त्याचं जगणं झकास! आपलं भकास ..  हे फीलिंग कुठून येतं??

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 07:53 AM2020-11-19T07:53:50+5:302020-11-19T07:55:01+5:30

सणावाराला इतरांचे डीपी आणि स्टेटस पाहत तासन‌्तास वाया घालवणाऱ्या अनेक मनांत नेमकं काय चाललं होतं?

Theirs life is amazing! But our bhakas .. why this feeling emerge? | त्याचं जगणं झकास! आपलं भकास ..  हे फीलिंग कुठून येतं??

त्याचं जगणं झकास! आपलं भकास ..  हे फीलिंग कुठून येतं??

Next

- प्राची पाठक

व्हाॅट्सॲपच्या थोड्या थोड्या काळाने बदलणाऱ्या स्टेटस अपडेट्समधलं जग कसं एकदम सेलिब्रेशन मूडमध्ये असतं. दिवाळी, दसरा आणि इतर सणांच्या, डेजच्या निमित्ताने त्या हॅपनिंगमध्ये आणखीन भर पडते. कुठे काही खरेदी केली, टाक स्टेटस अपडेट. काही पदार्थ खायला केला, घे फोटोज आणि चढव त्या व्हाॅट्सॲपला. घरात काही बदल केले, टाक स्टेट्सला. कुठे फिरायला गेले, काढ फोटोज. अशी सवय आजकाल बहुतांश लोकांना लागलेली आहे. यात गंमत असतेच. एका मर्यादेपर्यंत गैर काहीच नाही. तुम्ही नीट काही करून/ बनवून/ लिहून काहीतरी प्रेझेंट करत असतात. उत्तम फोटो काढायला शिकत असता, त्यातून आनंद मिळतो, आपण काहीतरी छान करतो आणि मांडतो आहोत याचा आनंद वाटतो तोवर ठीक असतं. पण हेच सगळं करूनही जोवर त्याला खूप जास्त लाइक्स मिळत नाही याची रुखरुख वाटते तेव्हा जरा गडबड असते. कारण सतत भारी, लै भारी काही दाखवायला तुम्हाला त्याच शोधात राहावं लागेल. सतत आपल्याला आता पुढचं काहीतरी लै भारी मिळालंच पाहिजे आणि ते आपण इतरांना दाखवूनच राहू, याचं नकळत प्रेशर येत राहातं. सगळं लक्ष असतं ते त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांवर आणि त्यातच खुश होण्यावर. त्यात आपला खरा आनंद कशात आहे, हे जर लक्षात येणं थांबलं तर?

आता दुसरी बाजू, हे असे फोटो पाहून अनेकांना वाटतं की इतरांचं सगळं कसं छान-छान सुरू आहे नाहीतर आपण ! ही इतरांकडे पाहून स्वतःला कमी लेखायची सवय घातक.

इतरांशी तुलना होणं हे स्वाभाविक आहे. ‘मी कधीच कोणाशी तुलना केली नाही’, असं म्हणणारा माणूस खोटं बोलत असतो. पण सणावारापासून सतत समाजमाध्यमांवर इतरांचा आनंद पाहू अनेकांना आपलं जगणं पोकळ वाटू लागतं, ‘इतरांचं जग झकास आणि आपलं मात्र भकास’ हे फिलिंग वाढतं तिथंही गडबड होतेच.

मुळात हे सारं सुरू होतं तेच तुलनेतून.

काय काय गोष्टींची तुलना करतो आपण? अगदी कोणाचं दिसणं, बोलणं, शारीरिक फीचर्स, कोणाचे पैसे, कपडे, गाड्या, गॅझेट्स, घरं, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांचं लै भारी असणं, त्यांच्या इंटेन्स रिलेशनशिप असं काहीही. कोणाचं करिअर, कोणाची खरेदी, कोणाचं यश/अपयश, कोणाचं घर कुठल्या शहरात, देशात आहे, त्याच्या घरापासून त्याचं ऑफिस किंवा कॉलेज किती जवळ/ दूर आहे, असं काहीही असू शकतं आपल्या डोक्यात. त्यांच्या चांगल्या-वाईटाच्या फूटपट्टीने आपण आपलं आयुष्य तपासून बघत असतो. या वरवरच्या गोष्टींवर आपण आपलं स्वत्त्व, आपलं अस्तिव मोजत असतो. हीच मुळात चुकीची गोष्ट असते. दुसऱ्याच्या एखाद्या भारी गोष्टीमुळे आपलं पूर्ण अस्तित्वच आपण उदास, केविलवाणं, अनलकी करतो. ते आधी बंद करायला हवं.

कोणी आयुष्यात दहा पायऱ्या चढून आज आपल्याला जिथे वाटतो, तिथे असतो. आपण मात्र पायऱ्या चढायला सुरुवात आणि मेहनत करायच्या आधीच तुलना सुरू करतो. हा एक वेगळाच घोळ असतो. त्या विशिष्ट पायऱ्या चढायचं स्किल आपल्यात आहे की नाही, हे ही आपण पाहत नाही. थेट तुलना करून मोकळे होतो. त्यांचं जग छान आणि आपलं जग तर वाईटच आणि आपण तर व्यक्ती म्हणूनही बोगस, अशी तुलना मुळातच एका लेव्हलला नाही. हे आपण स्वतःला बजावायचं.

इतरांचं जे दिसतं, ते तसं असतं की नाही, हा शोधही घ्यायला जायचं नाही.

आपलं आयुष्य उत्तम करण्यासाठी आपले स्किल सेट्स, आपली जिद्द, आपली मेहनत ह्यावर लक्ष ठेवायचं.

आपल्यापेक्षा जे पुढे आहेत असं आपल्याला वाटतं, त्यांचं त्या- त्या गोष्टीतलं चांगलं असणं आपल्या प्रगतीसाठी कसं वापरता येईल, हे शिकायचं. म्हणजे, कोणी मेहनतीने आपल्यापेक्षा बरी बॉडी कमावली असेल, तर आपणही व्यायाम सुरू करायला ते उदाहरण प्रेरणा म्हणून घ्यायचं. आपलं ते भकास, त्याचं ते झकास असा विचार आला मनात की झटकून टाकायचा..

मग आपलं जगणं सुरू होतं.

 

( प्राची मानसशास्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्राची अभ्यासक आहे.)

prachi333@hotmail.com

Web Title: Theirs life is amazing! But our bhakas .. why this feeling emerge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.