खुशखबर ! राज्यात ५ ठिकाणी दरवर्षी तर मराठवाड्यात दर ३ वर्षाला होणार सैन्य भरती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 01:55 PM2020-01-09T13:55:34+5:302020-01-09T14:00:20+5:30

पत्रकार परिषदेत मेजर विजय पिंगळे यांची माहिती

Good news! The army recruitment will be every year in five places of state, and in Marathwada every 3 years | खुशखबर ! राज्यात ५ ठिकाणी दरवर्षी तर मराठवाड्यात दर ३ वर्षाला होणार सैन्य भरती 

खुशखबर ! राज्यात ५ ठिकाणी दरवर्षी तर मराठवाड्यात दर ३ वर्षाला होणार सैन्य भरती 

googlenewsNext
ठळक मुद्देसैन्य भरतीसाठी महाराष्ट्रातील १५ ठिकाणे निश्चितसोल्जर जीडी पदाच्या जागा रिकाम्या

परभणी- सैन्य दलातील भरतीसाठी मराठवाड्यातील मुलांना सोयीचे व्हावे, या उद्देशाने परभणीसह औरंगाबाद आणि जळगाव येथे दर तीन वर्षांना भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे़ महाराष्ट्रात भरतीसाठी एकूण १५ ठिकाणे निश्चित केली असून, त्यापैकी पाच ठिकाणी दरवर्षी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती जनरल विजय पिंगळे यांनी दिली़

परभणी येथे ४ जानेवारीपासून भारतीय सैन्य दलातील सोल्जर टेक, सोल्जर जीडी आणि ट्रेडर्समन या तीन पदांसाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे़ या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी ९ जानेवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ महाराष्ट्र, गोवा, दिव, दमण या राज्यातील भरती प्रक्रियेची मेजर विजय पिंगळे यांनी माहिती दिली़ ते म्हणाले, यापूर्वी  जिल्ह्यात २०१४ मध्ये सैन्य भरती झाली होती़ यावर्षी सैन्य भरतीसाठी ६५ हजार युवकांनी अर्ज केले आहेत़ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीतील प्रतिसाद चांगला आहे़ मुलांना सैन्य भरती विषयी अधिक माहिती व्हावी तसेच ही भरती प्रक्रिया राबविणे सुकर व्हावे, यासाठी सैन्य दलाने मराठवाड्यात दर तीन वर्षांना भरती घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी औरंगाबाद आणि परभणी ही दोन ठिकाणे निश्चित करण्यात आलीआहेत़ तसेच जळगाव येथे सुद्धा प्रत्येक तीन वर्षाला भरती प्रक्रिया घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

सोल्जर जीडी पदाच्या जागा रिकाम्या
परभणीत स्थानिक पोलीस दल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रशासन, अनेक सेवाभावी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याने ही प्रक्रिया सुरळीत सुरू आहे़ औरंगाबाद येथे झालेल्या मागील वर्षीच्या भरती प्रक्रियेतून १२०० युवक सैन्य भरतीमध्ये दाखल झाले होते़ सैन्य दलात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत़ त्यामुळे ज्या प्रमाणात मुलांची निवड होईल, त्या प्रमाणात भरती केली जाईल़ ट्रेडर्समन आणि टेक्नीकल पदांची संख्या कमी असते़ त्या तुलनेत सोल्जर जीडी ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सोल्जर जीडी या पदासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले़ यावेळी भरती प्रक्रियेचे संचालक कर्नल तरुण जामवाल, कर्नल सीताराम, कर्नल सी़ मनीयन, सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस़एस़ पाटील, हवालदार रामराव गायकवाड, विद्यापीठाचे महेश देशमुख आदींची उपस्थिती होती़

२८ हजार मुलांची झाली चाचणी
भरती प्रक्रियेसाठी एकूण ६५ हजार युवकांनी अर्ज केले आहेत़ सुरुवातीच्या चार दिवसांमध्ये ३५ हजार युवकांना चाचणीसाठी बोलावले होते़ प्रत्यक्षात २८ हजार ५३६ युवकांची चाचणी घेण्यात आली आहे़ दररोज ४ ते ५ हजार युवकांच्या शारीरिक चाचण्या होतात़ या काळामध्ये ५०० ते ७०० युवकांची शारीरिक चाचणीतून निवड करण्यात आली असून, वैद्यकीय चाचणीनंतर या सर्व उमेदवारांची औरंगाबाद येथे २३ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेतील गुणवत्तेनुसारच सैन्य दलात भरती केली जाणार असल्याची माहिती संचालक कर्नल तरुण जामवाल यांनी दिली़ दरम्यान, शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आता वाढले आहे़ कारण उमेदवार बऱ्यापैकी तयारी करून येत आहेत़ या उमेदवारांच्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षण वर्ग घेतले जावेत, अशी विनंती आपण केली आहे़ त्यासाठी आ़ डॉ़ राहुल पाटील यांचीही भेट घेतली़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेवू असे सांगितले आहे़ त्यामुळे उमेदवारांची लेखी परीक्षेचीही तयारी होवू शकते़

का घेतली जाते रात्रीच भरती
परभणी येथील सैन्य भरती प्रक्रियेतील सर्व शारीरिक चाचण्या रात्री १२ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या काळात घेण्यात आल्या़ या विषयी कर्नल तरुण जामवाल यांना विचारले असता त्यांनी सांगितले़ सैन्य दलात यापूर्वी दिवसा भरती प्रक्रिया घेतली जात होती़ मात्र २०१५ नंतर रात्रीच्या वेळी ही प्रक्रिया राबविली जाते़ भरतीसाठी हजारो युवक दाखल होतात़ ज्या शहरात ही भरती घेतली जाते तेथील जनजीवन विस्कळीत होवू नये़ लोकांना त्रास होवू नये, हा एक हेतू आहे़ तसेच रात्रीच्या वेळी सर्व उमदेवारांसाठी समान वातावरण मिळते़ त्यातून त्यांची कार्यक्षमता वाढून चांगली चाचणी दिली जावू शकते़ या कारणांमुळे रात्रीच्या वेळी भरती प्रक्रिया घेतली जात असल्याचे जामवाल यांनी सांगितले़

Web Title: Good news! The army recruitment will be every year in five places of state, and in Marathwada every 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.