खेलो इंडियाची मेडल्स लुटून आणणार्‍या खेडोपाडीच्या मुला-मुलींच्या जिगरबाज संघर्षाची कथा

By meghana.dhoke | Published: January 30, 2020 08:00 AM2020-01-30T08:00:00+5:302020-01-30T08:00:05+5:30

‘खेलो इंडिया’मध्ये मेडल्स घेऊन आलेली ही खेडय़ापाडय़ातली मुलं. जो-तो आणि जी-ती ‘ऑक्सिजन’ला एकच सांगत होते, ‘आपल्याला चान्स भेटला तर त्या चान्सचा इचार करायचा, आणि जीव लावून खेळायचं; येवढंच डोक्यात होतं. आता पुढचं पुढं, लई इचार करत नाही!’ ज्यांची गोल्ड मेडल्स अगदी थोडक्यात हुकली असे सिल्व्हर आणि ब्रॉन्झवाले पण म्हणत होते, मेडल तर लागलं!

Khelo India 2020- Maharshtra number 1- meet the small town heros & medal winners, who are born to win! | खेलो इंडियाची मेडल्स लुटून आणणार्‍या खेडोपाडीच्या मुला-मुलींच्या जिगरबाज संघर्षाची कथा

खेलो इंडियाची मेडल्स लुटून आणणार्‍या खेडोपाडीच्या मुला-मुलींच्या जिगरबाज संघर्षाची कथा

Next
ठळक मुद्दे‘खेलो इंडिया’मध्ये महाराष्ट्राची मान उंचावणारे खेळाडू काय म्हणतात.

मुलाखती -  समीर मराठे, मेघना ढोके, माधुरी पेठकर, स्वदेश घाणेकर, गिरीश जोशी,सचिन भोसले

‘खेलोगे, कुदोगे तो बनोगे लाजवाब.’
- ही ‘खेलो इंडिया’ची टॅग लाइन आहे. नुकतीच ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आसामच्या राजधानीत गुवाहाटीत संपन्न झाली. या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणार्‍यांना पुढील स्पर्धाची संधी आणि दरमहा 10 रुपयांसह शिष्यवृत्ती आणि सुविधा मिळत असल्याने या स्पर्धेसाठी ‘पात्र’ ठरावं म्हणून मेहनत घेणार्‍या कुमारवयीन मुला-मुलींची संख्याही वाढते आहे. 
या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह एकूण 256 पदकांची कमाई केली. सलग दुसर्‍यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानही पटकावला. 
इथं जिंकलेली सगळीच मुलं लगेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळतील आणि थेट ऑलिम्पिकर्पयत जातील असा दावा कुणीच करत नाही. मात्र तरीही या मुलांची एक गोष्ट आहे. त्या गोष्टीची प्रातिनिधिक चर्चा करायची म्हणून हा अंक.
खेलो इंडियात पदकं मिळवलेल्या काही मुला-मुलींशी ‘ऑक्सिजन’ने संपर्क केला, त्यात सायकलिस्ट आहे, अ‍ॅथलिट्स आहेत, वेटलिफ्टर्स आहेत आणि कुस्तीगीरही आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांत ग्रामीण खेळाडूंचं प्रमाण शेकडा 80 टक्केच्या आसपास आहे. या प्रत्येक खेळाडूची एक गोष्ट आहे. खेळण्याचीच नाही, तर त्यांच्या जगण्याचीही.
मात्र जागा आणि वेळेच्या मर्यादेअभावी सर्वच खेळाडूंशी संपर्क साधणं शक्य नव्हतं. म्हणून ऑक्सिजनने केवळ निवडक खेळाडूंशी गप्पा मारल्या आणि आपल्याच ‘लोकल हिरो’ मुला-मुलींचं यश साजरं करायचं ठरवलं.
पण मग लक्षात आलं की गोष्ट फक्त यश-अपयश- जिंकणं-हारणं आणि खेळापुरती नाही. ही गोष्ट त्यापलीकडे बदलत्या क्रीडा संस्कृतीची आहे. पालकांच्या मानसिकतेची आहे. ग्रामीण भागातल्या मुला-मुलींच्या अपार जिद्दीची आणि उमेदीचीही आहे.
त्या उमेदीचं इन्फेक्शन सगळ्यांना व्हावं म्हणून हा खास अंक.
ज्यांच्याशी आम्ही बोललो आणि ज्यांच्याशी बोलू शकलो नाही; त्या सर्वच पदकविजेत्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा!
****************

