are you independent? and your vote? check this.. | तुमचं मत स्वतंत्र झालंय का?
तुमचं मत स्वतंत्र झालंय का?

ठळक मुद्देमत देताना तुम्ही काम पाहता की जात पाहता? उमेदवारानं दिलेल्या माहितीचा अभ्यास करुन मत देता की देता ठोकून जातीचा माणूस म्हणून?

 - मिलिंद थत्ते

राजकीय सत्ता मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला पहिला व सगळ्यात रुढ मार्ग आहे - मतदारांना येडय़ात काढायचा! मतदाराच्या पोटात अन्नाचा दाणा नसला तरी चालेल, पण त्याच्या भावनांना भुलवायचे. त्याच्या डोईवर पागोटी बांधायची नि लंगोटी काढून घ्यायची. अन् तेही येडं पागोटी कुरवाळत बसतंय! 
पायाखालची जमीन जाते, रोजीरोटीला उपयोगाचं शिक्षण नसतं, शेतीला पाणी नसतं, पिकाला बाजारभाव नसतो, पण आपल्या जातीतल्या माणसाला निवडून द्यायला आपण त्याचे सगळे गुन्हे विसरतो! हेच ते - लंगोटी गेली तरी पागोटी कुरवाळणं.  आपण ज्याला निवडून देतो किंवा आपला पुढारी मानतो, तो आपल्या जीविकेसाठी किंवा पोटापाण्याच्या प्रश्नासाठी काय करतो याकडे लक्ष न देता त्याच्या जातीकडे पहायला आपल्याला शिकवले जाते. 
एका दुष्काळी तालुक्यातले एक आमदार होते. त्यांनी मोठय़ा प्रमाणात पाणी वाचविण्याची कामे करून घेतली. त्यांच्या तालुक्याच्या नावाने जलसंधारणाचा पॅटर्न प्रसिद्ध झाला. दुष्काळ मिटला, पण पुढच्या निवडणुकीत जातीचे वाद झाले आणि ते निवडणुकीत हरले. मतदारांनी माणूस न पाहता जातीला मत दिले. असेच धर्माच्याही बाबतीत आहे.
सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार - यांची कामं काय असतात? त्यांचे काम त्यांनी केलं का? हे आपण बघतच नाही. त्यांनी काम केलं म्हणून त्यांना पुन्हा निवडून द्या किंवा त्यांनी काम केलं नाही म्हणून त्यांना पाडा - असं मतदार म्हणून आपण म्हणतच नाही. त्या त्या वेळी जी भूल पडेल त्यात बटण दाबायचे! 
कुठला झेंडा, कुठला टिळा लावला की आपण मतदार फसतो हे  राजकारण्यांना चांगलं माहीत असतं. मग लग्ना-मयतात जायचं, सर्व प्रकारच्या देवळात निवद दावायचा, विविध जातीतल्या संतांच्या जयंत्या-मयंत्या करायच्या - अशी सोंगं करून मतदार भुलवायचा. वर्षानुवर्ष पिढय़ान्पिढय़ा हे असंच चाललं आहे. आपण नवीन पिढीचे मतदारही असेच बावळट आहोत का? की आपल्याला यांच्या कामाचा हिशेब करता येतो? 
असोसिएशन फॉर डेमोक्र ॅटिक रिफॉर्म्स नावाची एक संस्था आहे. ते दर निवडणुकीच्या वेळी सर्व उमेदवारांची आर्थिक प्रगती, गुन्हेगारी प्रगती प्रसिद्ध करतात. त्यांच्या वेबसाइटवर ही सर्व माहिती वाचता येते. हीच सर्व माहिती आपल्याला थेट निवडणूक आयोगाकडूनसुद्धा मिळू शकते. सर्व उमेदवारांना एक प्रतिज्ञापत्न आयोगाकडे सादर करायचं असतं. त्यात त्यांची व कुटुंबाची संपत्ती जाहीर केलेली असते. मागील पाच वर्षात त्यात किती फरक पडला तेही आपल्याला कळू शकतं. त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, सिद्ध झालेत तेही कळतं. ही सारी माहिती खुली असते. 
सरकार सुधारायचे तर चांगली कामं करणारी माणसं आपण निवडून दिली पाहिजेत. जातीचं भूत कितीही वाढवलं ंतरी लोक फसत नाहीत - ही अक्कल आपण मतदारांनी पुढार्‍यांना शिकविली पाहिजे.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधली एक चांगली गोष्ट अशी की कोणत्याही जातीय किंवा धार्मिक वादाचा मुद्दा या निवडणुकांमधला मुख्य मुद्दा नव्हता. काही लोकांनी असे जातीय मुद्दे आणायचा प्रयत्न करून पाहिला, तरीही ते मुद्दे कोपर्‍यात पडले. जातीय ध्रुवीकरणाशिवायही जिंकता येतं हे या निवडणुकांनी दाखवून दिलं. आपल्यासारख्या नव्या दमाच्या मतदारांसाठी ही फार चांगली संधी आहे. इथून मागं फिरायचं नाही, फिरू द्यायचं नाही. नया इंडिया अपनेको जैसा चाहिए, वैसाच बनानेका!


Web Title: are you independent? and your vote? check this..
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.