परभणी : ४० हजार युवकांनी दिली चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:44 PM2020-01-13T23:44:10+5:302020-01-13T23:46:09+5:30

भारतीय सैन्य दलातील तीन पदांसाठी ९ दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेंतर्गत ९ जिल्ह्यांतील तब्बल ४० हजार ५०० युवकांनी परभणी येथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांसमोर शारीरिक क्षमतेची चाचणी दिली आहे़

Parbhani: Thousands of youths pass the test | परभणी : ४० हजार युवकांनी दिली चाचणी

परभणी : ४० हजार युवकांनी दिली चाचणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारतीय सैन्य दलातील तीन पदांसाठी ९ दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेंतर्गत ९ जिल्ह्यांतील तब्बल ४० हजार ५०० युवकांनी परभणी येथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांसमोर शारीरिक क्षमतेची चाचणी दिली आहे़
परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ४ ते १३ जानेवारी या काळात भारतीय सैन्य भरती प्रक्रिया पार पडली़ सैन्य भरतीच्या निमित्ताने राज्यातील ९ जिल्ह्यांमधून हजारो युवक दररोज परभणी शहरात दाखल होत होते़ सैन्य दलातील सोल्जर टेक्नीकल, सोल्जर जनरल ड्युटी आणि ट्रेडसमन या तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली़ राज्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि बुलडाणा ९ जिल्ह्यांसाठी परभणी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून परभणी शहरात या भरती प्रक्रियेचे आयोजन केले होते़ १० दिवसांमध्ये ८ जानेवारीचा एक दिवस वगळता दररोज रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या़ या शारीरिक चाचण्यामध्ये धावणे, लांब उडी, नागमोडी वाटांवरून चालणे अशा अवघड कसरती उमेदवारांकडून करून घेण्यात आल्या़ विशेष म्हणजे रात्री १२ वाजेपासून या भरती प्रक्रियेला प्रारंभ होत होता़ त्यामुळे रात्रभर उमेदवारांना जागरण करावे लागले़ याच काळात वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला होता़ अशा थंडगार वातावरणात उमेदवारही देखील जिद्दीने भरती प्रक्रियेला सामोरे गेले़
१३ जानेवारी रोजी या भरती प्रक्रियेची सांगता झाली़ या काळामध्ये किती उमेदवारांची शारीरिक चाचणी? किती उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी निवडले गेले? या विषयी उत्सुकता लागली होती़ भरती प्रक्रियेचे संचालक असलेले कर्नल तरुण जामवाल यांच्याशी या संदर्भात संवाद साधला असता ते म्हणाले, परभणी जिल्ह्यात होणाºया या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन ६५ हजार युवकांनी अर्ज दाखल केले होते़ या सर्व उमेदवारांना भरतीसाठी आॅनलाईन प्रवेश पत्रही देण्यात आले़ ९ दिवसांच्या काळात ४० हजार ५०० उमेदवारांची प्रत्यक्ष शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे़ या शारीरिक चाचणीतून सुमारे ४ हजार विद्यार्थी वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरले असून, अजूनही त्यात वाढ होत आहे़ वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवेश पत्र दिले जाणार आहे़ २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे ही लेखी परीक्षा होणार असल्याचे जामवाल यांनी सांगितले़ एकंदर या प्रक्रियेमुळे परभणी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते़
कोल्हापूरपेक्षाही परभणीत मिळाला चांगला प्रतिसाद
४परभणी येथील भरती प्रक्रियेपूर्वी कोल्हापूर येथे सैन्य दलाची भरती प्रक्रिया पार पडली आहे़ मात्र कोल्हापूरच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात सैन्य भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला़ तसेच मागील भरतीच्या तुलनेत यावर्षी सैन्य दलात दाखल होण्याची इच्छा बाळगणाºया उमेदवारांची संख्या वाढली आहे़ विशेष म्हणजे अनेक उमेदवारांनी धावण्याची चाचणी वेळेत पूर्ण केली़ त्यावरून हे उमेदवार पूर्ण तयारीनिशी भरती प्रक्रियेसाठी आल्याचेही या संपूर्ण प्रक्रियेवरून लक्षात येते़ परभणीतील वातावरण चांगले आहे़ जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले नाहीत़ त्यांच्यात किमान शिस्तीचे वातावरण रुजले जाणार असून, या उमेदवारांनी या पुढेही चांगली तयारी करावी, असे आवाहन मेजर विजय पिंगळे यांनी केले़
चार वर्षानंतर भरती प्रक्रिया
परभणी जिल्ह्यात यापूर्वी २०१४ मध्ये सैन्य दलाची भरती प्रक्रिया पार पडली़ त्यानंतर ४ वर्षानंतर ही भरती प्रक्रिया घेण्यात आली़ येथून पुढे दर तीन वर्षांनी परभणीत सैन्य भरती होणार असल्याने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे़

Web Title: Parbhani: Thousands of youths pass the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.