Parbhani: ST bus run after 25 years | परभणी : २५ वर्षानंतर धावली एसटी मंडळाची बस
परभणी : २५ वर्षानंतर धावली एसटी मंडळाची बस

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी) : विद्यार्थी, शेतकरी, कामगार व ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून तालुक्यातील देगाववासियांना त्यांच्या हक्काची बस १८ जूूनपासून मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी २५ वर्षानंतर बसने प्रवास करण्याचा आनंद घेतला.
देगाव (तेल्याचे) हे गाव पूर्णा शहरापासून ६ ते ७ कि.मी. अंतरावर आहे. या गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पूर्णा शहरात दररोज ये-जा करतात. त्याचबरोबर २०० च्या आसपास तरूण नांदेड ते देगाव कामासाठी ये-जा करतात. पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावर आड मार्गावर हे गाव असल्याने या गावातील विद्यार्थी, शेतकरी, कामगारांना ये-जा करण्यासाठी वाहन मिळत नसल्याने मोठी अडचण होत होती.
२५ वर्षापूर्वी या गावातून परभणी आगाराची बस धावत होती; परंतु, काही कारणाने ती बस बंद झाली. त्यानंतर देगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन मागील महिन्यात परभणी परिवहन विभागाकडे गावात बससेवा सुरु करण्याची मागणी केली. खा. संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी पाठपुरावा केला. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन १८ जूनपासून परभणी ते देगाव बससेवेस सुरुवात झाली.
ही बस परभणी, सिंगणापूर, ताडकळस, पूर्णा मार्गे देवगाव अशी धावणार आहे. दररोज रात्री देगाव येथे एक बस मुक्कामी राहणार आहे. सकाळी ७ वाजता ती परतीच्या प्रवासाला धावणार आहे. या बससेवेमुळे विद्यार्थी, ग्रामस्थ व व्यावसायिकांची मोठी सोय झाली आहे.
बससेवा सुरू झाल्यानंतर बुधवारी सकाळी गावातील विद्यार्थ्यांनी बस प्रवासाचा आनंद घेतला. यावेळी पोलीस पाटील प्रकाश इंगोले, रुस्तूम बनसोडे, गणेश इंगोले, जीवन इंगोले, गणेश वळसे, बाळू इंगोले, बाबाराव गव्हाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, पूर्णा तालुक्यातील देगाव येथे २५ वर्षांपासून बससेवा सुरू नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांंना व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. बससेवेअभावी गावातील अनेक विद्यार्थिनींचे शिक्षणही थांबले होते. त्यामुळे २५ वर्षानंतर बुधवारी पहिल्यांदाच गावात आलेली बस पाहण्यासाठी बच्चे कंपनीसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
सिंगणापूर-ताडकळसला होणार फायदा
पूर्णा तालुक्यातील देगाव येथे २५ वर्षांनंतर एसटी महामंडळाच्या परभणी आगाराने परभणी-देगाव ही बससेवा सुरू केली. या बससेवेमुळे ताडकळस, सिंगणापूर या दोन महत्त्वाच्या गावातील प्रवाशांनाही या बससेवेचा फायदा होणार आहे. त्यामुळे ताडकळस व सिंगणापूर येथील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. २५ वर्षानंतर सुरू झालेली परभणी-देगाव ही बस एसटी महामंडळाच्या परभणी आगाराने कायमस्वरुपी सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.


Web Title: Parbhani: ST bus run after 25 years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.