गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 01:15 PM2021-09-28T13:15:42+5:302021-09-28T13:23:03+5:30

Hurricane Gulab hits Aurangabad : औरंगाबाद शहराला मंगळवारी सकाळी गुलाब चक्रीवादळाचा फटका बसला. जोरदार वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने शहराची दाणादाण उडाली.

शहरातील अनेक भागांतील झाडे उन्मळून पडली. यात काही ठिकाणी वाहनांचा अक्षरशा: चुराडा झाला. अनेन भागांतील घरांत पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

विश्रांतीनगर, जयभवानीनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील भागांतील अनेक घरांमध्ये पाणी घुसले. कैलासनगर येथे घरांमध्ये पाणी शिरले. गोमटेशन मार्केट परिसरातील सिंगापूर काॅम्प्लेक्स, पारनदरीबा रोडवरील गोवर्धन काॅम्प्लेक्स, व्ही. के. हाईट्समध्ये तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मोटारीने पाणी काढण्यासाठी नागरिकांची दमछाक झाली.

विद्यानगर येथील वेदमंत्रा अपार्टमेंटसमोर तसेच अलंकार सोसायटी, समर्थ अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले. नाल्याचा प्रवाह वाढल्याने क्रांतीचौक वार्डातील सिद्धेश्वरनगर भागात पाणी शिरले होते. मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन नाल्याचा प्रवाह वाहता केला.

शहानूरमियाँ दर्गा परिसरातील तळमजल्यातील अनेक दुकानांत पाणी शिरले. मोंढा, सिडकोतील घरांमध्ये, दुकानांमध्येही पाणी घुसल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने उल्कानगरी येथे उन्मळून पडले. औरंगपुरा येथेही झाड पडण्याची घटना घडली. सरस्वती भुवन महाविद्यालय परिसरातदेखील झाड कोसळले. भीमनगर, टाऊन हाॅल येथे एका घरावर झाड पडले. घाटी रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थान परिसरातील दोन झाडे पडली. जिल्हा परिषदेच्या आवारातील झाडही पडले.

सर्व ठिकाणी मनपाच्या उद्यान विभाग आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य करीत रस्त्यावरील झाडे बाजूला करून वाहतूक कोंडी सोडविली.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, कार्यकारी अभियंता फड, काकडे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मदत कार्य केले.

Read in English