ए भावा, चल की!; सांगलीतली सगळी तरुणाई महापुरात मदतीसाठी उतरते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 07:00 AM2019-08-15T07:00:00+5:302019-08-16T17:06:33+5:30

लाकडी होडय़ा-नावा घेऊन काही तरुण उतरले, पण काही नावा गळक्या, तर काही जडच्या जड. नावाच नाहीत तिथं पत्र्याच्या काहिली, मोठी पातेली, मोडक्या रिक्षांचे फायबर टप, डोकं चालवून तयार केलेले प्लॅस्टिक कॅन-बॅरेलचे तराफे, हवा भरलेल्या इनर हे सारं त्यांनीच जमवलं. किडूकमिडूक संसार सोडून घराबाहेर पडायला बायाबापे तयार होईना, तेव्हा त्यांना समजावणारीही हीच पोरं. आणि नास्ता-जेवण पोहचवायलाही धावणारी हीच पोरं.

sangli flood -story of a terrific human courage & passion of youth | ए भावा, चल की!; सांगलीतली सगळी तरुणाई महापुरात मदतीसाठी उतरते तेव्हा...

ए भावा, चल की!; सांगलीतली सगळी तरुणाई महापुरात मदतीसाठी उतरते तेव्हा...

Next
ठळक मुद्देपाण्यानं पातळी सोडली तशी तरणीताठी पोरं आपणहून मदतीला धावली. आता पाणी उतरताना साफसफाईचं अन् रोगराईचं नवं आव्हान उभं ठाकलंय. तेव्हा या पोरांनीच परत हातात खराटा घेतलाय..

- श्रीनिवास नागे

‘तात्या, काय सांगत हुतो? अडाकला का न्हाय आता? चला आता, जरा दमानं बसा नावंत..’
‘ए भावा, चल की गप. लै शाना होऊ नको. जीव वाचव पह्यला..’
‘मावशी या हिकडं. पाठीवर बसा. नेतो मी.. हं धरा खांदा..’
‘ए म्हवन्या, धर जरा आज्याला. तू पाय पकड, मी हिकडनं उचलतो. आधी माणसं बाहेर काढा रे.. मग त्येचं गठुळं घे रे अरण्या..’
‘ताई, उतरा हळूहळू. आम्ही धरतो. पकडा की हाताला. या. पाय टाकून बसा नावेत.’
महापुराच्या कराल जबडय़ात अडकलेल्या सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा-वारणा काठावरच्या गावांपासून सांगली शहरार्पयतच्या पट्टय़ात आठ-दहा दिवस हेच ऐकायला मिळत होतं. तरणी पोरं आपापल्या गावातली माणसं वाचवायला पुढं आलेली. त्यांचेच हे डायलॉग ! बघंल तेव्हा मोबाइल अन् दीड जीबीच्या पॅकमध्ये अडकल्याचा, घराकडं-कामाधंद्याकडं लक्ष नसल्याचा, गावावरून ओवाळून टाकल्याचा, माणसांचा ‘कनेक्ट’ तुटल्याचा आरोप असणारी ही तरणी पिढी, ती माणसांशी अशी ‘कनेक्ट’ झालेली ! शेतकर्‍यापासून मजुरार्पयत अन् कारखान्यात कामाला जाणार्‍यापासून टपरी चालवणार्‍यार्पयत, कॉलेजच्या नावाखाली बसस्टॉपवर-थिएटरमध्ये टाइमपास करणार्‍यापासून इंजिनिअरिंग शिकणार्‍यार्पयत अन् ब्रॅण्डेड कपडे-शूज घालून मोटारसायकली उडवणार्‍यांपासून कार्यकर्ते म्हणून दादा-भाऊ-साहेबांमागं हिंडणार्‍यांर्पयत सगळी पोरं यात होती.
जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापासून पाऊस पाणी ओततोय. बदाùùदा पाणी पडतंय. जणू ढगफुटीच. चांदोली अन् कोयनेतून पाणी सोडलंय. हळूहळू नद्या पात्राबाहेर पडल्यात. ऑगस्ट उजाडला अन् बघता बघता गावांना विळखा पडू लागला. पुराचा थोडाफार अंदाज आलेल्या प्रशासनानं गावागावांत जाऊन नदीकाठच्या माणसांना बाहेर पडायला सांगितलं. प्रापंचिक सामानसुमान जरा वरच्या अंगाला लावून काहीजण बाहेर पडले. पै-पाहुण्यांकडं जाऊन राहिले.
पण तुफान पावसानं उरात धडकी भरली. धरणातून सोडलं जाणारं पाणी वाढलं. यंदा पूर नव्हे, तर महापूर येणार, याची आकडेमोड सुरू झाली. तोर्पयत महापूर उंबर्‍याला टेकला अन् रात्रीत दोन-चार फुटानं घरातही शिरला ! सातार्‍याच्या कर्‍हाडपासून सांगली-मिरजेर्पयत ऐंशी-नव्वद किलोमीटरमधली गावं कृष्णेनं कवटाळली. तिकडं चांदोलीपासून सांगलीजवळच्या हरिपुरार्पयत वारणेचं पात्र अक्राळविक्राळ झालं. गावांना पाण्याचा वेढा पडला. हळूहळू गावागावांत दहा-वीस फुटार्पयत पातळी चढली. होत्याचं नव्हतं झालं !
सांगली जिल्ह्यातली सव्वाशेवर गावं पुराच्या जबडय़ात गेली. दीड-दोन लाखावर माणसं घरात अडकलेली. तुटपुंजी साधनं, अपुरं मनुष्यबळ, अंदाज चुकल्यानं भरकटत जाणारं नियोजन यामुळं हतबल झालेलं प्रशासन करणार काय? कुठंवर लढणार? 
..अशावेळी ही तरणीताठी पोरं मदतीला आली.


कट्टय़ावर, टपरीवर घोळक्यानं बसणारी पोरंच महापुरात राबणार्‍यांत उठून दिसत होती. याच पोरांनी म्हातार्‍या-कोतार्‍यांना, पोरीबाळींना, बाया-बापडय़ांना, चिल्ल्यापिल्ल्यांना पाण्यातनं बाहेर काढलं. पहिल्यांदा ही पोरंच पाण्यात उतरली, जिवाची पर्वा न करता ! तेव्हा प्रशासन का काय म्हणतात त्याची हालचाल व्हायच्या आधी, आर्मीच्या बोटी-जवान यायच्या आधी ह्या तरण्याबांड पोरांनीच ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू केलं होतं. तरुण मंडळं, सामाजिक-सेवाभावी संस्था-संघटना, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरची पोरं यात पुढं होती. 
लाकडी होडय़ा-नावा घेऊन काहीजण उतरले. त्यातल्या काही नावा गळक्या तर काही जडच्या जड. नावाच नाहीत तिथं खीर-गूळ तयार करण्याच्या पत्र्याच्या काहिली, मोठी पातेली, मोडक्या रिक्षांचे फायबर टप, डोकं चालवून तयार केलेले प्लॅस्टिक कॅन-बॅरेलचे तराफे, हवा भरलेल्या इनर हीच त्यांची सामग्री. तिच्या जोरावर पाण्यानं वेढलेली गावं रिकामी केली. माणसांना धीर देऊन सुरक्षितस्थळी, निवार्‍याला नेलं. काही माणसं जरा जादाच खट्ट! पुराचा वेढा पडलाय, घरात पाणी शिरतंय-शिरलंय, तरीही यायला तयार नाहीत. मुकी जित्राबं घरातच ठेवून जायला बायाबापे तयार होईना. त्यांना समजावणारीही हीच पोरं.
पाणी घुसलेल्या गावात, भागात रात्री लाइट नाहीत. सगळीकडं अंधार गुडूप. कुणाच्या तरी हातातल्या नाहीतर तोंडात पकडलेल्या टॉर्चच्या उजेडात पुराचं दिसणारं भेसूर रूप. नजर जाईल तिथंर्पयत नुसतं पाणीच पाणी ! अधनंमधनं कोसळणार्‍या पावसाच्या सरी. पायात वळवळणार्‍या साप-जनावरांची भीती. हातातला मोबाइल डिस्चार्ज झालेला. लाइट नसल्यानं चाजिर्र्गची सोय नाही. मोप मोठं घर बांधलंय; पण ते पाण्यात. दारातली गाडी पाण्यात, तर पुरातनं बाहेर काढलेल्या गाडय़ांतलं पेट्रोल संपलेलं. पंप बंद. एटीएममध्ये खडखडाट. तरीही या अस्मानी संकटाशी झुंजणार्‍या जिगरबाज पोरांनी लाखावर जीव वाचवले.
एनडीआरएफच्या बोटी अन् आर्मी आल्यावर परत त्यांच्या बरोबरीनं ही पोरं कामाला लागली. जिथं पोरांना जाता येत नव्हतं, तिथं आर्मी पोहोचली. ज्यांना धोका आहे, त्यांना पुरातून सुरक्षितस्थळी हलवलं. ज्यांना धोका नाही, त्यांना पाणी-दुधासोबत खाण्यापिण्याचं सामान नेऊन दिलं. त्यातली निम्मी मदत पोरांनीच गोळा केलेली ! पुरात अडकलेल्यांपैकी काहींचे मोबाइल सुरू होते. सगळ्याच कंपन्यांचं नेटवर्क कोलमडून पडलं होतं. त्यातून अधनंमधनं येणार्‍या नेटवर्कमुळं त्यांचे मेसेज पडत होते. मेसेज पडला की फॉरवर्ड व्हायचा. मग त्या-त्या भागातली पोरं मदतीला पळायची. नाही तर आर्मीच्या बोटींना पाठवलं जायचं.
कोण कुठला, कुण्या जातीचा, कुठल्या पक्षाचा, माहीत नाही ! पण मदतीचा हात मात्र कुणीच आखडता घेत नव्हतं. पुरानं कवेत घेतलेल्यांत जसा टोलेजंग बंगलेवाला होता, तसा कुडाच्या झोपडीतला मजूरही होता. महापुरानं सगळ्या भिंती तोडल्या!  
तोवर पावसानं दम टाकला होता. पाणी चढायला लागल्यापासून आठवडाभर ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू होतं. पुरात अडकलेल्यांसाठी खाणंपिणं, दूध-दुभतं, औषधं हे सगळं जमवायचं अन् पोहोचवायला परत ही पोरंच कामाला आली..
घर सोडून पुरातून बाहेर आलेल्यांना पै-पाहुणे, मित्रमंडळी, ओळखीवाल्यांनी घरात आसरा दिला. खायप्यायची सोय केली. कुणीच जवळचं नसणारी, दुसर्‍याला कशाला त्रास द्यायचा म्हणणारी भिडस्त मंडळी शाळा, कॉलेज, मंगल कार्यालयं, समाजमंदिरं यात आसर्‍याला थांबली. हेच त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन केंद्र. जिथं तयारी होती, तिथं लगेच जेवण, नास्ता, चहा-पाणी, कपडे-लत्ते, अंथरूण-पांघरूणाची सोय झाली. सामाजिक संघटना, गणेश मंडळं, क्रीडा मंडळं, नेतेमंडळी, नानाविध फाउण्डेशन यांनी जबाबदारी उचलली. या मंडळांतली पोरं सराईतासारखी काहीबाही आणून देत होती. पहिल्यांदा जरा धांदल उडाली. नंतर मात्र सगळं शिस्तवार. शहरी भागात जरा सोपं झालं. अनुभवी संस्था-संघटना-माणसं होती. पण खेडय़ा-पाडय़ात ही बेजमी लावून द्यायचं काम तरण्या पोरांवरच आलं..
आता पाणी उतरताना साफसफाईचं अन् रोगराईचं नवं आव्हान उभं ठाकलंय. तेवढी यंत्रणाच नाही आपल्याकडं. आता या पोरांनीच परत हातात खराटा घेतलाय..
‘ही पोरं माणसांपासून लांब गेल्यात’, ‘यांच्या संवेदना हरवल्यात’, असं म्हणणारी गावगाडय़ातली पिढी अन् पुरापासून दूर असलेली पूव्रेकडची जनता, व्हाइट कॉलरवाले आता या पोरांच्या संवेदनशीलतेकडं टकामका बघताहेत! आपत्ती व्यवस्थापन तथा डिझास्टर मॅनेजमेंटमधला नवा धडा शिकताना तोंडाचा आùù झालाय त्यांच्या!!

****

पुरात उडय़ा टाकणारे बहाद्दर
मदतीलाही पुढं

दांडगी-दांडगी माणसं ओढून नेणार्‍या पुराच्या पाण्यात तीस-चाळीस फुटावरच्या पुलांवरून उडय़ा टाकणारे बहाद्दर कृष्णा-वारणाकाठावर कमी नाहीत ! या पठ्ठय़ांचे व्हिडीओ जगभर व्हायरल झालेत. अशी पोरं या महापुरातही दिसली, आधी भरपुरात उडय़ा टाकताना अन् नंतर माणसं वाचवताना!

डॉक्टरांची यंग ब्रिगेड


वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज पश्चिम भागाला पुराचा जबर फटका बसला. त्यातही पलूसचा कृष्णाकाठ जास्तच खोलात. पण तिथं पतंगराव कदमांचे चिरंजीव आमदार विश्वजित यांनी त्यांच्या भारती विद्यापीठाची यंत्रणा कामाला लावली होती. शिस्तबद्ध अन् पद्धतशीर काम. विश्वजित यांच्याकडची तरणी पोरं पाण्यात उतरत होती. माणसं बाहेर काढत होती. काहीजण मदत केंद्रावरची यंत्रणा हाताळत होती. तिथं अंथरूण-पांघरूण, कपडालत्ता, पाणी, चहा-नास्ता, जेवणाची चोख व्यवस्था ‘भारती’मार्फत केली होती. भारती कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम औषधं घेऊन हजर होती. माणसं पाण्यातनं बाहेर काढली की अ‍ॅम्ब्युलन्स, जीपमधनं पळवत निवारा केंद्रावर नेली जायची. 


(लेखक लोकमतच्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत.)
 

Web Title: sangli flood -story of a terrific human courage & passion of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.