परभणीतील जम्बो कोविड सेंटरच्या खाटा गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 05:50 AM2021-05-02T05:50:04+5:302021-05-02T05:50:36+5:30

पालकमंत्र्यांची घोषणा हवेतच : लोकप्रतिनिधींचे मौन; नागरिकांत नाराजी

Beds of Jumbo Covid Center in Parbhani disappear | परभणीतील जम्बो कोविड सेंटरच्या खाटा गायब

परभणीतील जम्बो कोविड सेंटरच्या खाटा गायब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
परभणी : शहरातील मनपाच्या कल्याण मंडपम् सभागृहात येत्या आठ दिवसांत ५०० खाटांचे जंबो कोविड सेंटर उभारण्याची पालकमंत्री नवाब मलिक यांनी २२ एप्रिल रोजी केलेली घोषणा हवेतच विरली असून, उद्घाटनाच्या वेळी आणलेल्या खाटा आता गायब झाल्या आहेत. त्यामुळे या केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे. 

जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत २७ हजार ८१५ रुग्णांची वाढ झाली असून, उपचारांदरम्यान ५६४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाभरातील परिस्थिती गंभीर असल्याने २२ एप्रिलला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री नवाब मलिक यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा कचेरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत परभणी शहरातील मनपाच्या कल्याण मंडपम् येथील सभागृहात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर आठ दिवसांत उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कोविड सेंटरचे उद्घाटनही पालकमंत्री मलिक यांच्या हस्ते पार पडले होते. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू असल्याचा अनुभव तिसऱ्याच दिवशी आला होता. नंतरच्या काळात मात्र पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि अचानक उद्घाटनाच्या वेळी आणलेल्या खाटा वाहनात टाकून रातोरात नेण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास या कोविड सेंटरला या प्रतिनिधीने भेट देऊन पाहणी केली असता, कल्याण मंडपम् सभागृहात शुकशुकाट दिसून आला. येथील सर्व खाटा गायब होत्या. काही दिवसांपूर्वी पार्टीशयनचे काम करणारे कर्मचारीही गायब होते. 

कल्याण मंडपम् येथील कोविड सेंटरला ऑक्सिजनची लाईन असल्याशिवाय सुरुवात करता येत नाही. दोन दिवसांत ही लाईन टाकून ऑक्सिजनच्या १०० बेडची व्यवस्था येथे केली जाणार आहे. उर्वरित सर्वसाधारण बेड राहणार आहेत. येथे आणलेल्या खाटा व्यवस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या संबंधित कंत्राटदाराला परत केल्या आहेत.
-दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

Web Title: Beds of Jumbo Covid Center in Parbhani disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.