‘खेलो इंडिया’मध्ये  महाराष्ट्राची मान उंचावणारे खेळाडू काय म्हणतात..

देशातल्या तरुण, गुणवान खेळाडूंचा शोध घेणारी ‘खेलो इंडिया’ ही राष्ट्रीय स्पर्धा यावर्षी गुवाहाटीत झाली. तिथे आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवून आलेल्या महाराष्ट्रातल्या मुला-मुलींना गाठायचं असं ‘ऑक्सिजन’ टीमने ठरवलं, तेव्हा स्पर्धा नुकतीच संपली होती. ही मुलं अजूनही प्रवासात होती.
आधीच अडनिडं वय! मुळात  ‘खेलो इंडिया’ ही स्पर्धाच दोन गटांत होते र्‍ एक गट अंडर 17 आणि दुसरा अंडर 21.
म्हणजे जेमतेम टीनएजर असलेली, कुणी अकरावी, बारावीत तर कुणी फस्ट-सेकंड इअरला शिकणारी ही मुलं. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे ज्यांना ज्यांना मेडल्स मिळाली, ते बहुसंख्य खेळाडू खेडय़ापाडय़ातून आलेले! म्हणजे धोनीच्या भाषेत सांगायचं, तर  ‘स्मॉल टाउन इंडिया’वाले!
त्यांच्याशी संपर्क करणंच मुळात काहीसं अवघड होतं. एकतर गुवाहाटीतली स्पर्धा संपताच ट्रेनने ही मुलं आपापल्या गावांकडे परत निघालेली. त्यांच्याकडे ना फोन, ना स्मार्टफोन. एखाददुसर्‍या मुलाकडे असलेला फोन हाच अनेकांचा ‘कॉमन कॉन्टॅक्ट पॉइंट’! गुवाहाटीहून ट्रेनने निघालेली ही मुलं घरी पोहोचायलाच तीन-तीन दिवस लागले. 
काहींशी त्या प्रवासात गप्पा मारल्या. तर काहीजण पुढच्या स्पर्धेसाठी आपापल्या कॅम्पना रवानाही झाले. सरावालाही लागले. आम्ही गप्पा मारल्या तेव्हा खेलो इंडियातलं पदक मागे ठेवून पुढच्या लक्ष्यासाठी रगडा मारायलाही अनेकांनी सुरुवात केलेली दिसली. बाकीचे आपापल्या घरी परतले तर काही आल्या आल्या थेट शेतात रवाना झाले. कुठं रेंज आहे, कुठं नाही, त्यात संपर्क करायचा तर तो मुख्यत्वे त्यांच्या वडिलांच्या फोनवर.
या सार्‍यातून ही मुलं भेटली तर ती कशी दिसतात?
-एकदम बिनधास्त.
हसरी.
