Parbhani theatrology; Work schedule for the week | परभणील नाट्यगृह;आठवडाभरात कार्यारंभ आदेश
परभणील नाट्यगृह;आठवडाभरात कार्यारंभ आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील नाट्यगृहासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या आठवडाभरात या कामाचे कार्यारंभ आदेश दिले जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.
परभणी शहरातील नटराज रंगमंदिराची दुरवस्था झाल्याने मागील चार वर्षांपासून हे रंगमंदिर बंद असून जिल्ह्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांना खीळ बसली आहे. नटराज रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप या रंग मंदिराची दुरुस्ती झाली नाही.
दुसरीकडे शहरासाठी नव्याने नाट्यगृहाचे बांधकाम करण्यास महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरात लवकरच अद्ययावत अशा नाट्यगृहाची उभारणी होईल, अशी सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांना अपेक्षा होती. मात्र नाट्यगृहाची प्रतीक्षा दिवसेंदिवस लांबत गेली. या नाट्यगृहासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर प्रत्यक्षात नाट्यगृहाच्या उभारणीसाठी १७ ते १८ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येत आहे. त्यामुळे काही काळ निधीची प्रतीक्षा करण्यात गेला. त्यानंतर नाट्यगृहासाठी जागेचा प्रश्नही निर्माण झाला होता. शहरातील अनेक शासकीय जागांचा पर्याय शोधण्यात आला. त्यात बराच कालावधी गेल्यानंतर स्टेडियम कॉम्प्लेक्ससमोरील बचतभवनची जागा नाट्यगृहासाठी निवडण्यात आली. त्यामुळे जागा आणि ५० टक्के निधीचा प्रश्न निकाली निघाल्याने किमान या नाट्यगृहाचे कामकाज सुरु होईल, अशी अपेक्षा होती; परंतु, मध्यंतरीच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नाट्यगृह उभारणीच्या प्रक्रियेला पुन्हा विलंब होत गेला.
काही महिन्यांपूर्वीच या नाट्यगृहासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली असून ती आता अंतिम झाली आहे. नाट्यगृह उभारणीसाठी निविदाधारकाची निवडही झाली असून येत्या आठवडाभरात संबंधित निविदाधारकाला प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात नाट्यगृहाच्या उभारणीचा दुसरा टप्पाही सुरू होणार असून जिल्ह्यातील सांस्कृतिक प्रेमी नागरिकांची नाट्यगृहाअभावी होणारी अडचण येत्या काही महिन्यांमध्येच दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आठ कोटींसाठी पाठपुराव्याची गरज
४परभणी शहरात नाट्यगृह उभारण्यासाठी महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला असून त्यासाठी १८ कोटी १६ लाख ३९ हजार रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाने या नाट्यगृहासाठी १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. उर्वरित ८ कोटी १६ लाख ३९ हजार रुपयांची महापालिकेला आवश्यकता आहे.
४हा निधी राज्य शासनाकडून प्राप्त करुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळेत पाठपुरावा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या महापालिकेला १० कोटी रुपये प्राप्त असले तरी संपूर्ण कामाची निविदा काढून नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
असे असेल परभणी शहरातील नवीन
नाट्यगृह
४परभणी शहरात उभारल्या जाणाऱ्या नाट्यगृहाचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यात ७९६९९.३२ चौरस फुट जागेवर या नाट्यगृहाची उभारणी केली जाणार असून त्यामध्ये ४७५२९.९३ चौरस फुट जागेवर बांधकाम केले जाणार आहे.
४१२७५ चौरस मीटरचे अंतर्गत वाहनतळ आणि ३०० चौरस मीटरचे खुले वाहनतळ तयार केले जाणार आहे. २ हजार चौरस मीटरचा तळमजला तसेच १ हजार चौरस मीटरचा पहिला मजला आणि ६७५ चौरस मीटरचा दुसºया मजल्याचे बांधकाम राहणार आहे.


Web Title: Parbhani theatrology; Work schedule for the week
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.