पाकिस्तानही तरुण विद्यार्थी का रस्त्यावर उतरलेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 07:15 AM2020-01-23T07:15:00+5:302020-01-23T07:15:02+5:30

फीवाढ मागे घ्या, विद्यार्थी संघटनांवरची बंदी उठवा, राजकीय सहभाग घेऊ द्या, या मागण्यांसाठी पाकिस्तानातही तरुणांमध्ये असंतोष आहे. अरुज औरंगजेब या मुलीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

why students in Pakistan are protesting? | पाकिस्तानही तरुण विद्यार्थी का रस्त्यावर उतरलेत?

पाकिस्तानही तरुण विद्यार्थी का रस्त्यावर उतरलेत?

Next
ठळक मुद्दे‘डरते है बंदूकवाले, एक निहथ्थी लडकी से!’

- ऑक्सिजन टीम

29 नोव्हेंबर 2019 ची ही गोष्ट.
तशी फार जुनी नाही. पाकिस्तानातल्या 14 शहरांत विद्याथ्र्यानी मोर्चे काढले. कराची, क्वेट्टा, लाहोर, पेशावर, इस्लामाबाद या शहरांत विद्यार्थी मोच्र्यानी सरकारला जाब विचारणारे पोस्टर्स हातात घेतले. ज्या तरुण मुलांच्या मतांवर पंतप्रधान इमरान खान यांनी नया पाकिस्तानचे इमले बांधले तीच तरुण मुलं सरकारला जाब विचारत होती. देशभर तरुण आक्रोश रस्त्यावर होता. त्यात बलुचिस्तानात अनेक मुलींनी आपला मानसिक-शारीरिक छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या. अल्पसंख्य मुलींना सतत त्रास दिला जातो म्हणून विद्यापीठांत अनेक मुलींनी आंदोलन केलं.
आणि या सार्‍यांचं नेतृत्व करत होती, अरुज औरंगजेब. पाकिस्तानातल्या विद्यार्थी आंदोलनाची म्होरकी. पंजाब युनिव्हर्सिटीत उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व तिच्याकडे होतं. मात्र त्या मुलीवर यथेच्छ टीका झाली. तिचं लेदर जॅकेट हा टिंगलीचा विषय सोशल मीडियात झाला. तिला आणि तिच्यासारख्या अनेकींवर बर्गरवाले, लेदर जॅकेट एलिट, रॉची एजंट, भारताची एजंट अशी बरीच लेबलं लावण्यात आली. ‘बदतमीज लडकी’ असं म्हणून तिला ट्रोल करण्यात आलं. मात्र तरीही ती ठाम होती. आजही ठाम आहे. पाकिस्तानी विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व एका मुलीनं करणं हेच जिथं वेगळं (आणि अनेकांना न पचणारं) आहे तिथं अरुजची लढाई किती मोठी असेल हे सहज लक्षात यावं.
एकेकाळी पाकिस्तानात ज्या ओळी बेनझीर भुत्ताेंसाठी लिहिल्या गेल्या, त्या ओळी आज अरुजसाठी पुन्हा चर्चेत आहेत. ‘डरते है बंदूकवाले, एक निहथ्थी लडकी से!’
 29 नोव्हेंबर 2019 या दिवशी विद्यार्थी आंदोलनाचा जो भडका उडाला त्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त होती. आणि आजही विद्यार्थिनीच अधिक त्वेषानं भांडत आहेत असं का, असा प्रश्न कराचीस्थित पत्रकार अमर गुरडो यांना विचारला तर ते सांगतात, ‘विद्याथ्र्याच्या मागण्या फार जगावेगळ्या किंवा नव्या होत्या असं काही नाही. फी वाढ कमी करा ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी मागणी आहे. शिक्षणाचा खर्च सामान्यांना परवडू नये इतकी जबर फी वाढ उच्चशिक्षणात करण्यात आली आहे. त्यात तरुणींना विद्यापीठात होणारा त्रास, विशेषतर्‍ बलुचिस्तानात हा प्रश्न गांभीर्यानं हाताळावा अशी मागणी करण्यात येत होती. विद्यापीठात सीसीटीव्ही कॅमेरे लागले, त्याविषयी आक्षेप आहेत. आणि त्याहून गेली अनेक दशकं पाकिस्तानात जी मागणी आहे ती म्हणजे स्टुडंट युनियनला परवानगी द्या. 1984 पासून ही बंदी आहे. ती बंदी मागे घ्या म्हणून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. दुसरीकडे भर कॅम्पसमधून काही विद्यार्थी गायब झाले, त्यांचं पुढे काय झालं, ते कुठं गेले याचा तपास लावा, अशीही मागणी विद्यार्थी करत आहेत.