कसली तक्रार नाही. भुणभुण नाही. कुणाला दोष देणं नाही. अमुक जमलं; पण तमुक जमलं नाही, कारण ढमुक नव्हतं असं कुणी काहीच सांगितलं नाही. ना कसलं रडगाणं, ना कसल्या तक्रारी.
होता फक्त आनंद.
पण तो आनंद फक्त मेडल मिळाल्याचा नव्हता, तर ‘खेलो इंडिया’च्या निमित्ताने आपल्याला संधी मिळाली आणि आपण ती वाया दवडली नाही याचा होता. 
त्या आनंदाचं ना कुणी दणक्यात सेलिब्रेशन केलं, ना फेसबुक-इन्स्टावर पोस्टी पाडल्या, ना पाटर्य़ा केल्या. त्यापलीकडे जात या मुलांनी मिळालेली संधी जगून घेतलेली दिसली, कारण जो -तो आणि जी-ती ‘ऑक्सिजन’ला एकच सांगत होते, ‘आपल्याला चान्स भेटला तर त्या चान्सचा इचार करायचा, आणि जीव लावून खेळायचं; येवढंच डोक्यात होतं. आता पुढचं पुढं, लई इचार करत नाही!’
ते लई इचार न करण्यामुळे कुणी खेळाचं, मेडलचं काही प्रेशर घेतलं किंवा त्याचं दडपण मनावर आलं असंही दिसलं नाही. ज्यांची गोल्ड मेडल्स अगदी थोडक्यात हुकली असे सिल्व्हर आणि ब्रॉन्झवाले पण म्हणत होते, मेडल तर लागलं. नेक्स्ट टाइम अजून एफर्ट टाकणार, जास्त काय नाही!’
हे सारं करताना आणि म्हणताना, त्यांना आपल्या पालकांच्या कष्टांची नुस्ती जाण दिसली नाही, तर अनेकांच्या बोलण्यात आपल्या अशिक्षित, गरीब पालकांचा अभिमानही होता. आपले आई-बाप मातीत राबून आपल्या स्वप्नांना बळ पुरवतात, याची अत्यंत कृतज्ञ जाण या सगळ्या मुलांच्या मनाशी अगदी पक्की दिसली. आपले वडील आपल्यासाठी किती मरमर राबतात आणि आपलं ट्रेनिंग अडू नये, म्हणून पोटाला चिमटा घेऊन कसे पैसे पाठवतात, हे सांगताना अनेकांना रडू आवरत नव्हतं.
त्यांच्या स्वप्नांसाठी आपण कितीही ढोर मेहनत करू असं ही मुलं डोळ्यात पाणी आणून सांगत होती.
..या सगळ्यांशी बोलल्यावर आम्ही सगळे थक्क होऊन कितीतरी वेळ नुस्ते शांत बसलो. वाटलं शहरात राहणारी, सगळ्या सुविधा उपभोगणारी किती मुलं ही आव्हानांना भिडताना इतकी हिमतीची असतात..?
- या अंकातल्या कहाण्या वाचाल, तेव्हा तुम्हालाही हाच प्रश्न नक्की पडेल!

