१५ हजारांपर्यंत स्वस्त होणार Electric Scooter आणि मोटरसायकल; सरकारनं उचललं 'हे' पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 02:44 PM2021-06-12T14:44:45+5:302021-06-12T14:51:54+5:30

Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल. वाहनांच्या किंमती होणार कमी.

E-Vehicle : देशात इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकल (E-Two wheelers) स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी सध्याच्या FAME-2 स्कीममध्ये सुधारणा करत वाहनांना देण्यात येणारी सब्सिडी वाढवण्यात आली आहे.

आता इलेक्ट्रिक टू व्हिलर्ससाठी प्रति kWh वर मिळणारी १० रूपयांचं अनुदान वाढवून १५ हजार रुपये करण्यात आली आहे.

सरकारकडून अनुदानात वाढ केल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीस चालना मिळेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या दुचाकींच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर्स किंवा मोटरसायकल्स या २० टक्के अधिक महागड्या आहेत.

परंतु सरकार अनुदान वाढवून अधिकाधिक लोकांना इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्यास प्रोत्साहन देत आहे. यामुळे प्रदुषणाचा स्तर कमी करण्यासही मदत मिळेल.

नुकतीच Ather या कंपनीनं आपल्या फ्लॅगशिप 450x या स्कूटरच्या किंमतीत १४,५०० रूपयांची घट केली होती. याशिवाय Revolt या कंपनीनंदेखील आपल्या इ-बाईक्ससाठी नवी स्कीम आणली होती.

सरकारच्या यो घोषणेनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. FAME-2 नियमांमध्ये सुधारणा करून सरकार अनुदानाची किंमत गाड्यांच्या किंमतीच्या ४० टक्क्यांपर्यंत घेऊन जाऊ इच्छित आहे.

तसंच मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बस आणि तीन चाकी वाहनांच्या खरेदीच्याही विचारात आहे. EESL ला लवकरच तीन लाख इलेक्ट्रिक इ-रिक्षा खरेदी करण्याचे निर्देशही दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याचा निरनिराळ्या सेगमेंटमध्ये वापर करण्यात येणार आहे. EESL च्या म्हणण्यानुसार मुंबई, पुणे, सूरत, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये ई बसची एकूण मागणी किती आहे याची माहिती घेतली जाईल.

सद्यस्थितीत गुजरात, दिल्ली आणि नागपुरमध्ये सर्वाधिक ई-बसेस आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर त्या २०० किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात. यामध्ये बॅटरी बदलण्याचीही सुविधा आहे. तसंच सिंगल चार्जवर त्या पूर्ण दिवसही चालू शकतात.