दुसरं म्हणजे विद्याथ्र्याचा आक्षेप आहे तो एका मुख्य गोष्टीला. आजही पाकिस्तानात तुम्हाला कुठल्याही विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर अ‍ॅफिडेव्हिट करून द्यावं लागतं की मी कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेणार नाही. तसा कुठलाही सहभाग आढळून आला तर विद्यापीठ तुमच्यावर बंदी घालेल आणि कुठंही प्रवेश मिळणार नाही. विद्याथ्र्याचा या सार्‍यालाच प्रखर विरोध आहे.’
आणि मुली या आंदोलनात अग्रेसर असल्याचं अजून एक मुख्य कारण पत्रकार अमर गुरडो सांगतात की, विद्यापीठात होणारी छेडछाड, शिक्षणाचा वाढता खर्च याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर तर होतोच, पण मुला-मुलींमध्ये भेदभावही केला जातो. गुरडो सांगतात, ‘विद्यापीठाच्या वसतिगृहात मुलींनी रात्री 10 च्या आत यावं असा नियम आहे. मुलांवर मात्र अशी कोणतीही सक्ती नाही. त्यामुळेही मुलींचा या भेदभावाला विरोध आहे.’
पाकिस्तान सरकार हे आंदोलन कसं हाताळत आहे, असं विचारलं असता गुरडो सांगतात, ‘सरकार हे समजूनच घ्यायला तयार नाही की पाकिस्तान हा तरुणांचा देश आहे. तरुणांना वगळून तुम्ही निर्णय कसे घेता? तरुणांचं ऐकूनच घ्यायचं नाही, त्यांनी चळवळी करायच्या नाही तर भविष्यात राजकीय नेतृत्व कसं तयार होणार? या मुलांच्या मागण्या काही अवास्तव नाहीत, त्यांना दडपून टाकण्यात काही हशील नाही. ते दडपलेही जाणार नाहीत.’
अर्थात, पाकिस्तानात झालेलं विद्यार्थी आर्मीनं हे आंदोलन दडपून टाकलं. शेकडोंना अटक झाली, आंतरराष्ट्रीय दबाव वाढला तसं त्या मुलांना सोडून देण्यात आलं. विद्याथ्र्याचा भयंकर उद्रेक पाहता पंतप्रधान इमरान खान यांनी ट्विट केलं की, 1984 पासून जी स्टुडंट युनियनवर बंदी घालण्यात आली आहे ती बंदी आपण मागे घेत आहोत. मात्र त्यासंदर्भात अजून काहीही झालेलं नाही. मात्र सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांनी मात्र आता विद्यार्थी संघटनांवरची बंदी हटवली आहे.
कराचीत अनेक विद्यार्थी जेएनयूच्या विद्याथ्र्याना पाठिंबा म्हणूनही ‘हम देखेंगे’ ही फैजची कविता गात रस्त्यावर उतरले. अर्थात तिथंही विरोध झालाच.
विद्याथ्र्यानी रस्त्यावर येणं पाकिस्तानातल्या रस्त्यांनाही काही रुचलेलं नाही.

Web Title: why students in Pakistan are protesting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.