******

‘खेलो इंडिया’मध्ये  मेडल मारणार्‍या मुलांचे आई-बाप काय म्हणतात?

ऑक्सिजनने या मुलांना हुडकायचं ठरवलं, तेव्हा आधी हाताशी आले ते त्या मुलांच्या आई-वडिलांचे संपर्क! बहुतेक सारे खेडय़ापाडय़ात राहाणारे! गुवाहाटीहून निघालेल्या आपल्या पोराला / पोरीला मेडल मिळालंय, हे माहिती; आणि त्यामुळे ऊर भरून आलेला.. बाकी प्रेस म्हणजे काय, त्या प्रेसच्या पत्रकारांना मुलाखती द्यायच्या म्हणजे काय, हे कुणाला अज्जिबात म्हणजे अज्जिबात ठाऊक नाही. अनेकांना तर आपली मुलं गुवाहाटीत म्हणजे देशाच्या नक्की कोणत्या कोपर्‍यात खेळायला गेली आहेत हेसुद्धा माहीत नव्हतं!
मुलं कुठं गेली, तिथं कशी राहातील, येताना रेल्वेनं येतील, त्यांच्याकडे फोन नाही, संपर्काचं साधन नाही, धुक्यात अनेक गाडय़ा लेट झाल्या, काहींची इंजिनं बिघडली, सोबत मोठं कुणीही नाही.
आणि ही ‘टीएजर’ मुलं म्हटलं तर एकटीच प्रवास करत आहेत, तर पालकांना किती काळजी वाटायला हवी.
मात्र खेलो इंडियात पदक कमावलेल्या मुलांच्या पालकांशी बोललो आम्ही तेव्हा ते सांगत होते, ‘पोरं पाहतील की त्यांचं. त्यांना त्यांची जिम्मेदारी समजती, ते राहत्यात एवस्थित!’
पदकविजेत्या ज्या मुलांशी संपर्क केला, त्यापैकी शेकडा 98 टक्के मुलांकडे फोनच नव्हते. ( स्मार्टफोनची तर बातच सोडा!) त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करायचा तर त्यांच्या आईला किंवा वडिलांना फोन करावा लागला.
खेडय़ापाडय़ात, निमशहरांत राहाणारे, जेमतेम शिकलेले, जेमतेमच आर्थिक परिस्थिती असलेले, कुणी शेतकरी, कुणी मजूर, कुणी शिक्षक, तर कुणी लहानसे व्यावसा¨यक असे हे पालक. 
मात्र त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट सहज लक्षात येत होती, की त्यांच्या मुलांचं यश हे खरं तर या पालकांच्या मुलांवरच्या विश्वासाचं आणि मुलांना मोकळेपणानं जगू देण्याच्या वृत्तीचं यश आहे. हे पालक मुलांच्या मागे सीसीटीव्ही कॅमेर्‍यासारखे फिरत नाहीत की मुलांच्या पायाशी चंद्रतारे आणून ठेवत नाहीत. ना ते आपण मुलांचे ‘मित्र’ आहोत असा काही दावा करतात.
पण तरी त्यांची मुलं आपल्या यशाच्या कहाण्या सांगताना डोळ्यात पाणी आणून चार-चारदा सांगतात की, मला पप्पांनी खूप सपोर्ट केला. मी खेळावं हे स्वप्न वडिलांनीच माझ्या डोक्यात टाकलं! वडील आहेत म्हणून मी आहे, वडिलांनी पोटाला टाच देऊन मला खेळू दिलंय, ते कुठून पैशाचं जमवतात माहीत नाही; पण ते मला जे देतात तेच फार आहे.
- हे सारं काय आहे?
खेडय़ापाडय़ातल्या पालकांच्या आणि मुलांच्या खेळासंदर्भात बदलणार्‍या मानसिकतेचं चित्र आहे. ते सरसकट आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेलही, पण बदल होताना दिसतो आहे त्याची ही काही प्रातिनिधक उदाहरणं आहेत.
यातल्या अनेक पालकांकडे पैसे नाहीत, ना सुविधा आहेत. मात्र आता त्यांना कळू लागलं आहे की, खेळला आपला मुलगा किंवा मुलगी तर त्याचे दिवस पालटतील. आर्मी, रेल्वे, पोलिसात नोकरी मिळू शकते. पेपरमध्ये फोटो येतात, त्यानं प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे हे अर्धशिक्षित आई-बाप आपल्या पोरांना आणि पोरींनाही खेळाचं प्रशिक्षण घ्यायला लांब लांब पाठवताना दिसतात.
आशेची गोष्ट ही मुलींचे पालकही यात मागे नाहीत. अगदी पुणे, दिल्ली, चंदीगड, पटियालाच नाही, तर जवळच्या गावात जर क्रीडा प्रशिक्षणाची उत्तम सोय असेल तर तिथं आपल्या मुलीला एकटीला पाठवण्यातही हे पालक कचरत नाहीत.
ग्रामीण-निमशहरी पालकांचा हा पाठिंबा खेडय़ापाडय़ात क्रीडा संस्कृतीची नवी बीजं रोवतो आहे. काही वर्षात या बदलाची फळंही दिसतील, अशी आशा आणि उमेद या पालकांशी बोलताना जाणवत राहाते.

