जिंतूर-येलदरी रस्ता : ९ कि.मी.मध्ये ३७ दिवसांत १९६ खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:17 PM2020-08-01T20:17:15+5:302020-08-01T20:19:58+5:30

जिंतूर-येलदरी या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर गुरुवारी प्रत्यक्ष संबधित ठिकाणी जाऊन या कामाची पाहणी केली.

Jintur-Yeldari road: 196 ditches in 9 km happen in 37 days | जिंतूर-येलदरी रस्ता : ९ कि.मी.मध्ये ३७ दिवसांत १९६ खड्डे

जिंतूर-येलदरी रस्ता : ९ कि.मी.मध्ये ३७ दिवसांत १९६ खड्डे

Next
ठळक मुद्दे५९० दिवसांनंतरही रस्त्याचे काम अर्धवट४ कोटी ६२ लाखांचा निधी उपलब्ध

- विजय चोरडिया
जिंतूर : जिंतूर- येलदरी रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर १२ महिन्यांमध्ये पूर्ण करावयाचे काम १९ महिने १५ दिवस लोटले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच ३७ दिवसांपूर्वी ९ किमी अंतरावर केलेल्या कार्पेटच्या रस्त्यावर तब्बल १९६ खड्डे पडल्याचा प्रकार प्रत्यक्ष गुरुवारी केलेल्या पाहणीत समोर आला आहे. 

जिंतूर-येलदरी या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर गुरुवारी प्रत्यक्ष संबधित ठिकाणी जाऊन या कामाची पाहणी केली. १६ किमी रस्त्याच्या या कामाचे १५ डिसेंबर २०१८ रोजी नाशिक  येथील शामा कन्स्ट्रक्शन कंपनीला टेंडर मिळाले होते; परंतु, संबंधित कंपनीने हे काम न करता स्थानिक कंत्राटदाराकडे हे काम वर्ग केले़ करारानुसार १२ महिन्यांमध्ये १६ किमीचे काम संबंधित कंपनीला पूर्ण करावयाचे होते़ त्यासाठी ४ कोटी ६२ लाख ४० हजार ३१५ रुपयांचा निधीही उपलब्ध झाला; परंतु, ५९० दिवसानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही़ ३७ दिवसांपूर्वी म्हणजे जून महिन्यामध्ये या रस्त्याच्या कार्पेटचे काम संबंधित कंत्राटदाराने सुरू केले़ जोरदार पाऊस सुरू असताना कंत्राटदाराकडून कार्पेटचे काम सुरू होते.  ८ ते १० दिवस हे काम चालले.

पाऊस पडत असताना या कामाच्या संदर्भात कोणतीही काळजी न घेता हे काम सुरूच ठेवले़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार ७ जूननंतर डांबरीकरणाचे काम केले जात नाही; परंतु, संबंधित गुत्तेदाराने या नियमाला डावलून पावसाळ्यात रस्त्याच्या कार्पेटचे काम केले़ ५९० दिवसानंतरही ९ किमीचे काम झाले, नसून, जवळपास ६ किमी कार्पेटचे काम बाकी आहे़ कार्पेटचे काम करीत असताना आॅईल मिश्रित डांबराचा वापर करण्यात आला. तसेच डांबर कमी वापरल्यामुळे ९ किमीच्या रस्त्यामध्ये ३७ दिवसांच्या कार्यकाळात १९६ खड्डे आढळून आले़ हे खड्डे म्हणजे सार्वज्निक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणाचा कळस दिसून येत आहे़ या सर्व गोष्टीला संबंधित गुत्तेदार व सा़बां़ विभागाचे अभियंते जबाबदार असून, या रस्त्याचे काम नव्याने परत करून घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ 


राजकीय गुत्तेदारीमुळे निकृष्ट काम
जिंतूर- येलदरी रस्त्याच्या कामाचे शामा कन्स्ट्रक्शन कंपनी नाशिक यांच्या नावाने टेंडर असले तरी प्रत्यक्षात काम करणारे कंत्राटदार हे स्थानिक पातळीवरील आहेत़ राजकीय दबावाखाली काम होत असल्याने अधिकारीही कारवाई करण्यास धजावत नाहीत़ या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिंतूरकरांतून होत आहे़ 


सा़बां़ विभाग गुत्तेदाराला शरण
पावसाळ्यात रस्त्याच्या कामासाठी सा़बां़ विभागाने संबंधित कंत्राटदाराला मूक संमती दिली आहे़ सा़बां़ विभागाचे कारकून व त्या ठिकाणचे अभियंते रस्त्याच्या कामावर जाऊन आल्याने या कंत्राटदाराला सा़बां़ने पावसाळ्यात काम करण्यास शासनाकडून विशेष परवानगी दिली आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़ सा़बां़ विभागाने संबंधित कंत्राटदाराकडे शरणागती पत्करली की काय, अशीच भावना जिंतूरकरांच्या मनात आहे़ 


जिंतूर-येलदरी रस्त्यावर ४ कोटी ६२ लाखांचा खर्च होत असताना कामाचा दर्जा राखण्यात आला नाही़ त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून निकृष्ट कामाला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी़
-अ‍ॅड़ मनोज सारडा, जनआंदोलन समिती, जिंतूर

 

Web Title: Jintur-Yeldari road: 196 ditches in 9 km happen in 37 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.