राफेल नदाल उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 03:39 AM2019-09-06T03:39:17+5:302019-09-06T03:39:44+5:30

यूएस ओपन : इटलीच्या माटियो बेरेटिनीची ऐतिहासिक कामगिरी

Rafael Nadal in the semifinals | राफेल नदाल उपांत्य फेरीत

राफेल नदाल उपांत्य फेरीत

Next

न्यूयॉर्क : स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल याने अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्ट्जमॅन याच्यावर ६-४,७-५,६-२ अशा फरकाने मात करीत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याचा सामना आता २४ वा मानांकित इटलीचा माटियो बेरेटिनीविरुद्ध होईल. विशेष म्हणजे यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहचणारा बेरिटिनी गेल्या ४२ वर्षांतील पहिला इटालियन खेळाडू ठरला. दुसरा मानांकित आणि तीनवेळचा चॅम्पियन नदालने पाच फूट सात इंच उंचीच्या श्वार्ट्जमॅनविरुद्ध शानदार कामगिरी करीत १९ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे कूच केली. बेरेटिनी याने फ्रान्सचा १३ वा मानांकित गेल मोंफिल्स याच्यावर तीन तास ३७ मिनिटांत ३-६, ६-३, ६-२, ३-६,७-६ अशी मात केली.
नदालची ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची ही ३३ वी वेळ आहे. रॉजर फेडरर (४५ वेळा) आणि नोवाक जोकोविच (३६ वेळा) यांच्यानंतर तो तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूयॉर्कमध्ये नदाल आठव्यांदा उपांत्य फेरीत दाखल झाला.

अमेरिकन ओपनची दोनदा उपांत्यपूर्व फेरी गाठणाºया श्वार्ट्जमॅनवर सलग आठवा विजय नोंदविण्यासाठी नदालला तीन तास लागले. हा सामना गुरुवारी पहाटेपर्यंत रंगला. नदालला तिसºया सेटदरम्यान खांद्यावर उपचार करून घ्यावे लागले. मागच्या वर्षी याच ठिकाणी नदालला ज्युआन मार्टिन डेल पेट्रो याच्याविरुद्ध उपांत्य सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्याने माघार घ्यावी लागली होती.
दुसरीकडे, रोममध्ये राहणारा २३ वर्षांचा बेरेटिनी ४२ वर्षांत उपांत्य फेरीत पोहोचणारा इटलीचा पहिला खेळाडू ठरला. त्याच्याआधी १९७७ मध्ये इटलीचा कोरोडो बाराजुट्टी याने उपांत्य फेरी गाठली होती. हा सामना माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट लढतींपैकी एक ठरल्याने मी आनंदी असल्याची प्रतिक्रिया बेरेटिनी याने सामन्यानंतर व्यक्त केली. (वृत्तसंस्था)

कॅनडाच्या एंद्रिस्कूचा धडाका
कॅनडाची बियांका एंद्रिस्कू हिने बेल्जियमची एलीसे मर्टन्सचा पराभव
करीत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या एकेरीत महिला गटाची उपांत्य फेरी गाठली. १९ वर्षीय एंद्रिस्कूने २५ वी मानांकित मर्टन्सचा ३-६, ६-२, ६-३ ने पराभव केला. ती अमेरिकन ओपनच्या दहा वर्षांच्या काळात अखेरच्या चार खेळाडूंत दाखल होणारी पहिली युवा खेळाडू बनली. तिची उपांत्य फेरीत गाठ स्वित्झर्लंडची १३ वी मानांकित बेनसिचविरुद्ध होईल. बेनसिचने क्रोएशियाची २३ वी मानांकित डोना वेकिच हिचा ७-६, ६-३ ने पराभव केला. एंद्रिस्कू आणि बेनसिच यांच्यात याआधी कधीही सामना झालेला नाही. सेरेना विलियम्सला दुसºया उपांत्य सामन्यात युक्रेनची पाचवी मानांकित एलिना स्वितोलिना हिच्याविरुद्ध खेळावे लागेल.

मला फार बरे वाटते. सामन्यादरम्यान फारच उकाडा होता. माझ्या शरीरात दुखणे उमळले होते. त्यासाठी उपचार करून घ्यावा लागला. चिंता करण्यासारखे काहीही नाही. हा सामना दीर्घवेळ चालल्यामुळे थकवा जाणवत आहे. रात्रभर झोप झाली की बरे वाटेल. मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. - राफेल नदाल

रॉजर फेडरर व नोव्हाक जोकोविच या दिग्गज प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान उपांत्य फेरीआधीच संपुष्टात आल्याने नदालचे यूएस जेतेपद निश्चित मानले जात आहे. मात्र आता त्याला धोकादायक माटियो बेरेटिनीच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार असल्याने त्याला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

Web Title: Rafael Nadal in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस