positive thinking & attitude is most powerful soft skill | सांगा कसं जगायचंय? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?
सांगा कसं जगायचंय? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?

ठळक मुद्देपॉझिटिव्ह थिंकिंग तसा हा शब्द आपल्याला माहिती आहे; पण त्याचा हात धरला तर आपलं करिअरही फळफळेल हे कुठं माहिती आहे.

- डॉ. भूषण केळकर

माझा एक मित्र ! मूर्तिमंत उत्साहाचा झरा ! व्यवसायात सुरुवातीला खूप अवघड परिस्थिती. ती अवघड स्थिती जवळ जवळ 4-5 वर्षे राहूनसुद्धा - आम्हा मित्रांना कळू-जाणवूसुद्धा दिली नाही. आता अत्यंत यशस्वी उद्योजक आहे. 50 अर्धशिक्षित लोकांना रोजगार दिलाय. उत्कृष्ट वस्तू त्यांच्याकडून बनवून घेऊन तो युरोप ऑस्ट्रेलियात निर्यात करतोय. कॉलेजपासूनचे त्याचे मला आवडलेले वाक्य  "Rest of my life begins now !" माझ्या उरलेल्या आयुष्याची सुरुवात आत्तापासून!
मी माझ्या बायकोला सांगूनच ठेवलंय. कधी जीवनात निगेटिव्ह काळ आला, उदास वाटलं तर मी त्याच्याकडे आठवणीने जाईन आणि ऊर्जा घेऊन येईन. त्याला भेटलं की मला जाणवतं की माझं मन उत्साहानं भरून जातं. कृतीप्रवण होत. हे सगळं मित्रपुराण सांगण्याचं कारण काय तर हे पॉझिटिव्ह थिंकिंग हा सॉफ्ट स्किल्सचा अजून एक अविभाज्य घटक!
थॉमस एडिसनला असंख्य वेळा अपयश आलं. दिवा तयार करण्याच्या त्याच्या प्रयत्नांमध्ये काचा फुटणे, जाळपोळ होणं, धूर होणं हे सर्व अनेक वेळा होऊन तो कुटुंबीय, मित्र, गावकरी यांच्या कुचेष्टेचा धनी झाला. हे सारं होऊनही जेव्हा तो यशस्वी झाला तेव्हा तो म्हणतो की- "I have not failed, I have just found 10,000 ways of how it will not work !" ! (म्हणजे - ‘मला अपयश आलेले नाही, उलट मी अशा 10,000 पद्धती शोधल्या आहेत जे अपेक्षित परिणाम देत नाहीत.) आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग  लगेच कळतं ते इथं.
मी लहानपणी ‘‘कधी पाहतो’’ ही कविता वाचली होती. आपल्यामध्येच एक सकारात्मक आणि एक नकारात्मक अशी दोन रूपं असतातच हे विशद करणारी ती कविता. त्याचे अलीकडचे उत्तम सादरीकरण मला भावले ते माझ्या अत्यंत आवडत्या अशा कवीच्या - संदीप खरेच्या कवितेत. 
तो म्हणतो.
मी हजार चिंतानी 
हे डोके खाजवतो।
तो कट्टय़ावर बसतो, 
घुमतो, शीळ वाजवतो।
मी पायी 
रुतल्या काचांवरती चिडतो।
तो त्याच घेऊन 
नक्षी मांडून बसतो!
संदीप खरे. ज्याचा मी कधीही एक्झॉस्ट न होणारा ‘‘एक्झॉस्ट फॅन’’ आहे. त्यानं पॉझिटिव्ह थिंकिंग या कवितेतूनच शिकवलंय असं मला वाटतं.
तुम्हाला ती दोन विक्रेत्यांची गोष्ट माहिती आहे का? (अचानक ‘अरेबियन नाइप्स’ची आठवण झाली ना?)
युरोप मधल्या एका बुट-चपलांच्या प्रख्यात कंपनीचे दोन तज्ज्ञ विक्रेते आफ्रिकेमध्ये येतात. कंपनीच्या पादत्राणांची विक्री आफ्रिकेत वाढवणं व त्यासाठी अंदाज देण्यासाठी त्यांना पाठवलेलं असतं. तिथे आल्यानंतर दोघांना एक आश्चर्यजनक चित्र दिसतं की, आफ्रिकेत सगळेजण अनवाणीच चालत असतात; कोणाच्याच पायात ना वहाण ना बूट!
एक विक्रेता कंपनीला कळवतो, मी तत्काळ परत येतोय; इथे बाजारपेठ नाही कारण सगळेच अनवाणी आहेत.
दुसरा विक्रेता कंपनीला कळवतो- एकच्या ऐवजी दोन जहाजे भरून वहाणा पाठवा कारण इथे सगळेच अनवाणी आहेत !! सगळा आफ्रिका आपली बाजारपेठ आहे!!
म्हणून पाडगावकरांनी म्हटलंय-
‘‘सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की 
गाणं म्हणत’’?
 ठरवा तुम्हीच!

Web Title: positive thinking & attitude is most powerful soft skill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.