परभणी : दमदार पावसाने ओढे-नाल्यांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:16 AM2019-09-21T00:16:26+5:302019-09-21T00:16:36+5:30

यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जिल्हावासियांना समाधान देणारा पाऊस गुरुवारी रात्री सर्वदूर बरसला असून या पावसामुळे जिल्ह्यातील ओढ्या-नाल्यांना प्रथमच खळखळून पाणी वाहिले आहे. जिल्हाभरात सरासरी ३७.५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत ६६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Parbhani: Water overflowing drains with strong rain | परभणी : दमदार पावसाने ओढे-नाल्यांना पाणी

परभणी : दमदार पावसाने ओढे-नाल्यांना पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जिल्हावासियांना समाधान देणारा पाऊस गुरुवारी रात्री सर्वदूर बरसला असून या पावसामुळे जिल्ह्यातील ओढ्या-नाल्यांना प्रथमच खळखळून पाणी वाहिले आहे. जिल्हाभरात सरासरी ३७.५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत ६६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच खंड स्वरुपाचा पाऊस होत राहिला. अधुन-मधून झालेल्या पावसामध्ये फारसा दम नसल्याने नागरिकांच्या चिंता वाढत होत्या. आॅगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. एकही वाहवनी पाऊस झाला नसल्याने पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पिकेही धोक्यात आली होती. अशा परिस्थितीत दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने पिकांना दिलासा मिळाला असला तरी प्रकल्प कोरडे असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम होता. अजूनही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे पाण्याची चिंता कायम आहे.
गुरुवारी रात्री ९ वाजेनंतर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. सर्वदूर हा पाऊस बसरला. परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम या तालुक्यांमध्ये जोरदार वृष्टी झाली. त्यामुळे लहान-मोठ्या ओढ्या-नाल्यांना खळखळून पाणी वाहिले. पहिल्यांदाच शेतशिवारातून पाणी बाहेर पडल्याने शेतकऱ्यांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी घेतलेल्या नोंदीनुसार पालम तालुक्यात सर्वाधिक सरासरी ६१.६७ मि.मी.पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यात ५६.६० मि.मी., पाथरी ५२ मि.मी., मानवत ३५.६७ मि.मी., सेलू २८.६० मि.मी., जिंतूर २८ मि.मी., सोनपेठ २७ मि.मी., गंगाखेड २५.२५ मि.मी. आणि परभणी तालुक्यात २३.५० मि.मी.पाऊस झाला आहे.
परभणी शहरात पावसाच्या पाण्याने कोसळला पूल
४परभणी शहरातील डनलॉप रोड भागातून वाहणाºया डिग्गी नाल्यावरील ३० ते ४० वर्षांपूर्वीचा पूल पावसाच्या पाण्याने कोसळल्याची घटना २० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
४सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीही हानी झाली नाही. शहरातील विविध भागातून हा डिग्गी नाला वाहतो. गव्हाणे चौकातून अष्टभूजा देवी मंदिराकडे येणाºया डनलॉप रोडवर डिग्गी नाल्यावर पूला बांधलेला आहे.
४गुरुवारी रात्री शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे डिग्गी नाल्याला पूर आला. नाल्यातील पाण्याचा वेग वाढत गेला आणि पाण्याच्या दाबामुळे पुलाखालील पायाचा भाग खचल्याने २० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हा पूल कोसळला.
४त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान महानगरपालिकेला या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरीकेटींग करण्यात आले.
४शुक्रवारी दुपारी जेसीबी मशीनच्या साह्याने खचलेल्या पुलाच्या सिमेंट काँक्रेटचे भाग बाजूला करण्याचे काम सुरू होते. दरम्यान गव्हाणे चौक ते आर.आर. टॉवर हा रस्ता वर्दळीचा आहे.
४या रस्त्यावरुन अनेक वेळा जड वाहनेही नेली जातात. पूल जुना झाला असल्याने या मार्गावरील वाहतूक धोक्याची ठरत होती. घटना घडली, त्यावेळी या मार्गावरुन वाहतूक होत नव्हती. त्यामुळे मोठी हानी टळली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
तरीही महानगरपालिकेचे दुर्लक्ष...
४हा पूल ३० ते ४० वर्षांपूर्वीचा जुना असून, आधीच खचला होता. या पुलावरुन मोठी वाहतूक असते. दोन ते अडीच महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने खचलेल्या या पुलाचे छायाचित्रही प्रकाशित केले होते.
४त्यावेळी हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र वेळीच दुरुस्ती झाली नाही. परिणामी शुक्रवारी पूल कोसळण्याची घटना घडली.
रस्त्यांना आले तळ्याचे स्वरुप
