Construction - Answer Finder Travel | निर्माण - उत्तरं शोधणारा प्रवास
निर्माण - उत्तरं शोधणारा प्रवास
 निर्माण आणि आॅक्सिजन
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच- गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुला-मुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात,
त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..
त्यातला हा दुसरा प्रश्न : समाजासाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय?
 
समाजासाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय?
 
कामात कसला भेदभाव करता?
 
माझ्या मते, सामाजिक काम नावाची वस्तू वगैरे काही नसते. असतं ते फक्त काम. आवडतं किंवा नावडतं. तसंही प्रत्येक कामातून आपण समाजातील कुठल्या तरी व्यक्तीला वस्तू किंवा सेवा पुरवीत असतोच. मग तो सकाळी वर्तमानपत्र वाटणारा मुलगा असो किंवा कार्पोरेट कंपनीतला एखादा आयटी इंजिनिअर असो. 
मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करतो म्हणून मी सामाजिक कार्यकर्ता आणि जो शेतकरी अख्खं आयुष्य इतके काबाड कष्ट करून तुम्हा-आम्हाला अन्न पुरवतो, त्याला काय म्हणावं? तो करतो ते सामाजिक काम नाही का?
जात-पात, धर्म-पंथ, वर्णभेद ही असमानता काय कमी होती की आता आपण कामात पण असाच भेदभाव करायला लागलो आहोत.
‘द सेल्फिश जिन’ या पुस्तकात रिचर्ड डॉकिन्स लिहितो की, ‘या पृथ्वीवरील एक एक जीव हा भयंकर स्वार्थी आहे आणि स्वार्थीपणामुळेच आपलं अस्तित्व आहे.’ आपले पूर्वज स्वार्थी नसते तर आपण आज सामाजिक कामाबद्दल बोलायला जिवंत नसतो. प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक कामात स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थापोटी तो/ती ते काम करत असतो. 
आता हा स्वार्थ नेहमी व्यक्तीनुसार बदलत असतो. हुशार स्वार्थी लोक निसर्ग, आरोग्य, शेती वगैरे महत्त्वाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करतात. काहीजणांचा स्वार्थ खूप पैसे कमावणं आणि नको त्या अनावश्यक वस्तूंचा संचय करणं यात त्यांचा स्वार्थ असतो.
माझ्याबद्दल बोलायचे झालं तर मला शुद्ध अन्न, पाणी, हवा हे सारं आज आणि भविष्यातपण हवं आहे. ज्यावर कुणाची मक्तेदारी नसेल म्हणून मी ‘अन्न साक्षरते’मधून लोकशिक्षणाचा प्रयत्न करत असतो.
लोकांच्या स्वार्थीपणाच्या परीभाषा बदलल्याने त्या पुन्हा लोकांना पटवून देण्याकरिता याप्रकारच्या कामाची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे. घरी बसून किंवा संगणकावरून समाज घडवणारे भरपूर मिळतील. पण कुणी तरी कामाला आणि समाजाला वेगळ्या चष्म्याने बघितले पाहिजे. समाजात जाऊन काम करायला पाहिजे. आपण आपल्या प्रामाणिक कामातून समाजात काही भर टाकतोय काय? याचा विचार केला पाहिजे.
कुणीतरी अशा आगळ्यावेगळ्या वाटा निवडल्यानं समाजाचा गाडा डगमगत का होईना पण चालतोय.- आकाश नवघरे, निर्माण ५
 
मी करतोय त्या कामाची गरज आहे का? जे काम गांधीजींच्या तलीस्मानच्या कसोटीवर उतरतं ते म्हणजे सामाजिक काम. आपण करत असलेल्या कृतीचा समाजातील शेवटच्या थरातील शेवटच्या माणसाच्या जगण्यावर काय फरक पडणार आहे याचा विचार करावा आणि उत्तर जर सकारात्मक येत असेल तर ती कृती योग्य आहे असे समजावं. पण ही व्याख्या खूप बृहत आहे. त्यामुळे आपण करत असलेलं काम सामाजिक आहे किंवा नाही हे ठरवताना आणखी काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधणे गरजेचं आहे. समाज या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे. माझा समाज म्हणजे कोणता समाज? माझा जन्म ज्या जातीत, धर्मात, पंथात झाला तो म्हणजे माझा समाज की मी ज्या गावात, शहरात राहतो तो माझा समाज? मी ज्या राज्याचा, देशाचा नागरिक आहे तो माझा का समाज? म्हणजे माझं कार्यक्षेत्र कुठलं असणार आहे याची उकल होणं सर्वप्रथम महत्त्वाचं आहे. इथे गांधीजींचं तलीस्मान उपयोगी पडतं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, या आपण ठरवून घेतलेल्या कार्यक्षेत्रात अनेक प्रश्न असतील जसे की महिलांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, कृषी, व्यसनाधीनता, बेरोजगारी, इत्यादि. ही यादी कधी न संपणारी आहे. मग मी नेमका कोणत्या प्रश्नांवर काम करू. इथे प्रश्न येतो गरजेचा. गरज कोणाची? जो काम करतोय त्याची की ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांची? बऱ्याच वेळा आपण आपल्याला ज्याची गरज आहे असं वाटतं त्या कामाला हात घालतो. परंतु ज्यांच्यासाठी आपण हे काम करतो त्यांना त्याची गरज आहे की नाही हे पडताळून पाहायला विसरतो आणि मग हवा तो उद्देश साध्य झाला नाही म्हणून हताश होतो.- शेखर देशमुख, निर्माण ५
 
