विना ड्रायव्हिंग लायसन्स चालवता येणार 'ही' Electric Bike; ७ रूपयांत १०० किमी जाणार, पाहा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:15 PM2021-09-05T18:15:23+5:302021-09-05T18:20:17+5:30

Electric Bike : सध्या Electric Vehicles कडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या पेट्रोलच्या किंमती वाढत असल्यानं ग्राहक अन्य पर्यायांकडे वळताना दिसत आहेत.

सध्या इंधनाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दरही सध्याच्या उच्चांकी स्तरावर आहेत. यामुळेच ग्राहक अन्य पर्यायांकडे वळताना दिसत आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आता अनेक कंपन्याही आता इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाकडे वळत आहेत. प्रामुख्यानं लोकांचा इलेक्ट्रीक दुचाकी घेण्याकडे कल वाढत आहे.

सध्या, अनेक वाहन उत्पादक बाजारात, विशेषत: दुचाकी विभागात इलेक्ट्रीक वाहनं लाँच करण्याचे प्रयत्न करत आहेत. काही दिग्गज प्लेअर्स या विभागात नवीन मॉडेल सादर करत असताना, स्टार्टअप्स देखील मागे नाहीत.

हैदराबाद स्थित स्टार्टअप Atumobile प्रायव्हेट लिमिटेडने नुकतीच आपली नवीन इलेक्ट्रीक बाईक Atum 1.0 सादर केली, ज्याची सुरुवातीची किंमत 49,999 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.

ही देशातील सर्वात परवडणारी कॅफे रेसर इलेक्ट्रीक बाईक आहे, जी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे देशभरात उपलब्ध आहे. कंपनीने या बाईकमध्ये पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास लागतात. कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका चार्जमध्ये 100 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

या बाईकच्या बॅटरीसोबत 2 वर्षांची वॉरंटीही दिली जात आहे. या बाईकची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही. वास्तविक, या बाईकचा टॉप स्पीड किमान ठेवण्यात आला आहे.

या बाईकमध्ये 6 किलोची बॅटरी आहे आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त 1 युनिट वीज लागते. ज्यासाठी तुम्हाला साधारणपणे 6 ते 7 रुपये खर्च करावे लागतील. या अर्थाने, ही बाईक फक्त 7 रुपयांमध्ये 100 किमी पर्यंतची रेंज देईल.

दिल्लीत या बाईकची एक्स-शोरूम किंमत 49,999 रुपये आहे. याशिवाय आरटीओसाठी 2,999 रुपये आणि विम्यासाठी 1,424 रुपये खर्च करावे लागतील. त्यानुसार, दिल्लीत त्याची ऑन-रोड किंमत 54,422 रुपये आहे. ही किंमत माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार देण्यात आली आहे. दरम्यान, निरनिराळ्या राज्यांमध्ये या बाईकची किंमत निराळी असू शकते.