Silver to Saurabh Chowdhury | युवा नेमबाज सौरभ चौधरीला रौप्य
युवा नेमबाज सौरभ चौधरीला रौप्य

दोहा : युवा नेमबाज सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत १४ व्या आशियाई अजिंक्यपदमध्ये सोमवारी रौप्य पदकाची कमाई केली. विश्वचषक व आशियाई क्रीडा स्पर्धेचा १७ वर्षीय पदकविजेता नेमबाज सौरभला २४४.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. उत्तर कोरियाच्या किम साँग गुकने २४६.५ गुणांसह सुवर्णपदकाचा मान मिळवला. इराणचा फोरोउघी जावेद (२२१.८ गुण) कांस्य पदकाचा मानकरी ठरली.
पात्रता फेरीत ५८३ गुणांसह चौधरी व अभिषेक वर्मा अनुक्रमे सातव्या व सहाव्या स्थानासह दोघेही अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. अंतिम फेरीत वर्माला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला केवळ १८१.५ गुणांची नोंद करता आली. त्याचवेळी चौधरी, वर्मा व श्रावण कुमार या त्रिकुटाचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कांस्यपदक पटकावले. त्यांनी पात्रता पेरीत एकूण १७४० गुणांची नोंद केली होती. यापूर्वीच्या स्पर्धेत चौधरी व वर्मा यांनी आॅलिम्पिक कोटा मिळवलेला आहे.
ज्युनिअर गटात मिश्र सांघिक स्पर्धेत श्रेया अग्रवाल व धनुश श्रीकांत यांनी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
>गुरनिहाल गारचा, अभय सिंग सेखोन व आयुष रुद्रराजू यांनी ज्युनिअर पुरुष स्कीट सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. श्रेया व धनुश यांनी प्रतिस्पर्धी चीन संघाला १६-१४ ने पराभूत केले. गुरुनिहाल गारचाने वैयक्तिक गटात अंतिम फेरीत ५० गुणांची नोंद केली आणि रौप्यपदक पटकावले. अभय सेखोनला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताने सोमवारी एकूण ८ पदकांची कमाई केली. भारताने या स्पर्धेत सहा आॅलिम्पिक कोटा निश्चित केले आहेत. त्यामुळे आता आगामी आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय नेमबाजांची संख्या १५ झाली आहे.

Web Title: Silver to Saurabh Chowdhury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.