नगराध्यक्ष ते कार्यकर्ती- एका तरुणीनं उभारलेला दारुमुक्तीचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 03:26 PM2019-08-22T15:26:57+5:302019-08-22T15:27:32+5:30

गडचिरोली जिल्ह्यातच मी वाढले. म्हणायला दारूबंदी; पण अवतीभोवती दारूसह गुटखा, खर्रा यांच्या व्यसनानं वेढलेली मुलं-माणसं पाहत होते. थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून येत अहेरीची नगराध्यक्षही झाले. मात्र प्रश्न होता, हे व्यसनचक्र कुठवर चालणार? मग मीच उत्तर शोधायचं ठरवलं!

mayor to activist - a fight against alcoholism by a young girl | नगराध्यक्ष ते कार्यकर्ती- एका तरुणीनं उभारलेला दारुमुक्तीचा लढा

नगराध्यक्ष ते कार्यकर्ती- एका तरुणीनं उभारलेला दारुमुक्तीचा लढा

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्माणमध्ये सहभागासाठी या साइटवर संपर्क साधता येईल. http://nirman.mkcl.org

 प्राजक्ता पेडपल्लीवार (शब्दांकन- पराग मगर  )

बोरी, राजपूरपॅच येथील महिलांचा रात्नी फोन धडकला. ताई  खूप मोठा गूळसडवा लपवून ठेवला आहे. तुम्ही सकाळी लवकर या. डोळ्याला डोळा लागत नव्हता. समोर सडव्याचे ड्रम दिसत होते. सकाळीच धावत गावात गेली. महिलांना घेऊन प्राणहिता नदीकाठावर पोहोचली. उन्हाळ्याचे दिवस होते. पात्न बरेच कोरडे होते. कसलाही विचार न करता आम्ही पात्नात शोधाशोध सुरू केली. गुळाचा सडवा असलेले शेकडो ड्रम सापडले. सोबत काही युवकही होते. सपासप कुर्‍हाडीचे वार ड्रमांवर बसले. कोरडय़ा पात्नात आता केवळ सडवा पसरला होता. मुक्तिपथमध्ये काम सुरू केल्यापासून ही सर्वात मोठी कारवाई होती. दिवसभर हाताचा वास गेला नव्हता. आता हा वास येईनासा झाला आहे. भूतकाळाच्या आठवणी आजही हे तू कशासाठी करते म्हणून धडके देत असतात.. याच्या उत्तरासाठी ‘निर्माण’चा प्रवास हमरस्ता म्हणून डोळ्यासमोर येतो.. 
माझं बालपण गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गेलं. वडील वनविभागात. त्यामुळे त्यांची बदली तिथे आमची बदली. याचा एक फायदा झाला. नवनवीन परिसर, तिथली आदिवासी संस्कृती मला माहिती होत गेली. वडील सामाजिक कार्यात सक्रिय होते. गावातील लोक अनेक समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे. या समस्या सामाजिक व राजकीय दोन्ही अंगाच्या असायच्या. त्या कानावर पडत गेल्या. सभोवताल समजून घ्यायला याची खूप मदत झाली. वडिलांनी हवं ते शिकायची मुभा दिली होती. आपण तेव्हा शिक्षक व्हावं असं खूप वाटायचं. या वाटण्यामुळेच डी.एड. आणि बी.एड.देखील केलं. पेपर दररोज वाचण्याची सवय अंगवळणी पडली होती. डी.एड. करीत असताना ग्रंथालयात अनेक पेपर मी वाचायची. त्यातच एक दिवस निर्माण संदर्भात एक लेख ऑक्सिजन पुरवणीत वाचण्यात आला. तेव्हाच ठरवलं. आपण शिबिरात सहभागी व्हायचं.
आपण इतरांसाठी काहीही करायचं म्हटलं की, आधी आपला कम्फर्ट झोन आडवा येतो. स्वतर्‍ गडचिरोली जिल्ह्यातील असतानाही सर्चमध्ये अनोळखी लोकांमध्ये राहताना मला कठीण गेलं. पण यातूनच मी स्वतर्‍ला सापडत गेले. निर्माणच्या ‘कर के देखो’ या ब्रीदवाक्याने प्रत्येक परिस्थितीला वेगळ्या नजरेने बघण्याची सवय लागली. थोडक्यात काय तर मला माझी नजर सापडली. शिक्षण आटोपल्यावर एका इंग्रजी शाळेत सोबतच एका जिल्हा परिषद शाळेत वर्ग घ्यायला मी सुरु वात केली. लहान मुलेही खर्रा व तंबाखू खात असल्याचं माझ्या लक्षात आलं. गाणी, गोष्टी व इतरही उपक्रमातून त्यांना या व्यसनातून बाहेर काढण्याचे माझे प्रयत्न सुरू झाले.
