सातत्यपूर्ण उपक्रमांनी मिळवून दिला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:10 AM2019-06-19T00:10:41+5:302019-06-19T00:11:09+5:30

शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत आहेत.

Parbhani: Continental activities provide international status to the school | सातत्यपूर्ण उपक्रमांनी मिळवून दिला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा

सातत्यपूर्ण उपक्रमांनी मिळवून दिला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा

Next
ठळक मुद्देयेथे भाजीपाला व्यवसाय करणारे नागरिक वास्तव्याला आहेत त्यांनी ५५ लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून जमा

- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी) : शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांचा मोठा लोकसहभाग आणि शाळेसाठी पालकांची सतत धडपड, उपक्रमातील सातत्य आणि या माध्यमातूून वाढलेल्या गुणवत्तेने माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला महाराष्ट्र शिक्षण मंडळाने आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा दिला आहे. खाजगी शाळेला लाजवेल, असे शाळा व्यवस्थापन या ठिकाणी असून शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत आहेत.

बालवर्ग आणि पहिली ते आठवीपर्यंत असलेल्या या शाळेत सध्या ११५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माळीवाडा परिसरात प्रामुख्याने भाजीपाला व्यवसाय करणारे नागरिक वास्तव्याला आहेत. आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा शाळेला दान दिला जातो. त्यातूनच ५५ लाख रुपयांचा लोकसहभाग जमा झाला असून त्यातून भौतिक सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा या शाळेस प्राप्त झाल्याने ४ बालवर्ग आणि पहिली ते आठवीपर्यंतच्या २७ तुकड्या येथे चालतात. चौथीपर्यंत आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम लागू झाला आहे. महाराष्ट्र शासनाने विशेष निवड प्रक्रिया राबवून निवडलेले शिक्षक या शाळेत ज्ञानदानाचे काम करीत आहेत. येथे १० लाख रुपयांची सुसज्ज प्रयोगशाळा, ई-लर्निंग, वायफाय, सोलार पॅनल, ४३ स्मार्ट एलईडी, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटर फिल्टर, सुसज्ज वर्गखोल्या, भव्य ग्रंथालय, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांची तयारी ३६५ दिवस चालविणारी शाळा अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांनी शाळेने पाथरीच नव्हे तर संपूर्ण राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षण
माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या या शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रमातून शिक्षण दिले जाते. बँक, पोस्ट आॅफीस, भाजी मंडई, एटीएम मशीन, हॉस्पिटल, वृद्धाश्रम आदी क्षेत्रांच्या माहितीसाठी क्षेत्र भेटी घडविल्या जातात. पाथरी परिसरात विद्यार्थ्यांच्या ३५ रात्र अभ्यासिकाही सुरू करण्यात आल्या आहेत.

शाळेचे भविष्यातील उपक्रम
माळीवाडा येथील आंतरराष्ट्रीय शाळेत एमआयईबी बोर्डांतर्गत बालवर्ग ते बारावीपर्यंतचे शिक्षण एकाच शैक्षणिक संकुलात निर्माण करणे, विद्यार्थ्यांसाठी भव्य क्रीडा संकुल उभारून राष्ट्रीय खेळाडू तयार करणे, स्पर्धा परीक्षेसाठी मुलांची विशेष तयारी, सुसज्ज प्रयोगशाळा, वाचनालय उभारण्याचे शाळेने निश्चित केले आहे.

माळीवाडा शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्याने येथील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वृंद्घीगत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून पालकांचाही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.- सुभाष चिंचाणे, मुख्याध्यापक

विद्यार्थ्यांचा विकास हाच आमचा ध्यास आहे. शाळेसाठी काहीपण करण्याची तयारी आम्ही केल्यानेच हे यश संपादन करू शकलो. यापुढेही शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अविरत प्रयत्नरत राहणार - शिवाजी वांगीकर, शालेय समिती अध्यक्ष

Web Title: Parbhani: Continental activities provide international status to the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.