनीने म्हटले आहे.

इंजिनबाबत सांगायचे झाल्यास यामध्ये १.२ लीटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिनसह ५ स्पीड मॅन्युअल आणि डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ही भारतातील पहिली flex-fuel इंजिन कार असेल, असेही सांगितले जात आहे.

दरम्यान, भारतात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्याने लोकांचा ओढा सीएनजी आणि इलेक्ट्रीक कारकडे वळू लागला आहे. टाटा मोटर्स आपल्या दणकट Tata Nexon सह, Tata Altroz, Tata Tiago आणि Tata Tigor चे सीएनजी व्हेरिअंट लाँच करणार आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत Tata Nexon CNG, Tata Altroz CNG, Tata Tiago CNG आणि Tata Tigor CNG मॉडेल लाँच होतील. कंपनीने या बाबत काही ठोस सांगितलेले नसले तरी देखील टाटाच्या या कारना सीएनजी टेस्टिंग किटसह पाहिले गेले आहे.

टाटा मोटर्स अपकमिंग सीएनजी कारमध्ये १.२ लीटर पेट्रोल मोटर देण्याची शक्यता आहे. सर्व कारमध्ये हेच इंजिन असेल. याची रेंजही चांगली असण्याची अपेक्षा आहे. Tata Motors या कारच्या किंमती सध्याच्या मॉडेलपेक्षा ४० ते ५० हजार रुपयांनी जास्त ठेवण्याची शक्यता आहे.