MG Motors च्या इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन उद्या होणार लॉन्च; पाहा, सर्व डिटेल्स

By देवेश फडके | Published: February 7, 2021 07:36 PM2021-02-07T19:36:24+5:302021-02-07T19:39:45+5:30

MG ZS EV चे नवीन अपग्रेडेड मीड साइज एसयूव्ही व्हर्जन लॉन्च करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आता गगनाला पोहोचले असताना इलेक्ट्रिक वाहनांना आता हळूहळू मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे आगामी वर्षात अनेक आघाडीच्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा फोकस आता इलेक्ट्रिक वाहनांवर वळल्याचे चित्र आहे.

कमी कालावधीत भारतीय बाजारपेठेत जम बसवललेल्या MG Motors या कंपनीनेही आपली इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली आहे. या इलेक्ट्रिक कारला चांगला प्रतिसाद मिळत असून, आता नवीन अपग्रेडेड मीड साइज एसयूव्ही लॉन्च करण्याची घोषणा एमजी मोटर्सकडून करण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी नवीन इलेक्ट्रिक कार भारतात सादर केली जाणार आहे.

कंपनीने नवीन MG ZS EV या नवीन इलेक्ट्रिक कारबाबत अधिक माहिती दिलेली नाही. परंतु, MG ZS EV च्या नवीन वर्जनमध्ये इंटिरिअर आणि इक्स्टिरीअर फीचर्समध्ये बदल केला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. याशिवाय एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ३४० कि.मी.पर्यंत ही नवीन इलेक्ट्रिक कार धावेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

भारतीय बाजारात MG Motor ने यापूर्वी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. आता या इलेक्ट्रिक कारचे अपग्रेडेट व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. या नवीन इलेक्ट्रिक कारसाठी लागणारी बॅटरी भारतात तयार केली जाणार आहे. जेणेकरून कारची किंमत कमी ठेवता येईल. त्यामुळे भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कारची किंमत कमी असेल, असे सांगितले जात आहे.

नवीन २०२१ MG ZS EV इलेक्ट्रिक कारमध्ये इमरजन्सी ब्रेकिंग सिस्टिम दिली जाऊ शकते. हे फीचर यापूर्वी MG Motor च्या ग्लॉस्टर या एसयूव्हीमध्ये पाहायला मिळाले होते.

MG ZS EV मध्ये मोठा बॅटरी बॅकअप असेल. सिंगल चार्जवर ही कार ४०० कि.मी. हून अधिकची रेंज देऊ शकेल. तसेच अवघ्या ५० मिनिटांत ही कार चार्ज होऊ शकेल, असा दावा केला जात आहे.

Excite आणि Exclusive या दोन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असेल. MG ZS EV मध्ये ४४.५ kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज केली जाऊ शकते.

या कारला ५० kW DC फास्ट चार्जरद्वारे चार्ज केल्यास ८० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ ५० मिनिटे लागतात, असेही सांगितले जात आहे. सुरक्षेसाठी या गाडीत सहा एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत.