Cold Wave in Marathwada: परभणीमध्ये थंडीचा कहर, पारा ५.९ अंशांवर; तीन दिवसांपासून ‘हुडहुडी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:45 IST2025-12-09T10:44:00+5:302025-12-09T10:45:19+5:30
रविवारी ८ अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडीचा प्रभाव तीव्र झाला. सोमवारी ६.६ अंश आणि मंगळवारी थेट ५.९ अंशांवर पारा स्थिरावल्यानंतर थंडीची तीव्रता उच्चांक गाठत असल्याचे स्पष्ट दिसते.

Cold Wave in Marathwada: परभणीमध्ये थंडीचा कहर, पारा ५.९ अंशांवर; तीन दिवसांपासून ‘हुडहुडी’
परभणी : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा जोर सातत्याने वाढत असून, तापमानात होत असलेली अभूतपूर्व घसरण नागरिकांना अक्षरशः गारठवणारी ठरत आहे. सोमवारी नोंदवलेले ६.६ अंश तापमान मंगळवारी आणखी खाली येत थेट ५.९ अंशांवर पोहोचले. परभणीच्या हवामानाने डिसेंबरमध्येही कडक हिवाळ्याची जाणीव करून दिली आहे.
शनिवारपासून पाऱ्याची घसरण सुरू झाली. रविवारी ८ अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडीचा प्रभाव तीव्र झाला. सोमवारी ६.६ अंश आणि मंगळवारी थेट ५.९ अंशांवर पारा स्थिरावल्यानंतर थंडीची तीव्रता उच्चांक गाठत असल्याचे स्पष्ट दिसते.
अचानक पडलेल्या गारठ्याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना बसत आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. पहाटेपासून दाट धुके पसरले, असून सकाळी ७ वाजेपर्यंतही दृष्यमानता कमीच राहते. या परिस्थितीत वाहनधारकांना संथगतीने आणि अधिक खबरदारीने प्रवास करावा लागत आहे.
थंडीपासून बचावासाठी लोक मफलर, स्वेटर, शॉल, टोपी यांसाठी बाजारपेठांकडे धाव घेत आहेत. चहाच्या टपऱ्या आणि गरम पेय विक्रेत्यांपाशी खरेदीत मोठी वाढ झाली आहे. परभणीतील वाढती थंडी आणि चिंताजनक पातळीवर घसरलेला पारा पाहता हिवाळा अजून तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
रब्बी पिकांवर थंडीचा प्रतिकूल परिणाम
गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांवर प्रतिकूल परिणाम जाणवत आहे. वाढ खुंटणे अशा समस्या वाढल्याची माहिती कृषी विभागाने दिली. शुक्रवारी ११.२ अंशांवर असलेला पारा तीन दिवसांत तब्बल ६ अंशांनी घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
परभणीने मागे टाकले महाबळेश्वरचे तापमान
डिसेंबर महिन्यात साधारणपणे महाबळेश्वरचे तापमान ७–८ अंशांदरम्यान राहते. मात्र मंगळवारी परभणीने ५.९ अंश तापमानाची नोंद करीत महाबळेश्वरलाही मागे टाकले. थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर महाबळेश्वर नव्हे, परभणीला या, असे वातावरण शहरात तयार झाले आहे.
मागील ९ दिवसांतील तापमानातील चढ-उतार
दिवस तापमान (अंश सेल्सिअस)
सोमवार ८.४
मंगळवार ९.८
बुधवार ९
गुरुवार ११
शुक्रवार ११.२
शनिवार ९
रविवार ८
सोमवार ६.६
मंगळवार ५.९