लोकशाहीसाठी  थाई तरुणांची बदक क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 07:57 AM2021-01-14T07:57:42+5:302021-01-14T08:00:07+5:30

रेड शर्ट्स ते डक रिव्होल्युशन असा ‌थायलंडच्या तरुण आंदोलनाचा प्रवास सुरू आहे, त्यांची मागणी एकच, लोकशाही.

Thai Youth Duck Revolution for democracy | लोकशाहीसाठी  थाई तरुणांची बदक क्रांती

लोकशाहीसाठी  थाई तरुणांची बदक क्रांती

Next

-कलीम अजीम

थायलँडमध्ये लोकशाही समर्थकांची चळवळ वर्षपूर्तीकडे वाटचाल करत आहे. ‘रेड शर्ट्स’ ते ‘डक रिव्होल्युशन’ असा या चळवळीचा प्रवास झाला. हुकूमशाही अमान्य करत पूर्ण स्वरूपाची लोकशाही सत्ता प्रस्थापित व्हावी, ही मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे.

फेब्रुवारीमध्ये ‘रेड शर्ट’ ग्रुपने निदर्शने सुरू केली. पंतप्रधान ‘प्रयुत्त चान-ओ-चा’ यांनी खुर्ची सोडावी, अशी त्यांची मागणी होती. पंतप्रधानांवर घटना बदलल्याचा व अपहार करून निवडणुका जिंकल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात दोन महिने आंदोलन सुरू होते. सक्तीच्या लॉकडाऊनमुळे निदर्शने बंद पडली.

 

कोरोना व्हायरसची तीव्रता कमी होताच ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा चळवळ आकाराला आली. फिजिकल डिस्टन्सिंग पाळून सरकारविरोधात अनेक तरुणांचे गट रस्त्यावर उतरले.

विद्यार्थी, व्यापारी, तरुण, महिला, वृद्ध व राजेशाही समर्थक गट सर्वच पंतप्रधान विरोधात एकवटले. पाच महिन्यांपासून आंदोलने, मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. सरकारने निदर्शकांचा बंदोबस्त करण्यात कुठलीही कसर सोडली नाही. इतकेच काय तर आणीबाणीदेखील लादली; परंतु तरुणांचे लोंढे मात्र देशभर ठिय्या मांडूनच होते. सप्टेंबरमध्ये काळ्या-निळ्या छत्र्या घेऊन राजधानी ब्लॉक करण्यात आली. डिसेंबरमध्ये प्लास्टिकची बदके घेऊन रस्ते ब्लॉक करण्यात आले; तर गेल्या आठवड्यात लाल रंगाचे शर्ट घालून निदर्शकांनी लक्ष वेधले.

लाल शर्ट आणि पिवळ्या रंगाच्या बदकांचा प्रतीकात्मक वापर करत सरकारविरोधी आंदोलने सुरू आहेत. देशातील विविध शहरांत पिवळ्या आकाराचे खेळणीतील बदक रस्त्यावर सोडण्यात आले आहेत. राजधानी बँकाक सध्या लहान-मोठ्या आकारांच्या अनेक बदकांनी गजबजून गेली आहे.

सुरुवातीला पोलिसांचा हल्ला, रासायनिक पाण्याच्या मारा व अश्रुधुरापासून संरक्षक ढाली म्हणून मोठ्या आकाराचे बदक आंदोलनस्थळी आणले गेले. उद्देश सफल होत असल्याचे लक्षात येताच निदर्शकांनी त्याचा प्रतीक म्हणून वापर सुरू केला.

सध्या राजधानीत विविध आंदोलनस्थळी पिवळ्या बदकांची निदर्शकांनी आरास मांडली आहे. बाजारात, ऑफिसात, घरात, रस्त्यावर, कचऱ्यात, गटारीत, खिशाच्या पेनाला, टोपीला, मास्कला जिकडेतिकडे बदक. टोप्या, कपडे, खेळण्यांत बदक दिसू लागले आहेत.

निदर्शक बदकांचा पोशाख परिधान करून आंदोलनस्थळी जमतात. पोलिसांचे हल्ले रोखण्यासाठी बदक पुढे करतात. लाठ्या-काठ्यांपासून बचाव करण्यासाठी बदक व त्याने सुशोभित केलेले हेल्मेट वापरतात.

आता ही डक रिव्होल्युशन चांगलाच आकार घेते आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------

आंदोलन आणि बदकं

सन २०१३ मध्ये हाँगकाँगच्या एका नदीत मोठ्या आकाराची बदके सोडण्यात आली होती. प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठीचा हा प्रयोग होता. त्यावरून बराच वाद झाला. १९८९ साली चीनच्या तुतियामेन चौकातील क्रांतिकारी आंदोलनात खेळण्यातील बदकांचा वापर झाला. त्यानंतर सरकारने अशा बदकांवर बंदी आणली. इंटरनेट सर्चवरदेखील ही बंदी लागू होती.

सन २०१६ साली ब्राझीलमध्ये एका आंदोलनात रबरी बदके आणली गेली. सरकारी धोरणांचा विरोध व आर्थिक मंदीला अधोरेखित करण्यासाठी त्याचा वापर झाला. बदकाच्या गतीने अर्थव्यवस्था चालू आहे, असा त्यातून अर्थबोध केला गेला.

सन २०१७ मध्ये रशियामध्ये बदके निषेधाचे प्रतीक म्हणून पुढे आली. पंतप्रधानांच्या विरोधी गटाने बदकांचा निषेध म्हणून वापर केला होता.

kalimazim2@gmail.com

(कलीम मुक्त पत्रकार आाहे.)

Web Title: Thai Youth Duck Revolution for democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.