Swastika ranking in world table tennis; Went into sixth place | स्वस्तिकाला जागतिक टेबल टेनिसमध्ये मानांकन; सहाव्या स्थानावर झेप
स्वस्तिकाला जागतिक टेबल टेनिसमध्ये मानांकन; सहाव्या स्थानावर झेप

- वैभव गायकर

पनवेल : राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने पुन्हा एकदा सुवर्णयश कामगिरी केल्याने स्वस्तिकाने ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, हा बहुमान मिळविणारी भारतातील ती पहिली टेबल टेनिसपटू ठरली आहे.

८१ वी युटीटी ज्युनिअर अ‍ॅण्ड युथ नॅशनल टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच जम्मू काश्मीर येथे पार पडली. या स्पर्धेत स्वस्तिकाने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत १८ वर्षांखालील गटात बंगालच्या संघाला नमवून सुवर्णपदक तसेच २१ वर्षांखालील युवा गटात बंगालच्या संघाला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. १८ वर्षांखालील गटात सांघिकमध्ये तिला दिया चितळे, अदिती सिन्हा, प्रीता वार्तिका तर २१ वर्षांखालील सांघिक गटात मनुश्री पाटील, अनन्या, सृष्टी हेलांगरी यांची मोलाची साथ लाभली.

विशेष म्हणजे, या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकाविण्याचा बहुमान महाराष्ट्राने मिळविला. त्याचबरोबर १८ वर्षांखालील गटात स्वस्तिकाने खेळताना रजत पदक तर दुहेरी गटात दिया चितळेच्या सोबतीने खेळत रजत पदक पटकाविले. या सर्व स्पर्धेत स्वस्तिकाने स्वत:च्या खांद्यावर राज्याची धुरा सांभाळून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. स्वस्तिकाने एकूणच केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली, त्यामुळे तिने जागतिक मानांकनात हा सन्मान मिळविला आहे. टेबल टेनिस श्रेणीतील आॅल इंडिया रँक एक प्राप्त झाला आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

प्रत्येक वर्षी तिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखविली आहे. मागील महिन्यात ओमान येथे झालेल्या ‘ओमान ओपन’ स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी जबाबदारीही स्वस्तिकाने पार पाडली. या स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळविले आणि पदक मिळविणारी भारताची एकमेव खेळाडू ठरली. या सन्मानाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन केले.

परदेशातही चमकदार कामगिरी

स्वस्तिकाने भारत देशासह हॉगकाँग, जॉर्डन, कोलंबो, ओमान यांसह इतर देशांमध्ये झालेल्या स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले आहे. लहानपणापासून टेबल टेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे, त्यामुळे तिला ‘विराट कोहली फाउंडेशन’कडून स्कॉलरशीपही जाहीर झाली. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशीपसाठी निवडली गेली. स्वस्तिकाचे वडील संदीप घोष हे स्वस्तिकाचे प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत.

जम्मू काश्मीर येथे पार पडलेल्या ८१ व्या युटीटी ज्युनिअर अ‍ॅण्ड युथ नॅशनल टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिकाने महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
ओमान येथे झालेल्या ‘ओमान ओपन’ स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणून जबाबदारीही स्वस्तिकाने पार पाडली. या स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळविले आहे.

Web Title: Swastika ranking in world table tennis; Went into sixth place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.