परभणीत प्रमुख राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 08:16 PM2019-10-02T20:16:12+5:302019-10-02T20:20:18+5:30

आघाडीच्या ताब्यात प्रत्येकी २ जागा

Maharashtra Assembly Election 2019 : The allocation of seats for the major political parties in Parbhani was solved | परभणीत प्रमुख राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला

परभणीत प्रमुख राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला

Next
ठळक मुद्देशिवसेना २ तर भाजपा-रासपकडे प्रत्येकी १ जागाशेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार

परभणी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेकडे प्रत्येकी २ तर भाजपाकडे १ आणि रासपकडे १ जागा गेली आहे़ मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील एकाही प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार आहे़ 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजपा -रासप महायुती यांच्यातील जागा वाटपाचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून सुटलेला नव्हता़ त्यामुळे आघाडी-युतीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती़ मंगळवारी या संदर्भातील चित्र स्पष्ट झाले़ परभणी व पाथरी विधानसभेची जागा काँग्रेसला सुटली असून, जिंतूर व गंगाखेडची जागा राष्ट्रवादीकडे कायम आहे़ पाथरी विधानसभेची जागा शिवसेनेकडून भाजपाकडे गेली आहे़ त्यामुळे येथून आ़मोहन फड यांना भाजपाची उमेदवारी मिळणे निश्चित झाले आहे़ असे असले तरी भाजपाने मंगळवारी राज्यातील १२५ जागांवरील उमेदवारांची जी यादी जाहीर केली, त्यात पाथरीचा समावेश नाही़ बुधवारी या संदर्भातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे़ जिंतूर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाकडेच राहील, अशी चर्चा होती; परंतु, आता ही जागा महायुतीतील मित्र पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाकडे गेली असून, माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांना रासपची उमेदवारी मिळाली आहे़ 

सहा उमेदवारांचे नऊ अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातून ६ उमेदवारांनी ९ अर्ज दाखल केले आहेत़ त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघातून दोन उमेदवारांचे दोन अर्ज आले आहेत़ त्यात शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राम खराबे पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून, संभाजी ब्रिगेड पार्टीचे बालाजी शिंदे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे़ परभणी विधानसभा मतदार संघातून एका अपक्ष उमेदवाराने १ अर्ज दाखल केला आहे़ गंगाखेड विधानसभा मतदार संघातून २ उमेदवारांनी ४ अर्ज दाखल केले आहेत़ पाथरी विधानसभा मतदार संघातून एका उमेदवाराने २ अर्ज दाखल केले आहेत़ २ आॅक्टोबर रोजी शासकीय सुटी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही़ त्यामुळे आता ३ व ४ आॅक्टोबर असे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उरले आहेत़ या दोन दिवसांत बहुतांश राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल होणार आहेत़ त्यामुळे पुढील दोन दिवस प्रशासकीय यंत्रणेसाठी कसोटीचे राहणार आहेत़ 

२५ इच्छुकांनी घेतले ५९ अर्ज
चार विधानसभा मतदार संघात मंगळवारी २५ इच्छुकांनी ५९ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतले़ त्यामध्ये जिंतूर मतदार संघातून ४ जणांनी ६ तर परभणी मतदार संघातून ७ इच्छुकांनी २८ अर्ज घेतले आहेत़ गंगाखेड विधानसभा मतदार संघातून ६ जणांनी ९ तर पाथरी मतदार संघातून ८ इच्छुकांनी १६ अर्ज घेतले आहेत़ आतापर्यंत ४ मतदार संघात १५८ इच्छुकांनी ३३४ अर्ज घेतले आहेत़ 

मेघना बोर्डीकर यांना रासपची उमेदवारी
जिंतूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रीय समाज पक्षाला सुटला असून, या मतदार संघातून युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ रासपकडे पूर्वी गंगाखेडची जागा होती़ ती जागा शिवसेनेकडे गेली असून, जिंतूरची शिवसेनेची जागा रासपकडे आली आहे़ या मतदार संघातून यापूर्वीच अनेक महिन्यांपासून मेघना बोर्डीकर यांनी तयारी चालविली आहे़ रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा गेल्या महिन्यातच जिंतूर येथे जाहीर कार्यक्रम झाला होता़ त्याचवेळी ही जागा रासपकडे जाईल, असे राजकीय संकेत मिळाले होते़ त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले आहे़ 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : The allocation of seats for the major political parties in Parbhani was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.