 

‘खेलो इंडिया’मध्ये  महाराष्ट्राची मान उंचावणार्‍या मुला-मुलींचे प्रशिक्षक काय म्हणतात..


  ‘ ही पोरंच फोकस्ड हाएत ओ. एकदम टार्गेट धरून चालत्यात, त्यामुळे आपण काय फक्त टेक्निक शिकवणार ना, टॅलंट तर ते आईच्या पोटातून घेऊन येतात!
- फोनवर पलीकडून कुणी गाव-खेडय़ातला प्रशिक्षक हे सांगत असतो, ते सांगणं अतिशयोक्ती वाटेलही, मात्र ते तसं नसतं. कारण खेलो इंडियात सहभागी झालेल्या जेमतेम 14-15 वर्षाच्या मुलांचे हे क्रीडा प्रशिक्षक आपल्याला सांगत असतात तेव्हा त्यांच्यासमोर उभं असलेलं ‘लोकल टॅलंट’ हे त्यांनी अनेकदा स्वतर्‍ शोधून, शाळांतून हुडकून आणलेलं असतं. प्रसंगी पदरचे पैसेच नाही तर मानसिक बळ, स्पॉन्सर्स शोधण्यासाठीचे प्रय} हे सारं हे स्थानिक पातळीवरचे प्रशिक्षक करत असतात.
कुरुंदवाडच्या हाक्यरुलस अकॅडमीचे प्रशिक्षक प्रदीप पाटील सांगतात, अशक्य ते शक्य करतात ही मुलं! त्यांना ‘अशक्य’ असं काही वाटतच नाही. ग्रामीण भागातले, गाव-खेडय़ातले अगदी 10-11 वर्षाचे खेळाडू आमच्याकडे येतात. आज जे यश दिसतं आहे, त्यामागे या मुलांची गेल्या 4-5 वर्षाची मेहनत आहे.’
  त्यांच्या अकॅडमीत तयार झालेल्या खेळाडूंनी वेट लिफ्टिंगमध्ये खेलो इंडियात 4 सुवर्ण आणि 3 रौप्यपदकांची कमाई केली. पाटील सर सांगतात, ‘आमचा भाग तसा काही शहरी नाही; पण आमचा प्रय} असा आहे की खेळाडूंना सुविधा उत्तम मिळाल्या पाहिजेत आणि त्यांनी सराव कसून केला पाहिजे. खेळ, खेळाचं तंत्र, मानसिक तयारी आणि डाएट हे सगळंच आवश्यक असतं. ग्रामीण भागातून जी मुलं येतात, त्यांच्या पालकांनाही आम्ही तेच सांगतो, मुलांना कामाला लावू नका. खेळू द्या, त्यांच्या पाठीशी उभं राहा. शेतकरी कुटुंबातली, कनिष्ठ मध्यमवर्गातली ही मुलं त्यांना आपल्याच नाही तर पालकांच्या कष्टांचीही जाण असते, ते प्रय}ात कसूर करत नाहीत. त्यांना फक्त संधी हवी असते. ही संधी आता  ‘खेलो इंडिया’मुळे मिळते आहे. त्यातून शिष्यवृत्ती मिळते आहे. आशा आहे की या मुलांचा खेळ आता सुटणार नाही. विशेष म्हणजे पालकांतही बदल होताना दिसतो आहे. ग्रामीण पालकही आपल्या मुलाला म्हणतात, तू खेळ, भलेही नोकरीची संधी असेल डोळ्यासमोर म्हणून सपोर्ट करतात; पण तो पाठिंबा आणि मुलाला खेळू देणं हे फार महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागात आता असा बदल होताना दिसतो आहे.’
सायकलिंग, कुस्ती, रनिंग, वेटलिफ्टिंग या सगळ्याच खेळांचे प्रशिक्षक थोडय़ाबहुत फरकाने हेच सांगतात. म्हणतात, गावांत टॅलेंट आहे, या मुलांना एक संधी मिळाली तरी ते आपली वाट स्वतर्‍ शोधून जिद्दीनं पुढं जातात.
नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडचे प्रवीण व्यवहारे. ते शाळेत क्रीडाशिक्षक आहेत. त्यांच्या चार शिष्यांनी नुकतीच  ‘खेलो इंडिया’मध्ये 4 पदकं पटकावली.   ‘खेलो इंडिया’त व्यवहारे सरांनी गेली दोन वर्षे शासनातर्फे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे. ते अनेक मुलांना मोफत वेटलिफ्टिंग शिकवतात. ते सांगतात, खेलो इंडियात उत्तम परफॉर्म करणार्‍या मुलांत 80 टक्के मुलं ही ग्रामीण, निमशहरी भागातलीच आहेत. आता तर मुलींची संख्याही वाढते आहे. माझ्याकडे 30 ते 40 मुली पाचवीपासून वेटलिफ्टिंगचे धडे गिरवत आहेत. आणि मुख्य म्हणजे पालकांच्या दृष्टिकोनातही बदल होऊ लागला आहे. मुलांना शिष्यवृत्ती मिळते, पेपरात नावं झळकतात, कौतुक होतं त्यामुळे पालकांनाही आता वाटतं की करू द्यावं पोराला मनासारखं. या मुलांकडे पैसा, सुविधा नसतीलही; पण जिद्द आहे. करून पाहू म्हणत ते कष्ट करतात म्हणून चित्र बदलतं आहे, त्यात खेलो इंडियामुळे शिष्यवृत्ती मिळते, आर्थिक हातभार लागतो त्यानंही खेळ न सुटण्याची शक्यता वाढते आहे!’
नाशिकला रनिंग हब बनवणारे आणि अनेक रनर्सचे प्रशिक्षक असलेले विजेंद्रसिंगही हेच सांगतात. ते म्हणतात, ‘खेलो इंडिया’ हे ग्रामीण टॅलेंट हुडकण्यासाठी महत्त्वाचं माध्यम आहे. अनेक मुलं पैसे नाहीत, आर्थिक चणचण, सुविधा नाहीत त्यामुळे खेळ सोडून देतात. आता ‘खेलो इंडिया’ने अनेक उपक्रम गावपातळीवर आणून ठेवले आहेत. स्टेडिअम, ट्रॅक, सुविधा, हे सारं मुलांसाठी उपलब्ध होऊ लागलं आहे. कामगिरी उत्तम करणार्‍या मुलांना शिष्यवृत्ती आहेत. त्यातून मुलांची आर्थिक चणचण कमी होते. खेळासाठी पैसा खर्च करता येतो. खेळ, खेळाडू, सुविधा, क्रीडांगण, स्थानिक प्रशिक्षक तयार करणं या सर्व पातळीवर काम सुरू आहे. योग्य वयात ‘टॅलेंट’ ओळखून ते ग्रुम करणं, थेट ऑलिम्पिकर्पयतची तयारी करणं हे या माध्यमातून शक्य आहे. ग्रामीण भागातल्या टॅलेंटला त्यातून वाव मिळेल, संधी मिळेल ही आशा आहे.’
त्याच आशेवर उभे ग्रामीण भागातले प्रशिक्षक आणि त्यांचे शिष्य खेळाडू संधीची एक फट शोधत पुढे जाण्याचे प्रय} करताना दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पर्धाची स्वप्न त्यांच्या नजरेत आहेतच; पण आत्ता या क्षणीची स्पर्धा हे त्यांचं खरं ध्येय आहे.

Web Title: Khelo India 2020- Maharshtra number 1- meet the small town heros & medal winners, who are born to win!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.