बिल्डिंग बॅक बेटर:- यासाठी आपण संवेदनशील झालो आहोत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 08:00 AM2020-12-03T08:00:00+5:302020-12-03T08:00:07+5:30

घरात कोंडलेपणातलं जगणं वाट्याला आल्यावर तरी जगाला कळलं असेल का, आपण ‘संवेदनशील’ व्हावं? आज जागतिक अपंग दिन, त्यानिमित्त हा प्रश्न.

Building back better: - Have we become sensitive to this? | बिल्डिंग बॅक बेटर:- यासाठी आपण संवेदनशील झालो आहोत का?

बिल्डिंग बॅक बेटर:- यासाठी आपण संवेदनशील झालो आहोत का?

googlenewsNext

- सोनाली नवांगुळ

‘थँक्स फॉर द वॉर्म अप्’!

२०१२चा ‘लंडन ऑलिम्पिक्स’चा इव्हेंट संपल्या संपल्या लंडनच्या मोक्याच्या जागांवर ताबडतोब बोर्ड झळकले होते. पॅरालिम्पिक सुरू होत असल्याची ती आत्मविश्‍वासपूर्ण घोषणा होती. १६४ देशांमधून तिथं पोहोचलेले चार हजारांहून जास्त खेळाडू हाच ‘जस्बा’ घेऊन तिथं उतरले होते, की अपंगत्वाबद्दलची घिसीपिटी झापडं उतरवा नि जर प्रतिष्ठापूर्वक योग्य संधी नि सहभाग मिळवता आला तर आम्ही काय करू शकतो याचा अस्सल पुरावा पाहा !

जगभरातील एकूण लोकसंख्येच्या पंधरा टक्के माणसं कुठल्या ना कुठल्या प्रकाराचं अपंगत्व घेऊन जन्माला येतात किंवा अपघातानं विकलांग होतात. इतक्या मोठ्या संख्येनं व्यंगासह स्वाभिमानानं जगू पाहणाऱ्या माणसांचं जगणं, त्यांच्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, समाजात वावरण्याच्या अडथळामुक्त जागा, आर्थिक, सांस्कृतिक वृद्धीचा हक्क याबद्दलची जाणीव व जाग उरलेल्या ‘नॉर्मल’ समाजाला मिळत राहावी म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघानं ३ डिसेंबर हा दिवस जगभरात अपंग दिन म्हणून घोषित केला. यावर्षीची त्यांनी जाहीर केलेली थीम आहे, ‘बिल्डिंग बॅक बेटर’.

खरं तर कोविडच्या उद्रेकानं जगभरातल्या संवेदनशीलतेला हादरे देऊन हेच तर सांगितलंय !

- नाहीतर, हे जग शरीरानं नॉर्मल माणसांसाठी आहे. आपण ते आपल्या अनुकूल करण्याचा झगडा करत तगून राहातो असंच बहुतांशी अपंग माणसांसाठीचं सत्य. मात्र कोविडनं सगळ्यांच्या पायाखालची जमीन एकसारखी करून टाकली. इथं सगळेच ‘संवेदनशील’ घटक होते, फक्त अपंग माणसं नव्हे ! महिनोंमहिने घरात बंदिस्त राहिल्यावर माणसं अस्वस्थ झाली. शारीरिक अवस्थेमुळं अशी स्थिती वाट्याला आलेले त्या मानानं कमी त्रासात होते कारण अनेकांना समाजव्यवस्थांनी पर्याय न दिल्यामुळं ‘लाइफटाइम क्वाॅरण्टाइन’ हा भाग मान्य करावा लागला होता. कोरोना झाल्यावर माणसांना संपूर्ण एकटं राहून शरीराचे जे भोग भोगावे लागले त्यातून आपण एकमेकांबरोबर समजुतीनं, परस्पर मदतीनं जगणं किती गरजेचं आहे याचा साक्षात्कार झाला. अपंगत्वाच्या तऱ्हतऱ्हेच्या अडचणी सवयीच्या करून घेत अंध, मूकबधिर, बौद्धिक अक्षमता असणारी माणसं, अस्थिव्यंगतेमुळं व्हीलचेअर, कुबड्या, वॉकर वापरणारी किंवा जमिनीवर घसटत चालणारी माणसं कशी जगतात याविषयी शहाणी समज आली. हे चांगलंच आहे. ही समजूत अशा माणसांच्या जगण्याचा मान ठेवून रोजच्या आयुष्यात कशी उपयोगी ठरेल नि गती आणेल याचा मात्र नीट विचार करायला हवा, कृतीकडं सरकायला हवं !

