कोकणकन्येनं ओलांडली 'रेष'; कबड्डी लीगमध्ये पुरुष संघाला प्रशिक्षण देणार रत्नागिरीची लेक

By स्वदेश घाणेकर | Published: May 10, 2019 04:13 PM2019-05-10T16:13:46+5:302019-05-10T16:14:57+5:30

खेळात स्त्री-पुरुष हा भेदभाव असता कामा नये आणि कोणताही खेळ असा भेदभाव शिकवत नाही.

sneha karnale coaching mumbai che raje team in upcoming indo international kabaddi league | कोकणकन्येनं ओलांडली 'रेष'; कबड्डी लीगमध्ये पुरुष संघाला प्रशिक्षण देणार रत्नागिरीची लेक

कोकणकन्येनं ओलांडली 'रेष'; कबड्डी लीगमध्ये पुरुष संघाला प्रशिक्षण देणार रत्नागिरीची लेक

googlenewsNext

- स्वदेश घाणेकर
मुंबई : खेळात स्त्री-पुरुष हा भेदभाव असता कामा नये आणि कोणताही खेळ असा भेदभाव शिकवत नाही. त्यामुळेच खेळ कोणताही असो तेथे जात-धर्म, लहान-मोठे, श्रीमंत-गरीब अन् स्त्री-पुरुष या गोष्टींना फारसे महत्त्व नसते. येथे महत्त्वाची असते ती आपली कामगिरी आणि त्यापलीकडे सर्व बाबी अर्थशून्यच. आपल्या कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंनी विश्वसनीय भरारी घेतली आहे. अशीच एक यशोगाथा रत्नागिरीची कन्या स्नेहा कर्नाळे हीने लिहिली आहे. 



 

रत्नागिरीच्या लांजा येथील, परंतु मुंबईत लहानाची मोठी झालेल्या स्नेहाने कबड्डी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंडो इंटरनॅशनल कबड्डी लीगमध्ये स्नेहा 'मुंबईचे राजे' या संघाचे प्रशिक्षकपद भूषवित आहेत. व्यावसायिक लीगमध्ये प्रथमच पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी एक महिला सांभाळणार आहे. इंडो इंटरनॅशनल कबड्डी लीगने स्नेहाला ही संधी देऊन अन्य महिला खेळाडूंनाही सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे.


प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर इंडो इंटरनॅशनल कबड्डी लीग येत्या 13 मे ते 4 जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. पुणे, मैसूर आणि बंगळुरू आशा तीन शहरांमध्ये या लीगचे सामने खेळवण्यात येणार आहेत. 8 संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार आहे. यातील 'मुंबईचे राजे' या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी प्रकाश साळुंखे आणि स्नेहा यांच्याकडे आहे. स्नेहाने हे आव्हान स्वीकारून कबड्डी क्षेत्रातील अन्य महिला खेळाडूंमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. महाराष्ट्र पोलिसांत कार्यरत असलेली स्नेहा ठाणे पोलिसांच्या महिला व पुरुष दोन्ही संघांना मार्गदर्शन करते. पण, व्यावसायिक लीगमध्ये पुरुष संघाला प्रशिक्षण देण्याचे आव्हान वेगळेच असते आणि ते सक्षमपणे पार पाडण्यासाठी स्नेहा सज्ज आहे.




ती म्हणाली,''या लीगमुळे मला नवीन व्यासपीठ मिळाले.. हे नवे आव्हान आहे आणि त्यासाठी मी सज्ज आहे. सुरुवातीला थोडसं दडपण होतं, कारण ही व्यावसायिक लीग आहे. आमच्या संघात भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांनाही कदाचित माझ्या सुचना ऐकताना काहीसं वेगळं वाटले असावे. एक महिला मार्गदर्शन मिळण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असावी. पण, हळुहळू संघातील सर्व खेळाडूंसोबत चांगला ताळमेळ निर्माण झाला आणि 'मुंबईचे राजे' लीगमध्ये जेतेपद उंचावण्यासाठी सज्ज आहेत.''


या लीगमध्ये पुरुष संघाला मार्गदर्शन करण्याचे किती आव्हान होते, यावर ती म्हणाली,''या खेळाडूंना समजून घेण्यासाठी मला 1-2 दिवस गेले. आता आमचा ताळमेळ चांगला बसला आहे. पण, पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा अन्य राज्यातून आलेल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर प्रश्नात्मक भाव होते. ही महिला नक्की आम्हाल काय शिकवणार? असा प्रश्न कदाचित त्यांना पडला असवा. पण, नंतर मी सराव घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांना शिकवताना मी स्त्री-पुरुष हा विचारच केला नाही. ते माझ्यासाठी खेळाडू आहेत, हाच विचार डोक्यात होता. त्यामुळे पुढील वाटचाल सुकर झाली.''




मुंबई उपनगरच्या संजीवनी क्रीडा मंडळाकडून स्नेहाने कबड्डीची सुरुवात केली. जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केल्यानंतर स्नेहा महाराष्ट्र पोलिसांत रुजू झाली. पण, येथे कबड्डीचा संघ नसल्याने तिने अॅथलेटिक्सकडे मोर्चा वळवला आणि महाराष्ट्र पोलिसांना पदकंही जिंकून दिली. पण, 2007 पासून पुन्ही ती कबड्डीकडे वळली. 

नावाचीच इंडो इंटरनॅशनल लीग
इंडो इंटरनॅशनल लीग या नावाने खेळवल्या जाणाऱ्या लीगमध्ये एकही आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत नाही. परदेशी खेळाडूंना व्हिसा न मिळाल्याने यंदाच्या हंगामात ते खेळणार नसल्याचे आयोजकांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

Web Title: sneha karnale coaching mumbai che raje team in upcoming indo international kabaddi league

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.