कारचे मायलेज कमी झालेय तर या टीप्सचा अवलंब करा, फरक जाणवेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 10:45 AM2019-10-01T10:45:11+5:302019-10-01T10:48:00+5:30

कारची नियमित आणि वेळेवर सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. टायरमधील हवा, इंजिन ऑईल, स्पेअरपार्ट बदलणे गरजेचे आहे. यामुळे कारचे आय़ुष्य वाढण्यासोबत कार मायलेजही चांगले देते. खूप काळापासून सर्व्हिस केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यामुळे कारचे मायलेज चांगले असणे गरजेचे बनले आहे. नाहीतर खिशावर इंधनभार वाढत जाणार आहे. कोणालाही हेच वाटते की त्याच्या कारने चांगले मायलेज द्यायला हवे. कंपनीने दावा केल्याएवढे कार कधीच मायलेज देत नाही. जर तुमच्या कारचे मायलेज कमी झाले असेल किंवा कमी देत असेल तर काही गोष्टींची काळजी घेतल्यास हे मायलेज सुधारू शकते.

कार चालविण्याच्या सवयीवरही बऱ्याचदा मायलेज अवलंबून असते. यामुळे दोन एकसारख्या कार असूनही एक कार जास्त तर दुसरी कार कमी मायलेज देत असल्याचे अनेकदा ऐकायला मिळते. जर कार वेगाने चालविली तर कारच्या इंजिनावर दबाव वाढतो आणि इंधन जास्त जाळले जाते. 70 ते 80 च्या वेगाने कार चालविल्यास काही दिवसांतच लक्षात येईल की इंधन कमी लागत आहे.

एकसारखे गिअर बदलल्यानेही मायलेजवर परिणाम होतो. जर तुम्ही कार चालविताना कमीत कमी गिअर बदल केले तर इंदन कमी लागेल. यामुळे मायलेजमध्येही सकारात्मक बदल झाल्याचे लक्षात येईल.

सिग्नलवर कार सुरू ठेवली जाते. पण असे न करता मोठा सिग्नल असेल तर कार बंद करावी. यामुळे इंधन कमी लागेल. महिंद्रा स्कॉर्पिओ सारख्या गाड्यांना आपोआप इंजिन बंद होण्याची सोय आहे.

जर तुम्ही वाहतूक कोंडी नसलेल्या रस्त्यावरून गेला तर इंधन कमी लागेल. कारण तिथे गिअर बदलावे लागणार नाहीत. तसेच इंजिन कमी वेळ चालू राहिल्याने इंधनही कमी खर्ची पडेल. 1-2 किमीच्या कमी अंतरासाठी कार चालू बंद करणे शक्यतो टाळायला हवे.