चिपच्या संकटावर TATA चा तोडगा; ३ राज्यांमध्ये २२५० कोटींची गुंतवणूक करणार, रोजगाराचीही निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 09:13 AM2021-11-29T09:13:39+5:302021-11-29T09:24:51+5:30

TATA Motors : कोरोना महासाथीचा वाहन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. यानंतर गाड्यांसाठी आवश्यक असलेल्या चिपचं संकटही निर्माण झालं होतं.

TATA Motors : कोरोना महासाथीचा (Coronavirus) वाहन क्षेत्राला (Auto Sector) मोठा फटका बसला होता. यानंतर गाड्यांसाठी आवश्यक असलेल्या चिपचं संकटही निर्माण झालं होतं. सेमीकंडक्टरच्या (Semiconductor) संकटामुळे अनेक ऑटो कंपन्यांच्या विक्रीत घट झाली होती.

चिपच्या संकटामुळे JLR च्या विक्रीवरही परिणाम झाल्याची माहिती यापूर्वी टाटा मोटर्सनं (Tata Motors) दिली होती. इतकंच नाही तक टाटाच्या अनेक गाड्यांची विक्रीही कमी झाली होती. परंतु आता या चिपच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी टाटानं मोठी तयारी केली आहे.

टाटा समुह सेमीकंडक्टर असेंबली प्लांट उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करू शकतो. यासाठी तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्ट युनिट उभारण्यासाठी चर्चा सुरू आहेत. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार कंपनी २२५० कोटी रूपयांती गुंतवणूक करू शकते.

टाटा समुह आऊटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंबली अँड टेस्ट म्हणजेच OSAT प्लांट सुरू करण्यासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांशी चर्चा करत आहे. तसंच या ठिकाणी प्रकल्पासाठी जमिनीच्या अधिग्रहणासाठीही चर्चा सुरू आहे. टाटा समुहानं काही महिन्यांपूर्वीच आपण सेमीकंडक्टर व्यवसायात एन्ट्री घेऊ शकतो, असं म्हटलं होतं.

टाटा समुह सॉफ्टवेअरच्या बाबतीत अग्रेसर आहे. परंतु आथा हार्डवेअरच्या बाबतीतही पुढे जाण्याची त्यांची इच्छा आहे. समुहाच्या कंपन्यांमध्ये पुढील वर्षाच्या अखेरस काम सुरू होऊ शकतं. तसंच यामुळे ४ हजार रोजगारही निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्या जगभरातील अनेक कंपन्या सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा सामना करत आहे. भारतात सणासुदीच्या कालावधीतही वाहनांच्या विक्रीत मोठी घट दिसून आली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून जगभरात सेमीकंडक्टरची कमतरता दिसून आली होती.

ही चिप म्हणजे एक पोर्ट डिव्हाईस आहे. याचा वापर डेटा साठवण्यासाठी केला जातो. ऑटोमोबाईल्स इंडस्ट्री पासून इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना या चिपच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.

इन्फोटन्मेंट सिस्टम, पॉवर स्टेअरिंग आणि ब्रेक ऑपरेट करण्यासाठी सेमीकंडक्टर चिप्सचा वापर केला जातो. नव्या वाहनांसाठी या चिप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. हायटेक वाहनांमध्ये अनेक प्रकारच्या चिप्सचा वापर केला होता. सेफ्टी फीचर्समध्येही चिप्सचा वापर केला जातो.

एकप्रकारे सेमीकंडक्टर्सना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मेंदू असं म्हटलं जातो. इतकंच नाही, तर आता ऑटो कंपन्या इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे वळत आहे. या वाहनांमध्ये सामान्य वाहनांच्या तुलनेत अधिक चिप्सची आवश्यकता आहे. चिप्सच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रीक वाहनांनाही फटका बसू शकतो.

सेमीकंडक्टर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते. सध्या जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे अन्य देशावर अवलंबून असून भारतात कोणतीही कंपनीची सेमीकंडक्टरचं उत्पादन करत नाही.

दरम्यान, अशा स्थितीत भारताला सेमीकंडक्टर निर्मितीचे जगातील दुसरे सर्वांत मोठे केंद्र बनण्याची चांगली संधी असल्याची प्रतिक्रिया यापूर्वी चंद्रशेखरन यांनी दिली होती. सेमीकंडक्टर म्हणजे एक प्रकारच्या सिलिकॉन चिप्स आहेत.

जगातील अनेक चिप उत्पादक कंपन्यांकडे चालू आर्थिक वर्षात मोठी मागणी आहे. कोरोनाच्या संकटामुळे याच्या निर्मितीवर परिणाम झाला आहे. परंतु आता वाढती मागणी कशी पूर्ण करावी हे त्यांच्यापुढील एक आव्हानआहे. चिपचं उत्पादन तैवानमध्ये केलं जातं. यामुळेच अनेक कंपन्या तैवानवरच अवलंबून आहेत.