'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 03:32 IST2025-06-21T02:50:41+5:302025-06-21T03:32:07+5:30
दोन वेळा आडवा आलेला जर्मनीच्या ज्युलियन वेबर पडला मागे

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
Neeraj Chopra Wins Paris Diamond League 2025 : भारताचा 'गोल्डन बॉय' आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. फ्रान्स येथील स्टेड सेबास्तियन चार्लेटी येथे पार पडलेल्या पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेतील फायनलमध्ये नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात ८८.१६ मीटर सर्वोत्तम फेकीसह या मोहीमेची सुरुवात केली. हा प्रयत्न त्याला अव्वलस्थानावर कायम ठेवण्यास पुरेसा ठरला.
पॅरिसमधील प्रतिष्ठित स्पर्धेत नीरज चोप्रासमोर मागील दोन स्पर्धेत तगडी टक्कर देणाऱ्या जर्मनीच्या ज्युलियन वेबर याचे आव्हान होते. यावेळी मात्र नीरज त्याच्यावर भारी पडला. जर्मनीच्या वेबरला पहिल्या प्रयत्नातील ८७.८८ मीटर लांब अंतरावरील फेकीसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पहिला प्रयत्नातील फेकीच ठरली सर्वोत्तम
पहिल्या प्रयत्नात ८८.१६ मीटर फेकीसह जबरदस्त सुरुवात करणाऱ्या नीरज चोप्रानं दुसऱ्या प्रयत्नात ८५.१० मीटर अंतर भाला फेकला. तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्न फाउल ठरल्यावर सहाव्या प्रयत्नात नीरज चोप्रानं ८२.८९ मीटर लांब भाला फेकल्याचे पाहायला मिळाले. तीन प्रयत्न फसले. एवढेच नाही तर यावेळी ९० पारचा डावही साधता आला नाही. पण पहिल्या प्रयत्नातील फेकी सगळ्या स्पर्धकांमध्ये भारी ठरली अन् अव्वल क्रमांकावर राहत त्याने स्पर्धा गाजवली.
NEERAJ CHOPRA WINS PARIS DIAMOND LEAGUE💎
— The Khel India (@TheKhelIndia) June 20, 2025
- The best attempt of 88.16m in first throw 🔥🤩 pic.twitter.com/dhYVQPUr5E
आठ वर्षांनी उतरला होता मैदानात
जवळपास आठ वर्षांनी नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत सहभागी झाला होता. २०१७ मध्ये नीरज चोप्राला ८४.६७ मीटर थ्रोसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मे २०२५ मध्ये दोहा डायमंड लीग स्पर्धेत ९० मीटर पारचे ध्येय साध्य केल्यावर नीरज चोप्रा यंदाच्या स्पर्धेत आत्मविश्वासाने मैदानात उतरला अन् त्याने ही स्पर्धाही जिंकूनही दाखवली.
दोन वेळा आडवा आलेल्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरला टाकलं मागे
पॅरिसमधील स्पर्धेआधी दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रानं ९०.२३ मीटरसह हंगामातीलच नव्हे तर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट थ्रोची नोंद केली होती. पण यावेळी जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं शेवटच्या प्रयत्नात ९१.०६ मीटर अंतरावर भाला फेकत नीरजला मागे टाकले होते. मे २०२५ मध्ये पोलंड येथील स्पर्धेतही वेबरनं ८६.१४ मीटर थ्रोसह नीरजला मागे टाकत स्पर्धा गाजवली होती. या स्पर्धेत नीरज चोप्रा ८४.१४ मीटरसह जर्मनीच्या खेळाडूच्या मागे राहिला होता. पण यावेळी मात्र नीरजनं त्याला मागे टाकले. ८८.१६ मीटर लांब भाला फेकत तगडी टक्कर देणाऱ्या जर्मनीच्या खेळाडूला भारतीय स्टार भाळाफेकपटूनं पहिल्यांदाच पराभूत केले.