काही वर्षात लग्न झालं. अहेरीला सासरी गेले. हा तालुका राजकीय दृष्टीने आधीपासूनच प्रगल्भ होता. जिल्ह्याचं राजकारण अहेरीहून हलायचं. सासरीही भक्कम राजकीय वातावरण होतं. अनेक चर्चा व्हायच्या. मीही त्यात सहभागी होत आपले मत मांडायचे. माझं थेट बोलणं अनेकांनी हेरलं. याच काळात अहेरी तालुक्याला नगर पंचायतचा दर्जा मिळून प्रथमच नगरसेवकांसाठी निवडणूक होणार होती. निवडणुकीत मी उभी राहिले. लोकांच्या थेट समस्यांवर बोट ठेवत गेले आणि निवडून आले. एवढेच 17 पैकी 17 मतं मिळवून अहेरीची पहिली नगराध्यक्ष होण्याचा मानही मिळाला. आता सामाजिक कार्य करण्याची दिशा मिळाली. सर्वप्रथम अहेरी शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्याचा चंग बांधला. प्लॅस्टिकबंदी केली. स्वतर्‍ फिरून प्लॅस्टिक वापरणार्‍यांवर दंड आकारला. कामाचा धडाका सुरू होता. पथदिवे, वृक्षलागवड या मोहिमा जाणीवपूर्वक हाती घेतल्या.
नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर मी एक लोकसेवक असायची. घर आणि राजकारण पूर्ण वेगळं ठेवलं. जिल्ह्यात 1993 पासून दारूबंदी होती. आतार्पयत व्यसन या समस्येशी थेट संबंध आला नव्हता. पण नगराध्यक्ष म्हणून शहरासह जिल्ह्यात फिरताना दारूमुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न मी जवळून पाहत होते. त्यातच आयुष्याच्या एका वळणावर दारूच्या व्यसनामुळे माझ्या जवळच्या माणसांना आयुष्यातून उद्ध्वस्त होताना मी पाहिलं. या व्यसनाची दाहकता मला आतून हलवून गेली. अडीच वर्षाची नगराध्यक्ष पदाची टर्म संपत आली होती. दारूचे व्यसन हा एकच प्रश्न माझा पिच्छा पुरवत होता. याच दरम्यान 2016 मध्ये डॉ. अभय बंग याच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी ‘मुक्तिपथ’ हा पथदर्शी उपक्रम राज्य शासनाच्या सहकार्यातून सुरू झाला होता. मी या उपक्रमात सहभागी झाले. मुक्तिपथ अहेरी तालुका संघटक म्हणून दुसरी इनिंग सुरू केली. एकीकडे नगरसेवक आणि दुसरीकडे गावागावात जाऊन बायांसोबत दारूविक्री बंद करण्यासाठी धडपडणारी मुक्तिपथची कार्यकर्ती अशा दुहेरी भूमिकेतून काम सुरू केलं. हा तुझा पब्लिसिटी अजेंडा आहे असे म्हणत अनेकांनी जोरदार टीकाही केली. ज्या शहरात एकेकाळी नगराध्यक्ष म्हणून मी फिरायची त्याच शहरात आता संघटक म्हणून दारू व खर्रा बंद करण्यासाठी मी फिरते आहे.
गावागावांमध्ये मुक्तिपथ गाव संघटनांना आणखी बळकट केले. दारूविक्र ी बंदीचे ठराव घेतले. पुढचा टप्पा होता अहिंसक कृतीचा. महिला माझ्या पाठीशी आणि मी त्याच्या पाठीशी. माहिती मिळेल तिथे जाऊन दारूचे साठे, मोहाचे सडवे आम्ही नष्ट करत गेलो. आजही ते सुरूच आहे. गाव, यामुळेच माणसं मला खर्‍या अर्थानं कळायला लागली. घरी कुणीही दारू पीत नसताना इतरांच्या घरी ही दारू कुणी पिऊ नये यासाठी झटणारी अंजनाताई येथे भेटल्या. गाव दारूमुक्त करण्यासाठी सतत झटणारे महागावचे पोलीसपाटील येथे भेटले. ग्रामीण भागातील स्री भरपूर कष्ट करून घर सांभाळते आणि नवरे केवळ दारू पिऊन पैसा उडवतात. परिवाराचा शारीरिक व मानसिक छळ करतात. या त्नासाला कंटाळलेल्या स्रिया गावागावांमध्ये दारूबंदीसाठी सक्रि य लढा देत आहेत.
ही लढाई खूप मोठी आहे. पोलिसांची कायम मदत घ्यावी लागते. आजही गावात जाताना, दारूसाठे पकडताना आपल्याला हे जमेल का असा विचार मनात येतोच. पण त्याच क्षणी ‘कर के देखो’ची घंटी वाजते. दिवस-रात्न हा प्रकारच नसतो. गाव दारूमुक्त करणं हाच ध्यास. आपल्या सगळ्या समस्या विसरून दारूबंदीसाठी झगडणार्‍या गावातल्या बाया माझी ताकद आहे. त्यांच्या साथीनं माझं काम सुरू आहे.
                            

Web Title: mayor to activist - a fight against alcoholism by a young girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.