The driver was killed on the spot due to lost control on container carrying bikes near Gangakhed | नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनर उलटला; चालक जागीच ठार

नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनर उलटला; चालक जागीच ठार

गंगाखेड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने औरंगाबाद येथून हैद्राबादकडे जाणाऱ्या एका कंटेनरचा सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास येथील परळी रोडवर अपघात झाला. यात कंटेनर चालक मरीबा रघुनाथ झुब्रे ( ३०, रा. थोडगा ता. अहमदपुर जि. लातुर ) यांचा जागीच मृत्यू झाला. 

औरंगाबाद येथून हैद्राबाद येथे बजाज कंपनीच्या नवीन दुचाकी घेऊन एक कंटेनर (क्रमांक टी. एस. ०७ यु. ए. ८७९१) परळी-गंगाखेड मार्गे जात होता. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरालगतच्या परळी रोडवरील एका पेट्रोल पंपासमोरून भरधाव वेगात जाताना चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. यामुळे कंटेनर उलटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या पानटपरी व लिंबाच्या झाडाला घासत काही अंतरावर गेला. यात गंभीर जखमी झाल्याचे चालक मरीबा झुब्रे यांचा मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार, जमादार रतन सावंत, बी. ए. मोरे, साहेब मानेबोईनवाड, उमाकांत जामकर, शेख खलींदर, होमगार्ड ईश्वर बचाटे, गजेंद्र राठोड यांनी घटनास्थळी धावघेतली. याप्रकरणी मंगळवारी (दि. ५ ) पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मयत चालक मरीबा झुब्रे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेश राठोड करीत आहेत.

Web Title: The driver was killed on the spot due to lost control on container carrying bikes near Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.