विनेशची खेलरत्नसाठी पुन्हा शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 04:42 AM2020-06-01T04:42:49+5:302020-06-01T04:42:58+5:30

भारतीय कुस्ती महासंघ : साक्षी मलिकचा अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज

Vinesh's re-recommendation for Khel Ratna | विनेशची खेलरत्नसाठी पुन्हा शिफारस

विनेशची खेलरत्नसाठी पुन्हा शिफारस

Next

नवी दिल्ली : विश्व चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेती विनेश फोगाटची सलग दुसऱ्या वर्षी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार आहे तर रिओ आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केलेला आहे. साक्षी यापूर्वीच खेलरत्न पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
कोरोना व्हायरसमुळे स्थगित टोकियो आॅलम्पिकसाठी पात्रता मिळविणारी पहिली भारतीय महिला मल्ल विनेशचा गेल्या वर्षी हा पुरस्कार हुकला होता आणि सहकारी मल्ल बजरंग पुनिया या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. ती गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे आणि यादरम्यान तिने जकार्तामध्ये आशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने २०१९ मध्ये नूर सुल्तानमध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.
या वर्षाच्या सुरुवातीला तिने नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. डब्ल्यूएफआयच्या सूत्राने सांगितले की, अलीकडच्या कालावधीत फॉर्मात नसलेल्या साक्षीने अर्जुन पुरस्कारासाठी आपला अर्ज पाठविला आहे.
तिला २०१६ मध्ये जिम्नास्ट दीपा करमाकर व नेमबाज जितू रायसह खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. अलीकडेच ती युवा मल्ल सोनम मलिकविरुद्ध दोनदा पराभूत झाली. त्यामुळे आशियाई आॅलिम्पिक क्वालिफायरपासून तिला रोखण्यात आले होते. डब्ल्यूएफआय तिच्या नावाची शिफारस करते किंवा नाही याबाबत उत्सुकता आहे. कारण २०१९ विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता दीपक पुनिया (८६ किलो) आणि प्रतिभावान राहुल आवारे ( ६१ किलो, बिगर आॅलिम्पिक गट) यांनीही अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केले आहेत.
सूत्राने सांगितले की, रिओ आॅलिम्पिकपूर्वी तिने काही विशेष केले नव्हते, त्यामुळे तिचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठविण्यात आले नव्हते, पण रिओमध्ये कांस्यपदक पटकावल्यामुळे तिला थेट खेलरत्न मिळाला. आता ती अर्जुन पुरस्कारासाठीही उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)

भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) सहायक सचिव विनोद तोमर म्हणाले,‘आम्ही सोमवारी विनेशचे नाव खेलरत्नसाठी पाठवू. ती प्रबळ दावेदार असेल, पण आम्ही अद्याप अर्जुन पुरस्काराच्या शिफारसीसाठी नावांचा विचार केलेला नाही. कारण आम्हाला जास्त अर्ज मिळालेले नाहीत. त्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्याबाबतचा निर्णय डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष घेतील. ते म्हणाले,‘आमच्याकडे नावांची शिफारस करण्यासाठी ३ जूनपर्यंतचा कालावधी आहे, पण सोमवारपर्यंत नाव पाठविले जाण्याची पूर्ण शक्यता आहे.

Web Title: Vinesh's re-recommendation for Khel Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.