खेळाडूला असे वक्तव्य शोभत नाही; आफ्रिदीवर धनराज पिल्ले व दिलीप तिर्की उखडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:46 AM2020-05-19T04:46:10+5:302020-05-19T04:47:21+5:30

आफ्रिदीने एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर धार्मिक भेदभाव करीत असल्याचा आरोप केला होता. हा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Such a statement does not suit the player; Dhanraj Pillai and Dilip Tirkey attacked Afridi | खेळाडूला असे वक्तव्य शोभत नाही; आफ्रिदीवर धनराज पिल्ले व दिलीप तिर्की उखडले

खेळाडूला असे वक्तव्य शोभत नाही; आफ्रिदीवर धनराज पिल्ले व दिलीप तिर्की उखडले

googlenewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीच्या भारताविरोधी वक्तव्यावर भारतीय हॉकीतील दिग्गज धनराज पिल्ले व दिलीप तिर्की यांनी टीका केली. आफ्रिदीचे वक्तव्य खिलाडूवृत्तीला शोभेसे नसल्याचे सांगत जग कोरोना व्हायरस महामारीविरुद्ध लढत असताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे समजण्यापलीकडे असल्याचे पिल्ले व तिर्की यांनी म्हटले आहे.
आफ्रिदीने एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर धार्मिक भेदभाव करीत असल्याचा आरोप केला होता. हा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार व चार आॅलिम्पिक, चार विश्वकप व चार आशियाई स्पर्धेत सहभागी झालेले महान हॉकीपटू धनराज पिल्ले म्हणाले, ‘आमच्या पंतप्रधानांविरुद्ध अशाप्रकारचे आक्षेपार्ह विधान करणे सहन करण्यापलीकडे आहे. कदाचित सीमेपल्ल्याड दहशतवादला खतपाणी घालण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तान चिडलेला असावा. ’
पिल्ले पुढे म्हणाले, ‘आफ्रिदीबाबत विचार करता खेळाडू म्हणून त्याचा जो आदर होता तो त्याने गमावला आहे. एका खेळाडूला अशा प्रकारचे वक्तव्य शोभत नाही. आमच्या काळात पाकिस्तानचे महान हॉकीपटू शाहबाज अहमद, ताहिर जमा, मंसूर अहमद या सर्वांसोबत आमची मैत्री होती आणि ती आजही कायम आहे. ताहिरने तर १० दिवसांपूर्वी फोन करीत कोरोना महामारीबाबत चौकशी केली.’ आपल्या काळातील भारतीय हॉकीची भिंत म्हणून ओळखले जाणारे माजी कर्णधार व महान डिफेंडर तिर्की म्हणाले, हॉकी असो किंवा क्रिकेट, खेळ देशांना जोडण्याचे काम करते, विभागण्याचे नाही. एका खेळाडूने खिलाडूवृत्तीची प्रचिती आपल्या आचरणातून द्यायला हवी.(वृत्तसंस्था)

Web Title: Such a statement does not suit the player; Dhanraj Pillai and Dilip Tirkey attacked Afridi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.