‘ऑनलाइन’ राहाण्यातून शिक्षण नि नोकरी करता येणं शक्य आहे हे कोविडस्थितीतून सगळ्यांच्या लक्षात आलं. अशा प्रकारच्या शिक्षणाचा ‘आगाज’ हालचालींच्या प्रचंड मर्यादा असणाऱ्यांबाबत पूर्वी झाला असता तर ती कदाचित सवलत ठरली असती नि त्याला दुय्यम-तिय्यम गुणवत्तेचं मानलं गेलं असतं. आता सगळ्यांच्याच बाबतीत हे मान्य झाल्यामुळं असंख्य अपंग माणसांना असंख्य अडथळे पार करत शिक्षण/नोकरी घेण्यासाठी जाण्याचा त्रास वाचलाय. मात्र यातून एक निराळी अडचण डोकं वर काढेल की काय असं वाटतं, त्यावर मार्ग काढायला हवा. आपले अपंग दोस्त नकळत निराळ्या गंडात अडकू नयेत नि शारीर स्थिती नि त्याबद्दल मार्ग काढण्याबद्दल जो मोकळेपणा त्यांनी कमावला आहे त्याचं नुकसान होऊ नये हे बघितलं पाहिजे.

समाजात सगळ्या ठिकाणी वावरण्याची अडथळामुक्त व्यवस्था असणं- ती करायला लावणं हा अत्यावश्यक असला तरी एकमेव मार्ग नव्हे. विशिष्ट काळजी घेऊन समाजात वावरण्याचा आत्मविश्‍वास पुन्हा कमावण्यासाठी अपंग माणसांना त्यांच्या मित्रमैत्रिणींचा सहजपणानं दिलेला हात आता पूर्वी कधी नव्हे इतका लागणार आहे. त्यासाठी खोलात उतरून आपल्या या मित्रमैत्रिणींचं जगणं समजून घ्यावं लागणार आहे.

अंध माणसांचं हाताच्या स्पर्शाशिवाय भागणार नाही, विविध कृत्रिम साधनं वापरणाऱ्या माणसांबाबतीत हेच, की सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करताना त्यांना त्यांचं कृत्रिम साधन नि हात यांच्यासह एक्सपोज व्हावंच लागतं. अनेकांना जमिनीवर घसटत चालावं लागतं, ओष्ठवाचन करून समोरच्याचं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न करावा तर सगळ्यांचे चेहरे मास्कमध्ये बंद.

- अशा नव्या अडथळ्यांवर मार्ग काढत आजवर ताकदीनं केलेला प्रवास जास्तच बळ लावून करावा लागणार आहे. शरीरानं नॉर्मल असणाऱ्या मित्रमैत्रिणींची एम्पथी मिळाली तर हा खडतर प्रवास मौजेचा होऊन जाईल. घरगुती सामान नि औषधं आणून देणं यापुरती ही मदत उपयोगाची नाही, त्या पलीकडं जाण्यासाठी ‘कोविड’नं देऊ केलेली संवेदनशीलता तासून घ्यावी लागणार आहे. कायदे नि हक्क या पलीकडे माणूस म्हणून असणाऱ्या ‘आस्थे’ला हाक घालत आपल्या वेगळ्या अवस्थेतल्या मित्रमैत्रिणींसह उभं राहा, त्यासाठी उक्ते पर्याय कशाला हवेत, प्रत्येकानं ‘घरचा अभ्यास’ करावा यासाठी शुभेच्छा !

...

( सोनाली लेखिका/अनुवादक आहे.)

sonali.navangul@gmail.com

Web Title: Building back better: - Have we become sensitive to this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.