४सोनपेठ- गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील तीनही प्रमुख मार्गावर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. रस्त्यांच्या प्रश्नावरुन सोनपेठ तालुका नेहमीच चर्चेत असतो.
४ शहरातून जाणाºया पाथरी, परळी, गंगाखेड रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून थोडाही पाऊस पडला की या खड्ड्यांना तळ्याचे स्वरुप येते. सोनपेठ- गंगाखेड रस्त्यावरील शिवाजी चौकात मोठी वर्दळ असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.
४सोनपेठ- पाथरी रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेच्यासमोर खड्ड्यात अशाच प्रकार पाणी साचत आहे. परळी- सोनपेठ रस्त्यावरही बसस्थानकाच्या काही अंतरावर खड्डे पडले असून त्यातही पाणी साचत आहे. याचा त्रास वाहनधारकांना होत आहे.
खळीत भिंत कोसळली
४गंगाखेड तालुक्यातील खळी येथे गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. गुरुवारी मध्यरात्री गावातील मुंजाभाऊ कुगे यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने यात कसलीही जिवीत हानी झाली नाही; परंतु, कुगे यांचे नुकसान झाले आहे. शिवाय ही भिंत रस्त्यावर पडल्याने गावातील रस्ता शुक्रवारी बंद झाल्याचे पहावयास मिळाले.
तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी
४गुरुवारी रात्री जिल्ह्यातील तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात पालम तालुक्यातील बनवस मंडळामध्ये सर्वाधिक ११० मि.मी. म्हणजे ४ इंच पाऊस झाला आहे. तर पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळामध्ये ६६ मि.मी. आणि चुडावा मंडळामध्ये ८९ मि.मी. पाऊस झाला.
४परभणी तालुक्यात झरी मंडळात सर्वाधिक ३६ मि.मी. पाऊस झाला आहे. गंगाखेड तालुक्यात गंगाखेड आणि राणीसावरगाव या दोन मंडळांमध्ये प्रत्येकी ३० मि.मी., सोनपेठ तालुक्यात सोनपेठ मंडळात ४१ मि.मी., सेलू तालुक्यात देऊळगाव मंडळात ३५ मि.मी.
४ पाथरी तालुक्यात पाथरी मंडळात ५९ मि.मी., हादगाव मंडळात ५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिंतूर तालुक्यामध्ये सावंगी म्हाळसा मंडळात सर्वाधिक ५७ मि.मी. तर मानवत तालुक्यात मानवत मंडळात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस झाला आहे.
पालम तालुक्यातील तिन्ही नद्यांना पूर
४पालम- गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तालुक्यात जोरदार पाऊस झाला. बनवस परिसरात अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले असून तब्बल चार तास पावसाने या भागाला झोडपून काढले आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातून वाहणाºया गळाटी, लेंडी आणि सेलू-पेंडू या तिन्ही नद्यांना पूर आला आहे.
४मागील तीन दिवसांपासून तालुक्यातील बारा गावांचा संपर्क तुटलेला आहे. २० सप्टेंबर रोजी पुराचे पाणी आल्याने दुपारच्या ३ वाजेपर्यंत गावांचा संपर्क तुटलेला होता. जोरदार पावसामुळे बनवस, गिरधरवाडी, चोरवड, मोजमाबाद, रामापुर तांडा या भागामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तीन दिवसांपासून बारा गावे संपर्काबाहेर
४पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने बारा गावांचा शहराशी असलेला संपर्क तीन दिवसांपासून तुटलेला आहे. पालम शहरापासून काही अंतरावर ही नदी वाहते. या नदीवरील पूल कमी उंचीचा असल्याने थोडाही पाऊस झाल्याने गावाचा संपर्क तुटतो.
४बुधवारी सकाळी अहमदपूर तालुक्यात झालेल्या पावसाचे पाणी नदीपात्रात आल्याने या नदीला पूर आला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा पालम तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे १२ गावांचा संपर्क तीन दिवसांपासून तुटला आहे.
जिंतूर तालुक्यात नदी-नाल्यांना पाणी
४जिंतूर तालुक्यात प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पाणी आले. विशेष म्हणजे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत फारसी वाढ झाली नाही. यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही.
४१९ सप्टेंबर रोजी रात्री २८ मि.मी. पाऊस झाला आहे. २० सप्टेंबरपर्यंत ४६८.३३ मि.मी.पाऊस झाला असून या दिवसापर्यंत किमान ७०१.३४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. मात्र २३३ मि.मी. पाऊस कमी झाला आहे.
सेलू तालुक्यात दमदार हजेरी
४सेलू- अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात रात्री १० वाजेच्यासुमारास विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. १ तास मेघगर्जनेसह पाऊस झाला. सेलू मंडळात ३२ मि.मी., देऊळगाव ३५, कुपटा २६, वालूर २८ आणि चिकलठाणा मंडळामध्ये २२ मि.मी. पाऊस झाला आहे.

Web Title: Parbhani: Water overflowing drains with strong rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.