परभणी : चोरट्या प्रवेशाने वाढती डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:07 AM2020-04-23T00:07:59+5:302020-04-23T00:09:13+5:30

पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांचा ओढा जिल्ह्याकडे वाढला आहे़ हे नागरिक जिल्ह्यात प्रवेश करताना मुख्य सीमाबंदी नाके टाळून चोरट्या मार्गाचा वापर करीत आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर ही डोकेदुखी निर्माण झाली आहे़

Parbhani: Increased headaches due to smuggling | परभणी : चोरट्या प्रवेशाने वाढती डोकेदुखी

परभणी : चोरट्या प्रवेशाने वाढती डोकेदुखी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांचा ओढा जिल्ह्याकडे वाढला आहे़ हे नागरिक जिल्ह्यात प्रवेश करताना मुख्य सीमाबंदी नाके टाळून चोरट्या मार्गाचा वापर करीत आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर ही डोकेदुखी निर्माण झाली आहे़ नव्याने जिल्ह्यात प्रवेश केलेल्या नागरिकांना शोधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गावांमधील ग्रामसुरक्षा दलांना अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे़ जिल्हा सीमांवरील नाक्यांच्या कार्यक्षमतेविषयी ‘लोकमत’ ने बुधवारी स्टिंग आॅपरेशन केले, तेव्हा या नाक्यांवर पथक कार्यरत असल्याचे पाहावयास मिळाले़ वाहनांची तपासणीही केली जात होती़ मात्र याच नाक्यांच्या परिसरातून अनेक जण जिल्ह्यात प्रवेश मिळवित आहेत़ त्यांच्या तपासणीबाबत मात्र परिस्थिती अलबेल असल्याचेच दिसून आले़
परवाना नसल्याने थांबविले ८ ट्रक
४देवगावफाटा : जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी जाणारे ८ ट्रक जालना जिल्हा प्रशासनाचा परवाना नसल्याने देवगावफाटा येथील नाक्यावर २२ एप्रिल रोजी थांबविण्यात आले़ जिल्ह्यातील ८ हायवा ट्रक कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी भोकरदन येथे जात होते़ हे ट्रक बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील नाक्यावर थांबविण्यात आले़ ट्रक चालकाकडे कागदपत्राची तपासणी केली असता, कन्स्ट्रक्शनच्या कामाला जात असल्याची कागदपत्रे किंवा जालना जिल्हा प्रशासनाचा परवाना या चालकांकडे नव्हता़ त्यामुळे ते आठही ट्रक देवगाव फाटा येथे थांबविण्यात आले़ परवाना आणल्यानंतरच ट्रक सोडण्याचा पवित्रा पथकातील कर्मचाऱ्यांनी घेतला़ त्यामुळे या वाहनांना प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा लागली आहे़ याच वेळी सांगली जिल्ह्यातून मंठा शहराकडे जाणारा एक आयशर ट्रकही कर्मचाऱ्यांनी थांबविला़ या ट्रकमध्ये २० ऊसतोड कामगार होते़ हे कामगार सांगली येथील साखर कारखान्यातून आले होते़ या कामगारांकडे कारखाना प्रशासनाचा परवाना तसेच वैद्यकीय कागदपत्रे असल्याने खात्री पटल्यानंतर हा ट्रक मंठ्याकडे रवाना करण्यात आला़
पोलीस अधीक्षकांकडून वाहनांची तपासणी
परभणी : शहरातील विसावा नाका येथे २२ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी स्वत: रस्त्यावर उभे राहून वाहनांची तपासणी केली़ त्यामुळे या नाक्यावर बुधवारी दिवसभर पोलीस कर्मचाºयांनी कसून तपासणी मोहीम राबवित सर्व वाहनांच्या नोंदी घेतल्या़ संचारबंदी असतानाही अनेक वाहनधारक विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत़ क्षुल्लक कारणासाठीही घराबाहेर पडून संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे़ त्यामुळे पोलिसांनी बुधवारी शहर परिसरातही कडक तपासणी मोहीम राबविली़ विसावा नाका येथून मानवत, पाथरी, जिंतूर, सेलू या तालुक्यांतून येणारी वाहने शहरात प्रवेश करतात़ त्यामुळे या नाक्यावर बुधवारी कसून तपासणी करण्यात आली़ सकाळी ११ वाजेपर्यंतचा वेळ अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी दिल्याने ११ वाजेनंतर या तपासणीला सुरुवात करण्यात आली़ साधारणत: १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय हे विसावा नाका या ठिकाणी दाखल झाले़ त्यांनी स्वत: रस्त्यावर उभे राहून काही वाहने तपासली़ प्रत्यके वाहनाची आणि व्यक्तीची तपासणी करण्यात आली़ एखाद्याने दवाखान्याचे कारण सांगितले असेल तर दवाखान्याची फाईल तपासणे, शासकीय कर्मचाºयांचे ओळखपत्र, विशेष सवलत दिली असेल तर ही ओळखपत्रे तपासून नोंदी घेण्यात आल्या़
सेलूत चोरवाटा शोधून नागरिकांचे सीमोल्लंघन
मोहन बोराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : जिल्हा सीमेवर अडविण्याची शक्यता असल्याने चोर वाटा शोधून किंवा चेकपोस्टवर दवाखान्याच्या फाईल्स दाखवून चारचाकी आणि दुचाकी वाहनाने औरंगाबाद, जालना जिल्ह्यातून नागरिक परभणी जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याची बाब बुधवारी सातोना आणि देवगाव फाटा या चेकपोस्टवर केलल्या पाहणीत समोर आली़
