who is deepak chahar? | भेटा एका रात्रीत स्टार झालेल्या दीपक चहरला!
भेटा एका रात्रीत स्टार झालेल्या दीपक चहरला!

ठळक मुद्देबाकीच्यांच्या कष्टांचं असं सोनं होतं की नाही हे ज्याचं त्यालाच माहिती मात्र दीपकच्या कष्टांचं खरोखर झगमगतं सोनं झालं.

चिन्मय लेले

दीपक चहर हे नाव तुम्ही कालपरवाच ऐकलं? कोण हा मुलगा? कुठून आला? आणि एका रात्रीत स्टार कसा झाला?
-खरं सांगायचं तर एका रात्रीत कुणी स्टार होत नाही, दीपकही झाला नाही. मात्र एका रात्रीत त्याची कामगिरी अशी काही उजळून निघाली की सार्‍या क्रिकेट जगाला प्रश्न पडला की, कोण हा तरुण खेळाडू?
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात हॅट्ट्रिक करत 7 रन्स देऊन त्यानं 6 विकेट काढल्या आणि गेलेला सामना एकहाती फिरवून टाकला. नवीन चेंडू स्विंग करण्याची उत्तम क्षमता असलेला हा दीपक एरव्ही कुठं खेळत होता आणि एका रात्रीत मिळालेलं हे स्टारडम पाहून त्याला काय वाटतं?
सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत दीपक सांगतो, ‘हे असं काही माझ्या आयुष्यात घडेल याचा कधी विचारच केलेला नव्हता, स्वपAातही कधी वाटलं नाही की माझ्या आयुष्यात असं काही घडेल? लहानपणापासून मला फक्त इतकंच माहिती आहे की आपण फक्त कष्ट करत राहायचे. त्या कष्टाचं कधी ना कधी चीज होतंच. !’
बाकीच्यांच्या कष्टांचं असं सोनं होतं की नाही हे ज्याचं त्यालाच माहिती मात्र दीपकच्या कष्टांचं खरोखर झगमगतं सोनं झालं.
आग््रयाचा हा मुलगा. त्याचे वडील लोकेंद्र भारतीय वायू सेनेत काम करत. मध्यमवर्गीयच कुटुंब. दीपकसह त्याचा आता क्रिकेटपटूच असलेला भाऊ राहुलही खेळायचा. सराव करायचा. वयाच्या 16 व्या वर्षार्पयत दीपकनं क्रिकेटमध्ये चेंडूनं चांगलीच कामगिरी केली. पुढची तयारी करायची म्हणून तो राजस्थान क्रिकेट अकॅडमीत शिकायला गेला. तिथं संचालक होते महान खेळाडू ग्रेग चॅपेल. त्यानं दीपकचा खेळ पाहिला आणि त्याला तोंडावरच सांगितलं की तू परत जा, तुझं काहीच होऊ शकत नाही. सरळ सरळ रिजेक्ट केलं त्याला. घरी परत येण्यावाचून काही पर्यायच नव्हता. तो परत आला.
दीपक क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगतो, ‘झालं ते बरंच झालं. मी घरी आलो, नाराज होतो पण परत सरावाला लागलो. सराव करण्याशिवाय दुसरं काही हातात नव्हतंच. मी रणजी सामन्यात खेळलो. स्वतर्‍ला सिद्ध करत राहिलो. माझ्यावर चॅपेल यांनी केलेली कमेण्ट मला आठवत होती, त्यामुळं माझ्यातलं बेस्ट जे काय होतं, ते बाहेर यायलाच मदत झाली. मी त्वेषानं खेळत राहिलो. सराव करत राहिलो. मी माझं फिटनेस रुटीनच बदलून टाकलं. बॉलिंग अ‍ॅक्शनवर प्रचंड काम केलं. माझा पेस वाढवला आणि जे येत नाही असं वाटलं ते ते सारं शिकत राहिलो.’
त्या शिकण्याचा आणि सरावाचाही दीपकला फायदाच झाला. त्याची आयपीएलमध्ये वर्णी लागली. चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर बोली लावली. 80 लाखांचा सौदा झाला. तो टीममध्ये तर पोहोचला पण समोर उभा क प्तान महेंद्रसिंह धोनी. त्याचकाळातली ही गोष्ट. दीपकचा एक व्हिडीओ एका आयपीएलमध्ये जबरदस्त व्हायरल झाला. चक्क कुल धोनी त्याच्यावर  भडकला होता आणि त्याला झापत होता. क्रिकेटजगात त्याचं हसू झालं. फॅन्सनी सोशल मीडियात टर उडवली. त्यासार्‍याविषयी दीपक सांगतो, धोनीनं झापलं मला ते योग्यच केलं. माझीच चूक होती. मॅच अटीतटीची होती आणि त्यावेळी मी दोन बीमर टाकले आणि तो भडकला. मात्र अशा चुकांमधून शिकण्याची संधीही त्यानेच दिली. खूप काही त्याच्याकडून शिकलो.
-हे असं शिकत शिकत, चुकत चुकत, मार खात, स्वतर्‍त बदल करत दीपक खेळत राहिला.
आणि मग एकदिवस त्याचा उजाडला.नव्हे एक रात्र.
त्या एका रात्री तो स्टार झाला.
खरंय एका रात्रीत स्टार होऊन तळपता येतं, पण त्यासाठी आधी कित्येक वर्षाची तपश्चर्या करणं अटळ आहे.
मग तुम्ही कुणीही असा.!

Web Title: who is deepak chahar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.