परभणी ; नववर्षाच्या पूर्वसंध्येला येलदरीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:22 AM2020-01-01T00:22:04+5:302020-01-01T00:22:40+5:30

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी परभणी शहरात दाखल झाले असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्हीही एमबीआरमध्ये हा पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात परभणीकरांच्या पाचवीला पुंजलेली पाण्याची समस्या दूर होईल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

Parbhani; On the eve of the New Year, the water of Yaldari is introduced | परभणी ; नववर्षाच्या पूर्वसंध्येला येलदरीचे पाणी दाखल

परभणी ; नववर्षाच्या पूर्वसंध्येला येलदरीचे पाणी दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी परभणी शहरात दाखल झाले असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्हीही एमबीआरमध्ये हा पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात परभणीकरांच्या पाचवीला पुंजलेली पाण्याची समस्या दूर होईल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थ सहाय्यातून २००८ मध्ये परभणी शहरासाठी युआयडीएसएसएमटी योजनेला मंजुरी मिळाली. मंजुरी देताना १०८ कोटी रुपयांची असलेली ही योजना पुढे २८८ कोटी रुपयांवर पोहचूनही १० वर्षानंतर अमृत योजनेतील १०२ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यातून आता पूर्णत्वाला जात आहे. परभणी शहराला सध्या राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. ३० वर्षापूर्वीची ही योजना असून या काळात शहराची लोकसंख्या तीन पटीने वाढली आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीपुरवठा करताना मनपा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाला पारवा रोड परिसरातील चष्मे ए हयात विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. तरी देखील शहरवासियांना पाण्यासाठी ओढाताण करावी लागते. सद्यस्थितीला १५ दिवसांतून एकवेळा पाणी मिळते. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेची शहरवासीय आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.
युआयडीएसएसएमटी योजनेला अमृत योजनेतून निधी मंजूर झाल्यानंतर कामांना गती देण्यात आली. मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्राधान्यक्रमाने ही योजना पूर्ण करुन घेतली. सद्यस्थितीला येलदरी येथील उद्भव विहीर, जलवाहिनी, धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्र, परभणी शहरातील जलवाहिनी आणि विविध भागात उभारण्यात आलेले जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ चाचण्यांचा सोपस्कार बाकी असून त्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या अंतर्गत मंगळवारी परभणी शहरात उभारलेल्या दोन एमबीआरमध्ये पाणी आणून चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रक्रियेच्या निमित्ताने येलदरी धरणातील पाणी प्रथमच प्रत्यक्ष जलवाहिनीतून शहरात पोहचले. यापूर्वी येलदरी धरणाचेच पाणी नदीपात्रातून राहटी बंधाºयात घेतले जात होते आणि तेथून शहरवासियांना पाणीपुरवठा होत होता. मात्र आता थेट येलदरी धरणाचे पाणी जलवाहिनीतून परभणीकरांना मिळणार आहे. मंगळवारी सायंकाळी हे पाणी गणपती चौकातील जलवाहिनीपर्यंत पोहचले होते आणि रात्री उशिरापर्यंत विद्यानगर आणि खाजा कॉलनीतील एमबीआरमध्ये ते पोहचणार आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पाणी टंचाईलाही निरोप देण्याचा आनंद परभणीकरांना मिळणार आहे. नवीन वर्षामध्ये सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा आशेचा किरणही मावळत्या वर्षाने दाखविला आहे.
बटन दाबून सोडले पाणी
४धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष बटन दाबून परभणी शहरात पाणी सोडण्यात आले. यावेळी रविंद्र सोनकांबळे, सुनिल देशमुख यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
एम.बी.आर.मध्ये पाणी
४धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून निघालेले पाणी परभणी शहरात दाखल होत असताना कॅनॉल परिसरात दोन ठिकाणी एअर वॉल्व्हमध्ये लिकेज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद करुन हे लिकेज काढण्यात आले. त्यांतर प्रत्यक्ष जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी सायंकाळी विद्यानगर आणि खाजा कॉलनीतील एम.बी.आर.मध्ये रात्री दाखल झाले.

Web Title: Parbhani; On the eve of the New Year, the water of Yaldari is introduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.