सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच मॉडिफाय केली स्पोर्ट्स कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 07:54 PM2019-03-29T19:54:19+5:302019-03-29T19:57:22+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे एकसो एक कार आहेत. यामध्ये जास्त कार या बीएमडब्ल्यूच्या आहेत. त्याच्याकडे BMW 7-Series, BMW M3, BMW M4 या कार आहेतच पण सचिनकडे BMW i8 ही स्पोर्टकारही आहे.

सचिनला ही कार खूप प्रिय आहे. आठवड्याच्या सुटीवेळी ही कार मुंबईच्या रस्त्यांवर धावतानाही दिसते. BMW i8 ही कार पांढऱ्या आणि निळ्या रंगामध्ये आहे. मात्र, आता हीच कार तुम्हाला लाल आणि निळ्या रंगात दिसली तर नवल वाटायला नको. सचिनने काही नवीन कार घेतली नाहीय, तर तिचा रंग आणि लूक बदलला आहे.

सचिनने त्याच्या या कारमध्ये मोठे बदल केले आहेत. यामुळे त्याची BMW i8 रोजच्या मॉडेलपेक्षा वेगळी दिसू लागली आहे. सचिनने या कारला एका प्रसिद्ध कार डिझायनरकडून मॉडिफाय करून घेतले आहे.

या कारच्या बंपरचे डिझाईन बदलण्यात आले आहे. ग्रिल लावल्याने ही कार बदलली आहे. तसेच पाठीमागेही बदल करण्यात आले आहेत.

मागील बंपरला व्हेंटेड पॅनेल लावल्याने ही कार रुंद दिसत आहे. कार मॉडिफाय करण्याची सचिनची ही पहिलीच वेळ आहे.

जर्मन कंपनीची ही पहिली हायब्रिड कार आहे. ज्यामध्ये इलेक्ट्रीक मोटरसह 3 सिलिंडरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 4.4 सेकंदांत 100 किमीचा वेग पकडते.