CISF च्या ताफ्यात देशी कंपनीची अभेद्य कार; भूसुरुंगही ठरणार निष्प्रभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:47 PM2019-03-20T14:47:28+5:302019-03-20T14:50:48+5:30

देशाच्या जवानांना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ताफ्यावर होणारे दहशतवादी हल्ले, दगडफेक आणि आपत्कालीन काळात वापरण्यासाठी दणकट आणि अभेद्य वाहनांची गरज आहे. यासाठी भारतीय वाहन उत्पादित करणारी कंपनी महिंद्राने सुरक्षा दलांसाठी Mahindra Marksman हे बहुपयोगी वाहन तयार केले आहे. पहिल्या टप्प्यात हे वाहन दिल्ली विमानतळावर सुरक्षा पुरविणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) पुरविण्यात येणार आहे.

महिंद्राने नुकतेच सीआयएसएफला 6 वाहने दिली आहेत. सीआयएसएफ हे सुरक्षा दल देशाच्या महत्वाच्या संस्थांना सुरक्षा पुरविते. अणुउर्जा संशोधन केंद्रे, वीज निर्मिती केंद्रे, विमानतळ, बंदरे आणि संवेदनशील सरकारी आस्थापनांना संरक्षण देतात.

Mahindra Marksman मध्ये एकूण 6 जण बसू शकतात. यामध्ये दोन सीट पुढे आणि पाठीमागे 4 सीट आहेत. निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये असलेली ही महिंद्राची कॉम्बॅट कार नव्या B6 मानकांची पूर्तता करते. यामध्ये बसलेल्या व्यक्तींची छोटी शस्त्रे आणि हँड ग्रेनेडच्या हल्ल्यांपासून संरक्षण होणार आहे. तसेच भूसुरुंग स्फोटालाही न जुमानणारे हे वाहन आहे.

या वाहनामध्ये इंजिनांचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला 2.2 लीटर mHawk CRDe टर्बो डिझेल इंजिन जे 4 हजार आरपीएमवर 120 बीएचपी ताकद देते. तर दुसरे इंजिन 2.6 लीटर टर्बोचार्ज्ड DI इंजिन असून 3800 आरपीएमवर 115 बीएचपी ताकद प्रदान करते. दोन्ही इंजिनना 5 स्पीड गिअर बॉक्स आहे,

Marksman ला महिंद्राने स्कॉर्पिओच्या धर्तीवर बनविले आहे. मात्र, दणकटपणामुळे ही स्कॉर्पिओपेक्षा वजनाने जड आहे.