 
पाण्याचा ग्लास मी कुणाला देणार? समाज या संकल्पनेची व्याप्ती बरीच मोठी आहे. समाजाचा, सिस्टीमचा रहाटगाडा सुरळीतपणे चालवा यासाठी असंख्य मानवीय - नैसर्गिक घटक प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे काम करत असतात. समाजातील प्रत्येक घटक वेगवेगळी कामं करताना, सामाजिक जवाबदारी पार पडताना आपल्याला दिसतो. मी कामावरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दिसलेलं फुलपाखरू असू देत की चौकात उभा असणारा ट्राफिक हवालदार, प्रत्येकाच स्वत:चं एक वैशिष्टपूर्ण स्थान आहे. शिक्षक मुलांना शिकवत असतात, डॉक्टर रोग्यांना सेवा देत असतो, बस ड्रायव्हर लोकांची ने-आण करत असतो, सफाई कामगार सफाई करतो इ. हे सर्व घटक महत्वाचे आहेत, ते सर्व सामाजिक कामच करत आहेत.
 
आक्र मक धर्मसत्ता, औद्योगीकरण, भांडवलशाही, सो कॉल्ड सिव्हिलायझेशन यांचा जागतिक रेटा व त्याचा मुठभर लोकांना झालेला फायदा यामुळे आहेरे आणि नाहीरे वर्ग समाजात उदयास आला आहे. शासन, राज्यकर्ते, नेते व सक्षम नागरिक यांचे उपेक्षित वर्गाकडे दुर्लक्ष होते. त्यांच्या भौतिक व भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत व समाजामध्ये प्रचंड असमतोल निर्माण होतो. म्हणजेच समाजाचा रहाटगाडा अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मुख्य दोन प्रकारच्या कामाची गरज आहे.
 
१) रु टीन कामं करणं. २) असमतोल दूर करणारी कामं करणं. मला वाटत जगातील विविध प्रकारचे असमतोल, विषमता, अन्याय दूर करणारे लोक एक अधिक चांगला माणूस म्हणून प्रतीकं निर्माण करत असतात जी सिव्हिलायझेशन ला सकारात्मक दिशेनं पुढे जाण्यास मदत करतात. वैज्ञानिक पद्धतीने, सर्जनशीलपणे, सहवेदनेला साक्ष ठेऊन समाजातील प्रश्न सोडवणाऱ्या बुद्धिमान तरु णांना मी सामाजिक कार्यकर्ता म्हणेन. सामाजिक काम कशाला म्हणायचं याचा विचार करताना मी करत असलेल्या कामाची ‘युटीलीटी’ अर्थात उपयोगिता काय हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो. थंडगार ज्यूस पिऊन बसलेल्या माणसासाठी पाण्याच्या एका ग्लासची उपयोगिता व उन्हातान्हात अनवाणी भटकणाऱ्या व्यक्तीसाठी पाण्याच्या त्याच ग्लासची उपयोगिता खूप वेगळी असेल. मला वाटत सामाजिक काम देखील असंच आहे, पाण्याचा ग्लास तोच पण मी तो कुणाला देण्याचं काम करत आहे यावरु न ते काम किती सामाजिक आहे हे ठरतं. प्रफुल्ल शशिकांत, निर्माण ५
 
काम कुणासाठी?- माझ्यासाठीच! 
सामाजिक काम खरंतर नदीप्रमाणे आहे. म्हणजे त्याची गरज तर आहे परंतु त्याची व्याप्ती ठरवणं अवघड आहे. सामाजिक काम म्हणजे सर्व सुखवस्तूंचा त्याग करून समाजसेवा करणं वगैरे असं मुळीच नाही. खरंतर माझं शिक्षण, कौशल्य, माझी मूल्यं व आवड या सर्वांची सांगड घालून कोणाचं हित होईल असं काम म्हणजे सामाजिक काम. त्यासाठी कोणताही मोठा त्याग करावा लागत नाही. याउलट असं काम करत असताना माझीच सर्वांगीण वाढ होणं अपेक्षित असतं. असं काम केल्यानं माझ्याच जगण्याला अर्थ प्राप्त होईल. कल्याणी पानसरे, निर्माण ६ 
 
जगणं काय मग.. 
जन्म आणि मृत्य यामधील कालखंडास मी जगणं संबोधतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हा जगण्याचा कालावधी येतो मात्र ते जगणं तेव्हाच पूर्ण होऊ शकतं जेव्हा या प्रवासात कुठेतरी सामाजिक कामात आपलं योगदान असेल. सामाजिक काम एखाद्या सरळ सोप्या व्याख्येत बांधता येणार नाही. मात्र समाजातील वंचित, दुर्लक्षित समाजघटकांसाठी आपण केलेली एखादी कृती त्यांच्या मूलभूत गरजा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरत असतील तर ते एक सामाजिक काम म्हणता येईल. अविनाश पाटील, निर्माण ६
 
प्रश्नोत्तरांचं हे प्रकरण फार कठीण नाहीये. ‘निर्माण’ आणि ‘आॅक्सिजन’ यांच्यातला
पूल असेल आकाश भोर.आकाश स्वत: निर्माणच्या पाचव्या बॅचमध्ये होता आणि सध्या तो गडचिरोलीलाच सर्चमध्ये काम करतो आहे. तुमचे प्रश्न आकाशला थेट कळवा.
त्यासाठी ई-मेल :nirman.oxygen@gmail.com
यातल्या निवडक प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवाद
आॅक्सिजनच्या अंकात वाचायला मिळेल.

Web Title: Construction - Answer Finder Travel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.