आता गरबा थेट घरात ...तो कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:18 PM2020-10-15T14:18:41+5:302020-10-15T14:40:04+5:30

कोरोनाकाळात शारीरिक दूरीच्या नियमात गरबा, दांडिया तर काही दरवर्षीप्रमाणे  रंगणार नाहीत; पण म्हणून उत्साही तारुण्य थोडंच गप्प बसणार? ऑनलाइन गरबा क्लासेस लावून येत्या नऊ दिवसात ऑनलाइनच ग्रुप गरबा खेळायची तयारीही झाली. त्या नव्या गरब्याची गोष्ट.

Garaba At home. New trend in Garaba.. How it will work | आता गरबा थेट घरात ...तो कसा?

आता गरबा थेट घरात ...तो कसा?

googlenewsNext

- स्नेहा मोरे

कुणी घरात एकटंच गिरक्या घेतंय, ताल धरतंय, मस्त आपल्याच धुंदीत गरबा करतंय, असं दिसलं तर दचकू नका.
भाई, जमाना ऑनलाइन का है! कोरोनाकाळात जर शिक्षणापासून कामार्पयत अनेक गोष्टी ऑनलाइन गेल्या तर मग सण-उत्सवांनीच का म्हणून मागे राहावं. त्यात नवरात्र म्हटलं की गरबा-दांडिया आलंच.
एरव्ही तर कार्पोरेट टीम बिल्डिंगचे एफर्ट म्हणूनही गरबा क्लासेसला अनेकजण जायचे. स्ट्रेस बस्टर वगैरे लेबल लावून बाकायदा गरबा शिकायला तरुण कर्मचारी जायचे. काही तर हौशीने ठरवून गरबा शिकायचे.
पण यंदा काय? यंदा तर सारं ठप्प.
पण म्हटलं ना जमाना ऑनलाइनचा आहे.  विपरीत परिस्थितीवर मात करत  दांडिया, गरब्याचेही ऑनलाइन क्लासेस दणक्यात सुरूआहेत. ज्यांना गरबा शिकायचा ते शिकणार, ऑनलाइन एकत्र येऊन नवरात्रत गरबा करणारही. 
या नव्या ट्रेण्डचंच तर नाव आहे, गरबा  होम.
यंदा गुगल मीटपासून ते अगदी झूम कॉलवरही गरबा क्लासेस भरूलागलेत.
अगदी लहान मुलांपासून ते तरुण-तरुणी ते काही उत्साही आजी-आजोबाही घरबसल्या गरबा शिकत आहेत.
खास पारंपरिक दांडिया आणि गरबा शिकवणा-या क्लासेसला बंदची पाटी लावायची वेळ निदान मोठय़ा शहरांत तरी आलेली नाही.
नवरात्रोत्सवापूर्वी 15 दिवस हे गराबा क्लास सुरूहोतात. त्यांच्या बॅच असतात. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा बेसिक कोर्स, त्यानंतर पाच दिवसांचा अँडव्हान्स कोर्स, वीकेंड बॅच यासारखे प्रकारही असतात. खासकरून आयटीतील तरु ण-तरु णींची वीकेंड बॅचला गर्दी होते, असे  ‘अभिव्यक्ती गरबा ग्रुप’च्या रेखा भानुशाली यांनी सांगितले.  


यंदा गरबा क्लास ऑनलाइन घेणा-या  रेखा भानुशाली सांगतात,  काही वर्षापूर्वी मैत्रिणींना गरबा शिकविण्याच्या हेतूने मी क्लास सुरूकेले होते; पण नंतर गरब्याची आवड असणा-यां ची संख्या इतकी वाढली, की नवरात्र जवळ आली की पुणोकर चौकशीसाठी आपोआप येतात. यंदा मात्र काही बॅचेस मी ऑनलाइनच घेते आहे.’
 दरवर्षी मोठय़ा मैदानात दांडिया शिकवणा-या अदिती फदाले सांगतात, ‘माझ्या क्लासमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त जण सहभागी व्हायचे, त्यात ग्रुपपासून ते अगदी सोलोर्पयत गरबा, दांडिया शिकविण्याची मजा वेगळीच होती, यंदा मात्र अगदी कॅमे-याच्या चौकटीत हे सगळं बसवायला लागतंय; पण गरबा, दांडियाची नशा काही कमी झालेली नाहीये. यंदा क्लासच्या वतीनेच नवरात्नात वेगवेगळ्या थीम्सवर गरबा आयोजित केला आहे. प्रत्येकाने आपापल्या घरीच तयार होऊन यात धम्माल नृत्याची मजा लुटायचीय. सध्या गरब्याचा सराव केल्याने दांडिया  कार्यक्रमात इतरांबरोबर परफॉर्मन्स करण्याचा आत्मविश्वासही अनेकजण पहिल्यांदाच अनुभवत असतात.’


गणोशोत्सवाप्रमाणेच गरब्याची क्रेझ परदेशी नागरिकांमध्येही दिसून येते. मुंबईत एक वर्षासाठी कामानिमित्ताने आलेल्या फ्रिडोलीन या जर्मन 
तरुणालाही गरबा शिकावासा वाटला. तो सध्या ‘अभिव्यक्ती’ ग्रुपमध्ये गरबा शिकत आहे. मुंबईच्या बोरिवली कोराकेंद्र येथे होणा-या गरबा नाइटमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती; परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे हे शक्य नसल्याने काहीतरी हटके करायचा प्लान आहे असं तो सांगतो.
गरबा, दांडिया, रोषणाई, डीजे हे सारं नेहमीचं यंदा नसेल; पण तरीही अनेकांनी घरीच मस्त नटूनथटून ग्रुपने ऑनलाइन गरबा नृत्यात सहभाग घेतला आहेच.
या मंद काळातही अनेकांच्या आयुष्यात गरबा असा उत्साही ऑनलाइन ताल धरणार आहेच. ए हालो. अशी हाक देत उत्साहाची गिरकी घरातही घ्यावीशी वाटणं, या उमेदीची तर या काळातही गरज आहे.


( स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहे.)

moresneha305@gmail.com   

 

Web Title: Garaba At home. New trend in Garaba.. How it will work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.