जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा : शांत सर्गस्यान, प्रज्ञानंदची विजयी घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 11:27 PM2019-10-03T23:27:13+5:302019-10-03T23:28:11+5:30

जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत अर्मेनियाचा ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान, भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानंद यांनी विजयीदौड कायम राखली.

World Youth Chess Tournament: Pragyananda's winning streak | जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा : शांत सर्गस्यान, प्रज्ञानंदची विजयी घोडदौड

जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा : शांत सर्गस्यान, प्रज्ञानंदची विजयी घोडदौड

Next

मुंबई : ऑल मराठी बुद्धिबळ संघटनेतर्फे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व फिडे यांच्या संयुक्त विद्यमाने पवई येथील हॉटेल रेनिसांस कन्वेंशन सेंटरमध्ये सुरु असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत अर्मेनियाचा ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान, भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानंद यांनी विजयीदौड कायम राखली. या स्पर्धेत ३ ग्रँडमास्टर, १ महिला ग्रँडमास्टर, २२ आंतरराष्ट्रीय मास्टर, ११ महिला आंतरराष्ट्रीय मास्टरसह ६४  देशांतील युवा ४६५ बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत.

     खुल्या १८ वर्षाखालील गटामधील स्विस पध्दतीच्या दुसऱ्या साखळी सामन्यात पहिल्या पटावर चीनच्या २२ व्या मानांकित शिझु वॅंग विरुद्ध खेळताना अग्रमानांकित अर्मेनियाच्या शांत सर्गस्यानने निमझो इंडियन बचाव पद्धतीचा अवलंब केला. पटावर समसमान स्थिती असताना ३४ व्या चालीला शिझुने प्यादे ई-४  घरात नेण्याची चूक केली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत सर्गस्यानने ४४ चालींत विजय मिळवून एकूण दोन गुणांची नोंद केली. दुसऱ्या पटावर द्वितीय मानांकित प्रज्ञानंद विरुध्द पोलंडच्या अँटनी कोझाक यांच्यातील डावाची सुरुवात किंग्ज इंडियन अटॅक पद्धतीने झाली. अँटनीने केलेल्या चुकांचा लाभ उठवत प्रज्ञानंदने त्याचे एक अतिरिक्त प्यादे मारले आणि पुढे ४० चालींत विजय संपादन करीत आपल्या खात्यात दुसरा गुण जमा केला.

    खुल्या १६ वर्षाखालील गटामधील दुसऱ्या साखळी सामन्यात पहिल्या पटावर अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय मास्टर अग्रमानांकित निएमन्न हंस मोकेने भारताच्या राहुल व्ही.एस.ला हरवून दुसरा गुण मिळविला. दुसऱ्या पटावर तृतीय मानांकित अविला पवस सन्तिअगोला डब्लू. ऑलिव्हरने बरोबरीत राखल्यामुळे दोघांचे १.५ गुण झाले आहेत. खुल्या १४ वर्षाखालील गटामधील दुसऱ्या साखळी सामन्यात पहिल्या पटावर अग्रमानांकित भारताच्या श्रीश्वान एम.ने जून रुडोल्फचा तर दुसऱ्या पटावर द्वितीय मानांकित रशियाच्या मुर्झीन वोलोदरने ए. डेनिसचा पराभव करून दुसरा गुण वसूल केला.

Web Title: World Youth Chess Tournament: Pragyananda's winning streak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.