परभणी : १५७४ मंडळांनी केले श्रींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:34 AM2019-09-14T00:34:39+5:302019-09-14T00:35:58+5:30

महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेशमूर्तीचे गणेशभक्तांच्या अपुर्व उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गुरुवारी जिल्ह्यातील १ हजार ५७४ मंडळांनी विसर्जन केले. जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Parbhani: Three boards made immersion of Shri | परभणी : १५७४ मंडळांनी केले श्रींचे विसर्जन

परभणी : १५७४ मंडळांनी केले श्रींचे विसर्जन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेशमूर्तीचे गणेशभक्तांच्या अपुर्व उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गुरुवारी जिल्ह्यातील १ हजार ५७४ मंडळांनी विसर्जन केले. जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
परभणी शहरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास श्रींच्या विसर्जन मिरवणुकीस विविध गणेश मंडळांकडून सुरुवात झाली. शहरातील मोठा मारुती देवस्थानच्या मानाच्या गणेश मंडळाची मिरवणूक सायंकाळी ७ वाजता निघाली. ही मिरवणूक क्रांती चौक, गांधी पार्क, गुजरी बाजारमार्गे शिवाजी चौकात दाखल झाली. येथे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, देवस्थानचे अरविंद देशमुख, बाळासाहेब देशमुख, गंगाप्रसाद आणेराव, सुनील देशमुख, परळीकर आदींची उपस्थिती होती. यानंतर राजे संभाजी गणेश मंडळ, सुवर्णकार गणेश मंडळ, न्यू बालाजी गणेश मंडळ, ओम गणेश मंडळ आणि सिंधी गणेश मंडळाच्या मिरवणुका दाखल झाल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची उपस्थिती होती. विविध राजकीय पक्षांनी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी स्टेज उभारले होते. ढोल-ताशाच्या गजरात गणेश भक्तांकडून जल्लोष साजरा करीत गणरायाला निरोप देण्यात आला. वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदात मुर्र्तींचे विसर्जन करण्यात आले.
जिल्ह्यात २ ते १२ सप्टेंबर या कालावधीत उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील शहरी भागात ४१६ तर ग्रामीण भागात १ हजार २६४ गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्यातील १ हजार ५७४ गणेश मंडळांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले. त्यामध्ये परभणी शहरातील १२५, ग्रामीण ठाण्यांतर्गत ५५, दैठणा ठाण्यांतर्गत ८१, ताडकळस अंतर्गत ६८, पूर्णा ठाण्यांतर्गत ६७, चुडावा ठाण्यांतर्गत ६२, पालम ठाण्यांतर्गत ९४, गंगाखेड ठाण्यांतर्गत १७९, सोनपेठ ठाण्यांतर्गत ५१, पिंपळदरी ठाण्यांतर्गत ५८, मानवत ठाण्यांतर्गत ७३, पाथरी ठाण्यांतर्गत ६२, सेलू ठाण्यांतर्गत १७९, जिंतूर ठाण्यांतर्गत १२०, चारठाणा ठाण्यांतर्गत ६५, बोरी पोलीस ठाण्यांतर्गत ४३ आणि बामणी पोलीस ठाण्यांतर्गत ७८ गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांच्या सर्तकतेने तणाव निवळला
४परभणीतील शिवाजी चौकात शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांनी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी स्टेज उभारला होता. याच स्टेजच्या काही अंतरावर सुरेश नागरे समर्थकांच्या वतीने स्टेज उभारण्यात आला होता. यावेळी दोन्ही बाजुकडून जोरदार घोषणाबाजी झाली.
४याबाबतची माहिती मिळताच याच परिसरात बंदोबस्तावर असलेले पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षकांना पाहताच घोषणाबाजी थांबली. घोषणाबाजी करणारे काही जण तातडीने गायब झाले. त्यानंतर या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही.
परभणी शहरातील सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मनपाच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कृत्रिम हौद तयार करण्यात आला होता. या हौदात विविध मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले.
विसर्जन करताना दोघे विहिरीत पडले
४मानवत- शहरातील नियोजित विहिरीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करताना तोल जावून दोन युवक विहिरीत पडल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. उपस्थितांनी तातडीने धाव घेऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढल्याने संकट टळले.
४मानवत शहरातील नृसिंह गणेश मंडळाचे सदस्य श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास सुभाष विद्यालयाजवळ असलेल्या विहिरीजवळ आले. यावेळी मंडळाच्या सदस्यांनी काही तरुणांना मूर्ती उचलण्यासाठी मदतीकरीता बोलावले. मूर्ती ट्रॅक्टरवरुन खाली घेत असताना मूर्तीचे वजन जास्त असल्याने व मूर्तीचा भार सहन न झाल्याने तोल जावून मंडळाचे सदस्य दीपक पाटील आणि नितीन कुमावत विहिरीत पडले. याचवेळी उपस्थित सदस्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने दोन्ही तरुणांना विहिरीतून बाहेर काढले. यामधील दीपक पाटील यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
संजय जाधव- आनंद भरोसेंनी खेळली फुगडी
४गांधी पार्क भागात गणेश भक्तांच्या स्वागतासाठी भाजपाच्या वतीने स्टेज उभारण्यात आला होता. यावेळी स्टेजवरील उपस्थित महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांची खा.जाधव यांनी भेट घेतली. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भरोसे आणि खा. जाधव यांनी फुगडी खेळली. त्यानंतर भाजपाच्या स्टेजला आ.डॉ.राहुल पाटील यांनी भेट दिली. यावेळी आ.पाटील व भरोसे यांच्यात हस्तांदोलनही झाले.

Web Title: Parbhani: Three boards made immersion of Shri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.