Defective number plate fine: सावधान! कारच्या नंबरप्लेटवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा लटकवला तर; 5000 रुपयांचे चलन फाडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 09:17 AM2021-09-15T09:17:02+5:302021-09-15T09:23:47+5:30

Defective number plate fine: रस्ते अपघात, वाईट नजरेपासून व संकटांपासून वाचण्यासाठी लोक अनेकदा कार, बाईक, टेम्पो सारख्या वाहनांवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा वगैरे बांधतात. पण यामुळे वेगळ्याच संकटात पडण्याचा धोका आहे.

लोकांची अंधश्रद्धा काही संपायचे नाव घेत नाही. रस्ते अपघात, वाईट नजरेपासून व संकटांपासून वाचण्यासाठी लोक अनेकदा कार, बाईक, टेम्पो सारख्या वाहनांवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा वगैरे बांधतात. काही लोक याचा गैरफायदा घेऊन गाडीच्या नंबरप्लेटवरच बांधतात किंवा लटकवतात. (Defective number plate fine 5000 rs in New RTO Rule )

वाहतूकीचे नियम तोडले तर कॅमेरामध्ये आपली नंबरप्लेट दिसू नये असा त्यांचा उद्देश असते. एकजरी नंबर लपला किंवा अक्षर लपले तरी वाहतूक पोलिसांना चलन काढता येत नाही. जरी अंदाजाने काढले तरी ते दुसऱ्याच वाहना मालकाला जाण्याची शक्यता असते.

आता अशा लोकांची काही खैर नाहीय. नव्या वाहतूक नियमांनुसार डिफेक्टिव्ह नंबर प्लेट असेल तर तब्बल 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अद्याप नवे नियम लागू झालेले नसले तरी दिल्लीत पोलिसांनी ही मोहिम हाती घेतली आहे.

अनेक लोक मुद्दामहून काळी पट्टी किंवा लिंबू मिर्ची, टेप किंवा रस्सी नंबरप्लेटवर बांधतात. यामुळे गाडीचा पूर्ण नंबर सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिसांचे कॅमेऱ्यांमध्ये दिसत नाही. यामुळे ऑनलाईन चलन काढण्यात समस्या येते. यामुळे दिल्ली पोलिसांनी या महाभागांना अद्दल घडविण्यासाठी मोठी मोहीम सुरु केली आहे.

महाराष्ट्रात अशा प्रकारचा दंड नसला तरीदेखील नंबर प्लेट लपविण्याचे प्रकारही होतात. काही जण मुद्दाम करतात किंवा काही अजाणतेपणी. जर तुम्हीदेखील असे केले असेल तर वाहतूक पोलीस तुम्हाला रस्त्यात थांबवून जुन्या दंडाची पावती आकारू शकतात.

महत्वाचे म्हणजे, या गंड्यादोऱ्यामुळे किंवा लिंबूमिर्चीमुळे जर तुमची कार, बाईक थांबविली आणि अन्य कागदपत्रे जरी तपासली त्यामध्ये काही चूक आढळली किंवा नसतील तर त्याचाही दंड तुम्हाला बसण्याची शक्यता आहे.

नवीन मोटर वाहन कायद्यानुसार डिफेक्टिव्ह नंबर प्लेट असेल तर 5000 रुपयांचा दंड आहे. तसेच हाय सिक्युरिटी नंबरप्लेट नसेल तरीदेखील 5000 रपयांची पावती फाडली जाते.

दिल्लीत तर पोलिसांनी लोकांनाचा अशा गाड्या दिसल्या की त्यांचे फोटो काढा आणि पोलिसांच्या सोशल मीडियावर पोस्ट करा, असे आवाहन केले आहे. अशाप्रकारे नंबर प्लेट लपवून या गाड्यांचा वापर गुन्ह्यांसाठी देखील केला जाण्याची शक्यता आहे.