महिंद्राने मारुती सुझुकीला मागे टाकले; बनली मार्केट लीडर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:16 PM2019-06-05T15:16:23+5:302019-06-05T15:19:34+5:30

देशातील सर्वात मोठी कंपनी मारुतीला स्वदेशी कंपनीने यूटिलिटी वीइकल (UV) सेगमेंटमध्ये मागे टाकले आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच मराझो, अल्टुरास आणि एक्सयुव्ही 300 या कार लाँच केल्या होत्या. गेल्या महिन्यात या कारची मागणी वाढल्याने महिंद्राला हे शक्य झाले आहे.

महिंद्राने गेल्या महिन्यात 19524 आणि मारुतीने 19152 युटिलिटी व्हेईकल विकल्या आहेत.

महिंद्राच्या प्रवक्त्याने सांगितले की, युटिलिटी व्हेईकल सेगमेंटमध्ये आम्ही मार्केट लीडर बनण्यात यशस्वी झालो आहोत. मराझो, अल्टुरास आणि एक्सयुव्ही 300 या आमच्या तीन नवीन कार चांगल्या प्रदर्शन करत आहेत. ग्राहकांनी या तिन्ही कारना चांगला प्रतिसाद दिला आहे. एक्सयूवी 300 ची बुकिंगही चांगली झाली आहे.

हा प्रतिसाद पाहता पुढील काळातही महिंद्रा मारुतीला मागे टाकेल. महिंद्राची ही आघाडी 2018-19 च्या अखेरच्या तिमाहीवर आधारित आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीने 72, 413 कार विकल्या होत्या, तर मारुतीने 69827 कार विकल्या होत्या. मात्र, अख्ख्या वर्षाचा विचार केल्यास मारुती सुझुकीने 264197 युनिटची विक्री करत पहिला नंबर राखला होता.

आता या सेगमेंटमध्ये ह्युंदाईनेही उडी घेतली असून त्यांच्या नव्या व्हेन्यू कारने ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. व्हेन्यूने आतापर्यंत 23 हजार बुकिंग मिळविली आहेत.

ह्युंदाईने ही कार 6.5 लाख रुपये एक्स शोरुम एवढ्या आकर्षक किमतीत बाजारात उतरविली आहे.