घरी जाणाऱ्या मजुरांसोबत काही पाऊलं चाललो तेंव्हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 06:20 PM2020-05-28T18:20:11+5:302020-05-28T18:20:32+5:30

ते पाच जण अस्वस्थ होते, मजुरांचे पायी चालणारे तांडे दिसत होते, आणि त्यांना प्रश्न पडला होता, आपण काही मदत करु शकतो का? - मग सुरू झालं सर्चमध्ये त्यांचं काम.

When we walked a few steps with the laborers going home ... | घरी जाणाऱ्या मजुरांसोबत काही पाऊलं चाललो तेंव्हा ...

घरी जाणाऱ्या मजुरांसोबत काही पाऊलं चाललो तेंव्हा ...

Next
ठळक मुद्देवेदनेचं जग जवळून अनुभवलं.

  पराग मगर 

लॉकडाउनमुळे आलेला बंदिस्तपणा खूप अस्वस्थ करत होता. 
कोरोनाच्या बातम्या पहात वेळही चालला होता. बाहेर जाण्याची सोय नव्हती. सायंकाळी सगळं शांत झाल्यावर आम्ही कधी कधी शोधग्रामच्या गेट बाहेर पडून मुख्य मार्गावर जायचो. तेव्हा पहिल्यांदाच टीव्हीवर जसे स्थलांतरित पाहिले तसेच या मार्गावर दिसले. हा रस्ता छत्तीसगढला जातो हे माहिती असल्याने हे लोक तिकडेच जात असतील हे लक्षात येत होतं. 
चार चार-पाच पाच जणांचा गट खाली मान घालून चालत राहायचा. केवळ चालतच राहायचा. लहान मुलंही सोबत असायची. 
आमचे रिकामे हात आणि प्रश्नार्थक चेहरा पाहून सरळ चालू लागायचे.  त्यांच्याकडे पाहताना आपण यांना काही मदत करू शकतो का हा प्रश्न गौरवला रोज पडायचा. 
समाजकार्य या विषयात तो पदवी घेतोय. 
दुसरी अपेक्षा. निसर्गाचं शिक्षण घेतेय, लॉकडाउनमुळे ती सध्या शोधग्राममध्येच आहे. परीक्षा केव्हा होईल हे निश्चित नाही. 
वैद्यकीय सेवेशी संबंधित असतानाही कोरोना संसर्गामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी आपण काहीच करत नाही ही खंत तिला सतावत होती. 
पण काय करायचं, सुरुवात कशी करायची हा प्रश्न होता. एकेकटय़ाने काही करण्यासारखं शक्यही नव्हतं. 
परीक्षा रद्द झाल्यामुळे गौरी, आराध्य आणि धम्मदीप हेदेखील आपण या लोकांसाठी काय करायचं याच विचारात होते. 
स्थलांतरितांचे पायी जाणारे जत्थे समोर दिसत होते.
बांधकाम, गिट्टी फोडण्याची कामं, कंपनीत मजूर अशा अनेक कामासाठी तेलंगणामध्ये गेलेल्या मजुरांना लॉकडाउनचा मोठा फटका बसला.
महिना-दीड महिन्यात परिस्थिती पूर्व पदावर येईल या आशेवर  ते होते. पण तसं झालं नाही, त्यात घरी जाण्यासाठी काहीच सोय नव्हती.
 ठेकेदारांनी हात वर केले आणि या मजुरांचे खायचे वांधे झाले. तुम्हाला घरी जाण्यासाठी गाडीची सोय करून देऊ असं सांगणारे रातोरात गायब झाले होते. 
त्यामुळे छत्तीसगढ, ओरिसा, प. बंगाल या राज्यातील मजुरांना पायी निघाण्याशिवाय पर्याय नव्हता. मिळेल त्या वाटेने सिरोंचा, आष्टी, चामोर्शी मार्गे राष्ट्रीय महामार्ग 63क् पकडून गडचिरोली मार्गे ही माणसं बाया मुलांना घेऊन पायी निघाली. 
या लोकांना अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला. सर्च संस्थेने या मार्गाने जाणा:या लोकांच्या जेवणाची सोय केली आणि त्यांना छत्तीसगढच्या सीमेवर पोहोचवून देण्याचा निर्णय घेतला. या पाच जणांवर हे काम सोपवण्यात आलं.
 कामं आणि वेळ वाटून देण्यात आली. सोबतीला प्रेरणा, जैनेत्नी, गुंजन, तृप्ती आणि इतरही कार्यकर्ते मित्र होतेच. पण पुढाकार या पाच जणांचा. 
पायी येत असलेल्यांना आधी ओआरएसचं पाणी आणि जेवणाची सोय असं नियोजन करण्यात आलं.
 अपेक्षा सांगते, पायी चालून चालून या लोकांचे पाय बधिर होऊन गेलेले असायचे. त्यांना आम्ही लावायला बर्फ द्यायचो. तब्येतीची विचारपूस करायचो. प्रवासात खाता येईल असे पदार्थ देऊन वाहनानं त्यांना छत्तीसगढ सीमेवर सोडायचो. रस्त्यात साधं पाणी त्यांना चटकन मिळत नव्हतं. त्यांना काहीही करून घरी जायचं होतं.’
 गौरव म्हणतो, लोकांना मदत करताना वाटलं, आपण देशासाठी काहीतरी केलं.  
भावना म्हणते, कालर्पयत आपल्या सारखीच सुखी-समाधानी होती ही माणसं. पण आज अचानक त्याचं जीवनच बदललं.
 सुट्टय़ा असल्याने निवांत झोपत पडणारा आराध्य कुणी पायी येत आहे का हे पाहण्यासाठी पहाटेच रस्त्यावर जाऊन थांबत असे.
 गौरी, धम्मदीप यांची स्थितीही वेगळी नाही.  या सगळ्या मुलांनी फक्त मदतीचा ध्यास घेतला होता. वेदनेचं जग जवळून अनुभवलं.

  (पराग सर्च संस्थेत कार्यरत आहे.) 

Web Title: When we walked a few steps with the laborers going home ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.