परभणी जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे़ लॉकडाऊननंतर अनेक दिवस जिल्ह्यामध्ये एकही बाधित रुग्ण आढळला नाही़ त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत इतर जिल्ह्यातून एकही व्यक्ती तालुक्यात प्रवेश करू नये, यासाठी जिल्हा सीमाबंद केल्या आहेत़ जालना जिल्ह्याच्या सीमेवर हादगाव पावडे या गावाजवळ आणि देवगावफाटा येथे चेकपोस्टची उभारणी केली़ मात्र पुणे, औरंगाबाद, मुंबई आणि इतर जिल्ह्यातून शेकडो नागरिक चोरट्या मार्गाने दुचाकी किंवा पायी चालत जिल्ह्यात प्रवेश मिळवित आहेत़ अनेकांनी तर चेकपोस्टवरील कर्मचाºयांना गुंगारा देऊन गाव गाठले आहे़ याच दरम्यान, बुधवारी दुपारी १२़२० वाजेच्या सुमारास या प्रतिनिधीने सातोना चेकपोस्टची पाहणी केली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले़ सातोन्याहून सेलूकडे आणि सेलूहून सिमा ओलांडून सातोन्याकडे जाणारे काही दुचाकीचालक दवाखान्याचे कारण समोर करीत होते़ काही जण शेतात जात असल्याचे सांगून सिमा ओलांडत होते़ याच दरम्यान, तूर घेवून जाणारा एक टेम्पोही परतूरच्या दिशेने निघाला़ त्यातील हमालांना खाली उतरवून टेम्पो पुढे पाठविण्यात आला़ माध्यमाचे प्रतिनिधी समोर असल्याने चेकपोस्टवरील कर्मचारी सतर्क झाल्याचे दिसून आले़ मात्र जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक असे स्टिकर लावलेली वाहने तपासणी न करताच पुढेच पाठविली जात होती़ विशेष म्हणजे मंगळवारीच सेलू पोलीस ठाण्याच्या निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनातून प्रवास करणाºया प्रवाशांना पकडले होते़ असे असतानाही जीवनावश्यक वस्तूंची वाहने तपासली जात नसल्याची बाब दिसून आली़ देवगावफाटा चेकपोस्टवरील अशीच परिस्थिती होती़ कृषी मालाची वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका तपासणीविना पुढे जात होत्या़ दवाखान्यात आल्याचे कारण देत अनेक नागरिक बिनधास्तपणे सीमा ओलांडत होते़ एवढेच काय, सांगली येथून ऊसतोड कामगार घेवून आलेले एक वाहन चेकपोस्टवर पोलिसांनी थांबवून कागदपत्राच्या तपासणीनंतर सोडून दिले़ चेकपोस्टवरील पोलीस कर्मचाºयांसमवेत असलेले इतर विभागातील कर्मचारी फारसे सक्रिय नसल्याचे दिसून आले़
ढालेगाव सीमेवर कसून तपासणी
विठ्ठल भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : परभणी आणि बीड जिल्ह्यांची सिमा असलेल्या ढालेगाव येथील चेक पोस्टवर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात असल्याची बाब २२ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आली़ मात्र काही जण मंजरथ भागातील गोदावरी नदीपात्रातून रात्रीच्या वेळी जिल्ह्यात दाखल होत असल्याचे पाहणीत निदर्शनास आले़
ढालेगाव येथील चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, वाहनांची कसून तपासणी होत आहे़ बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास या प्रतिनिधीने चेकपोस्टला भेट दिल्यानंतर ही बाब निदर्शनास आली़ शासनाने या ठिकाणी तीन पोलीस कर्मचारी आणि एका अधिकाºयाची दोन टप्प्यात नियुक्ती केली आहे़ तसेच आरोग्य विभागाचा एक कर्मचारी आणि इतर दोन कर्मचाºयांची आठ तासांप्रमाणे तीन शिफ्टमध्ये नियुक्ती केली आहे़ अहमदनगर, पुणे, कल्याण येथून येणारा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रेड झोनमधून नागरिकांना थेट जिल्ह्यात प्रवेश मिळतो़ चेक पोस्टलगत रामपुरी आणि ढालेगाव येथून सुरुवातीला अनेक जण चोर मार्गाने गावात प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आले़ तसेच नदीकाठच्या ११ गावांमधून नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत होते़ त्यामुळे या १३ गावांमधील रस्ते खोदण्यात आले आहेत़ परिणामी, वाहनांद्वारे या ठिकाणावरुन होणारे प्रवेश बंद झाले आहेत; परंतु, तरीही काही जण पायी येत आहेत़
बुधवारी दुपारी चेकपोस्टची पाहणी केली असता, अत्यावश्यक वाहनांची कसून तपासणी केली जात होती़ ढालेगाव येथील नागरिकांनाही चेकपोस्टवरुन सोडले जात नव्हते़ दुपारी १़३० वाजेपर्यंत या ठिकाणावरुन अत्यावश्यक सेवेची १७ वाहने जिल्ह्याबाहेर गेली तर ९ वाहने जिल्ह्यात दाखल झाली़ शासकीय कर्मचाºयांनाही सीमा ओलांडण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यामुळे या चेकपोस्टवर कसून तपासणी केली जात असल्याचे बुधवारी दिसून आले.
मंजरथ भागातून प्रवेश
४गोदावरी काठाने गावात येणारे मार्ग आता टास्कफोर्स समित्यांनी खोदून काढले असले तरी मंजरथ भागात गोदावरी नदीचे पाणी कमी असल्याने अनेक जण पाण्यातून जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत़ त्यामुळे हा मार्ग बंद करणे गरजेचे झाले आहे़

Web Title: Parbhani: Increased headaches due to smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.